आजपर्यंत प्रजासत्ताक दिनाची चुकीची मांडणी

57

जिवाचे रान करून देशात समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य अबाधित देशाला अखंड ठेवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन

२६ जानेवारी १९५० चा दिवस उजाडला आणि भारताला सुख समृद्धी वैभवाची सुरवात झाली. हजारो वर्षापासून गुलामगिरी, जातीवाद, स्पृश्य अस्पृश्यता, अज्ञात, वंशीक व लैंगिक भेदभाव, अंधविश्वास व एकहाती सत्तेतून सर्वसामान्य लोकांचे पोषण आणि विशिष्ट वर्गाचे पोषण होत होते. या सर्व समस्येवर एकमेव व खात्रीशीर औषध म्हणजे भारतीय संविधान निर्माण झाले होते. भारताचे संविधान फक्त एक घटना नसुन त्यामागे त्याग, बलिदान व संघर्षाचा इतिहास आहे. देशातील जनतेच्या अस्तित्व व स्वाभीमानाची निर्मीती आहे. थोडक्यात संविधान लंगड्याचा पाय, आंधळ्याचा डोळा आहे. भारतीय संविधान म्हणजे हजारो वर्षानंतर झालेली सामाजिक क्रांती आहे. विकासाच्या प्रवाहात येणारी प्रत्येक गोष्ट येथे नाकारली गेली होती. मानसाला गुलामाप्रमाणे वागणूक होती, गुलामांना माणसात आणण्याचा मार्ग म्हणजे संविधान होय. मुळात आज संविधानाला बाहत्तर वर्षे पुर्ण झाले, शासकीय पातळीवर दरवर्षी प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु हा दिवस साजरा करताना या दिवसाचे गांभिर्य च काढून घेतले जाते आणि मनोरंजन करून या दिवसाची सांगता करण्यात येते. संविधानाने जातीव्यवस्था वर्णव्यवस्था हाणून पाडली तरी प्रजासत्ताक दिनीच जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेची प्रचिती येते.

प्रजासत्ताक दिन साजरा करताना आजपर्यंत शासकीय पातळीवर संविधानाची सक्षम आणि खरी बाजु कोणी मांडली नाही आणि त्याचा प्रचार प्रसार केला नाही. हजारो वर्षाची गुलामी, अंधविश्वास, विषमता आणि अज्ञान दुर करणारे जागतिक एकमेव श्रेष्ठ संविधान आहे आणि दोन वाक्यात संविधानाचे महत्त्व सांगून मनोरंजन कार्यक्रमाकडे वळले जाते. १५ ऑगस्ट ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० देशाची सत्ता लोकांच्या हाती आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो एवढे बोलुन हा दिवस साजरा होत असतो. यातून व्यवस्थेची व शिक्षीत लोकांची बुद्धी दिसुन येते. जातीवाद तर एवढा भिनलेला आहे की इतक्या दिवस प्रजासत्ताक दिवस साजरा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धां ठेवत नव्हते. ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची अँलर्जी आहे गरच ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीचा अर्थात भारतीय संविधानाचा स्विकार कोणत्या आधारावर करतील. आम्ही दरवर्षी बोलतो प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

प्रजासत्ताक दिन चिरायू होण्यासाठी अगोदर प्रजासत्ताक दिन समजने महत्त्वाचे आहे. संविधानाच्या ७२ वर्षात अजूनही लोकांना फक्त एवढेच माहिती आहे संविधान एका धर्मातील लोकांसाठी आहे. संविधानाने आम्हाला काय दिले? संविधानाने आम्हाला दिलेले कोणी आणि का नाराकरले? याचे उत्तर आजही प्रजासत्ताक दिन साजरा करणारे देऊ शकत नाहीत. लोकांच्या हाती सत्ता आली म्हणजे नेमके काय झाले?खरचं लोकांच्या हाती देशाची सत्ता असती तर करोडो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन का करावे लागते? त्यांच्या आंदोनलाची दखल सरकार का घेत नाही? सर्व सामान्य मानसाला न्याय का मिळत नाही? लोकांची सत्ता असती तर लोकांच्या समस्या का वाढल्या असत्या? या प्रश्नांची उत्तरे देखील संविधानामध्येच आहेत फक्त आपल्याला ते समजून घेऊन वाचावे लागेल. आणि संविधान वाचताना आपला इतिहास विसरून चालणार नाही. आजही लोक इतिहास विसरले म्हणून समस्या वाढलेल्या आहेत. भारतीय संविधानाने दिलेली प्रत्येक गोष्ट आमच्या उत्थानासाठी मोलाची आहे.

जन्मापासून मरण्यापर्यंत जे काही आम्हाला आज स्वातंत्र्य आहे ते संविधानामूळेच ही बाब विसरून चालणार नाही. शिक्षण घेण्याचा अधिकार संविधानाने दिला, नोकरी करण्याचा अधिकार संविधानाने दिला, संपती कमवण्याचा अधिकार संविधानाने दिला, स्त्रियांना नटूनथटून राहण्याचा आणि बाहेर पडण्याचा अधिकार संविधानाने दिला, पुरुषांबरोबर फिरण्याचा, नोकरी करण्याचा, मत मांडण्याचा, आणि जिवनसाथी निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला. आणि हे सगळं अधिकार संविधान लागू होण्यापुर्वी कोणाला होते याचा तर्कवादी अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे. मत देण्याचा, निवडणुकिला उभे राहण्याचा अधिकार संविधानाने दिला. संविधानाने लोकशाही प्रस्तापित केली. आणि आजही लोकशाहीचा अर्थ लोकांना कळाला नाही म्हणून आजही लोकशाहीची मुळे समाजात रुजली नाही. फक्त निवडणूक घेणे म्हणजे लोकशाही नाही. लोकशाहीचा साधा आणि सोपा अर्थ असाच कि देशातील सर्व मालमत्ता सरकार अर्थात लोकांच्या मालकिची असेल. त्यावर कोणत्याही एका व्यक्तीचा, एका गटाचा किंवा समुहाच मालकी हक्क नसुन तो मालकी हक्क प्रत्येक नागरिकांचा राहील. जसे आज आपण बघितले तर जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषद शाळेवर कोणत्याही खाजगी व्यक्ती, गट वा समुह आपला हक्क गाजवू शकत नाही कारण ती शाळा शासनाच्या अधिन असते म्हणजे च त्याचे मालक सर्व सामान्य जनता असते. दुसरे उदाहरण म्हणजे रेल्वे. भारतीय रेल्वे जगातील रेल्वेमध्ये वरच्या नंबरवर आहे.

रेल्वेची मालमत्ता ही शासकीय अर्थात सर्वसामान्य लोकांची आहे. लोकांच्या मालकीची आहेत तर खरचं लोकांना फायदा होतो का तर विचार करा जिल्हा परिषद ची शैक्षणिक फी आणि खाजगी शाळेची शैक्षणिक फी या मध्ये कितीची तफावत आहे. खाजगी ही एका व्यक्तीची, गटाची वा समुहाची मालकी असते म्हणून तो व्यक्ती ठरवेल तशा किंमतीमध्ये तो सेवा देऊ शकतो. आणि लोकांच्या मालकीची असेल तर लोकांचे हीत लक्षात घेऊन फी ठरवली जाते. दुसरा फायदा काय तर सार्वजनिक क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना कामाची सुरक्षितता व वेतनाची हमी असते परंतु खाजगी क्षेत्रात ते नसते. आपण पुन्हा शाळेचेच उदाहरण बघितलं तर जिल्हा परिषद शिक्षकाचा पगार आणि खाजगी शाळेच्या शिक्षकाचा पगार यात खुप मोठी तफावत आहे. खाजगी शाळेत फि जास्त घेऊन शिक्षकांना पगार कमी आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये फि कमी असून पगार जास्त. खाजगी शाळेतून कधी काढून टाकतील सांगता येत नाही, शासकीय शाळेवरचा नोकरी सुरक्षित असते. हाच उद्देश आहे लोकशाही चा लोकांच्या हिताची व्यवस्था निर्माण करुन ती कायम ठेवणे परंतु कधी संविधान उघडून बघितलं नाही, लोकशाही काय आहे समजून घेतलं नाही. म्हणून आज लोकशाहीची मुळे समाजात रुजण्या अगोदरच लोकशाहीला उपटून काढले जात आहे आणि भांडवलशाही ची लागवड केली जात आहे.

प्रजासत्ताक दिनाचा जल्लोषात साजरा करण्या बरोबरच जर प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय याचा अर्थ जरी लोकांना कळाला असता तर प्रजासत्ताक दिन नक्कीच चिरायू झाला असता. प्रजासत्ताक दिन साजरा का करायचा? आणि कसा करायचा याचे उत्तर मिळाले तरी खुप मोठी क्रांती होईल परंतु या प्रश्नांची उत्तरे देणारे लोक दुर्मिळच आहेत. संविधान लागु झाले म्हणजे नेमके काय झाले? सर्वसामान्य लोकांच्या जिवनात काय बदल घडले याचे उत्तरे शोधले तर विचार कल्पनेच्या बाहेरचे बदल आपल्याला दिसतील. ज्या महिलांना मनोरंजनाचे साधन म्हणून दरवर्षी पाळण्याची दोरी हाती दिला जात होती, इच्छा असताना सुद्धां महिला घरात बोलु शकत नव्हती, कला गुण असताना सुद्धां महिला चौकट ओलांडू शकत नव्हती तीच महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पैसा आणि पदाच्या जोरावर आज तीचा मान सन्मान आहे. हे फक्त संविधानामुळे. ज्यांना शिक्षण म्हणजे काय माहिती नव्हते त्या लोकांच्या शिक्षणसंस्था उभ्या झाल्या त्या संविधानामुळे. गुलामीची दोरी बांधलेल्या हातात पेन देऊन गुलामी विरोधात लिहते करण्याची ताकद संविधानाने दिली. डोक्यातील जातीभेद वर्णभेद विसरून एका ताटामध्ये जेवणाची परवानगी संविधानाने दिली. प्रेमविवाह करण्याची संमती संविधानाने दिली.

गावकुसाबाहेर ज्यांची घरे होती त्यांचे शहरात बंगले झाले, जातीव्यवस्थेने हिन ठरवलेले लोक श्रेष्ठ पदावर गेले. हे नेत्रदीपक परिवर्तन फक्त संविधानाने केले. परंतु हे परिवर्तन होऊ नये म्हणून कोणी अडचण निर्माण केली? विषमतावादी व्यवस्था कोणाला अपेक्षीत आहे. स्त्रियांना दासी म्हणून कोणी वागणूक दिली याचे उत्तरे शोधने सुद्धा महत्त्वाचे आहे तसच संविधानाचे महत्त्व कळेल. प्रजासत्ताक दिन साजरा करताना संविधान घराघरात कसे जाईल यासंदर्भात काही तरी प्रबोधन व्हायला पाहिजे, संविधान धर्म ग्रंथ नसून राष्ट्रीय ग्रंथ याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अनेक लोक सदिच्छा देतात डिजिटल बँनर बनवतात पण त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसतो याचे कारण त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नसतो आणि विषतावादी व्यवस्था जाणीव पुर्वक तसे बँनर तयार करून पसरवत असते त्यामुळे दिवसाचे गांभीर्य कमी होऊन त्याला वेगळेच वळण लागते.प्रजासत्ताक दिन अति उत्साहात साजरा करावा परंतु त्यामध्ये सहभाग सर्वांचा असावा आणि ज्ञानाचा साठा असावा. प्रजासत्ताक दिन देशभक्ती अंगात आणण्यासाठी नाही तर प्रजासत्ताक दिनी प्रजेच्या सुखसुविधा व देशाची प्रगती याची शहानिशा होऊन देशात समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या गोष्टी निरपेक्ष मिळाल्या तर प्रजासत्ताक दिन चिरायू होईल.

माणसाला माणसाची जाणीव करून देऊन हक्क अधिकार बहाल करणारा हा सोन्याचा दिवस, सर्वांना मंगल कामना
*************************************
✒️लेेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************