काळजात घर करणारा कथासंग्रह म्हणजे ‘आसवांची स्पंदने’

26

नुकताच मयुर जोशी यांनी लिहिलेला ‘आसवांची स्पंदने’ हा कथासंग्रह वाचला. हा कथासंग्रह वाचून मन अगदी भारावून गेले. माझ्याही नकळत मी या पुस्तकाचे अभिप्रायपर समीक्षण लिहायला घेतले. अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या कथा…. प्रत्येक कथेचे हृदयस्पर्शी कथानक…. काळीज हेलावून टाकणारी ओघवती भाषाशैली… वाचताना मन अगदी तल्लीन होऊन जाते….. प्रत्येक वाचकाने वाचावा असा कथासंग्रह… म्हणजेच मयुर जोशी यांनी लिहिलेला ‘आसवांची स्पंदने’ हा कथा संग्रह आहे.

“भेट देवाची” या कथेत मयुर जोशी यांनी हॉस्पिटल मध्ये घडणाऱ्या घटना अगदी डोळ्यासमोर जशाच्या तशा याव्यात अशा मांडल्या आहेत. एका वयस्कर बापाची आपल्या तरुण मुलाला दुर्धर आजारातून वाचवण्याची धडपड, देवाकडे केलेला धावा, आणि शेवटी मुलाचे जीव वाचवणाऱ्या डाक्टरात त्यांनी पाहिलेल्या देवाचे दर्शन घडवनारा प्रसंग यथार्थ मांडला आहे.

दगडात देव शोधण्यापेक्षा गरजू, गरीब लोकांचे जीव वाचवणारे अनेक समाजसेवी डॉक्टर्स, आज आपल्या देशात आजूबाजूला पाहतो. त्यांचा योग्य तो सत्कार करण्याची गरज असल्याचे या कथेवरून वाटते.

एकीकडे तापात फणफणलेल्या आपल्या तान्ह्या बाळाची काळजी करणाऱ्या आईची आणि दुसरीकडे शिक्षेकेची नोकरी करणाऱ्या नोकरस्थ स्त्रीची,प्रासंगिक रजा संपल्याने शाळेत रूजू होण्यासाठीची धडपड, तिच्या मनाची होणारी ओढाताण “अर्जित रजा” या कथेतून मांडली आहे. या कथेतून हृदयस्पर्शी वास्तव दर्शन घडविले आहे.

लेखक मयुर जोशी”पाठवणी”या कथेत एका हळव्या बापाची (गणेशची) आपली लाडाकोडात वाढवलेल्या मुलीची (रेणूंची)….. आपल्या आईच्या वचनाखातर दिलेला शब्द पाळण्यासाठी लग्नासाठी तयार झालेल्या मुलीची, लग्न मंडपात बापाची होणारी घालमेल, सतत डोळ्यातुन वाहणाऱ्या अश्रूधारा, बाहेर पावसाची रिपरिप, त्यातच कोरोना विषाणूग्रस्तांची वाढती संख्या याची अक्षरशः डोळ्यात पाणी आणण्या सारखे लिखाण केले आहे.

 

हंबरडा फोडी बाप

बापलेकिच हे नात

दाटे भावना मनात

चालली सासरी ही लेक

 

बाप वाढवी मुलीला

तळहात पाकळ्यात

अशा बापसाठी यावं

थोडी आसवे डोळ्यात

 

बाप साठवितो अश्रू

फक्त एका क्षणासाठी

जन्मभराचे रडतो

लेक जाताना सासरी

 

कथा वाचकांच्या डोळ्यातही अश्रू यावेत अशा प्रकारे ही भावूक कथा आढळते. मुलीच्या विवाहाचा प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर तरळून जातो. अख्खा लग्न मंडप, पाहुणे रावळे, जेवणाची पंगत, बिदाई, नंतरची बापाची परिस्थिती तंतोतंत लेखक मयुर जोशी यांनी कथन केले आहे.

” प्रसव कळा” या कथेत लेखक मयुर जोशी यांनी कथेच्या सुरुवातीला “मातृत्व” मिळणाऱ्या सोनाली आणि पितृत्व मिळणाऱ्या सिद्धेशचे काळजीपूर्वक वागणुकीचे वर्णन, ग्रामीण भागातून शहराकडे दवाखान्यासाठी होणारी हेलपाटे यांचे वर्णन केले आहे. पहिल्या प्रसूतीच्या वेदना एक आई कशी सहन करते आणि एका भावी पित्यालाही त्या वेदनांचा त्रास कसा होतो त्याचे शब्दशः वर्णन केले आहे. अतिशय वेदनादायी ‘प्रसवकळा’ अनुभवल्या नंतर जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा एक आई मरणासन्न कळा विसरून जाते आणि एका नव्या जीवाची सुरुवात होते. या कथेत शेवटी लेखकांनी आईबापाला वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

“विठुरायाचा उपदेश” या कथेत काबाड कष्ट करून, शेतात राबून आईवडील मुलांना उच्च शिक्षण देतात पण आजकालची मुले ही सुशिक्षित असूनही सुसंस्कारित नसल्याने त्यांना जिवंत आईबापाची किंमत नसते. त्यांना ते आपल्या जीवनातील अडगळ समजतात. लेखक मयुर जोशी लिहितात,”ज्यांना स्वतःच्या आई बापामधील विठ्ठल-रखुमाई दिसत नाहीत, त्यांना माणसातील देव कसा दिसेल? मूर्ती मधला देव कसा भेटेल? असा सवाल करतात. कथेच्या शेवटी प्रत्यक्ष विठुरायाच्या उपदेशाने कथनायकाचे बदललेले मन दर्शवून एक चांगले परिवर्तन दाखवले आहे.

एकूण “आसवांची स्पंदने”या कथासंग्रहात लेखक एकेक व्यक्तीमत्वांच्या घटनांमध्ये वेगवेगळया आसवांचे ठिबकते दर्शन लेखनात केले आहे.

प्रत्येक वाचकांनी अवश्य वाचावा असा ‘आसवांची स्पंदने’ हा कथा संग्रह आहे. पुस्तकाच्या उपलब्धतेसाठी लेखक मयुर जोशी(9767733560/7972344128) यांच्याशी संपर्क करा.

 

✒️पुस्तक परीक्षण लेखिका:-सौ महानंदा गुणकी(गोकाक , जिल्हा बेळगाव(कर्नाटक)मो:-८३१७४४६९१९