पुर्वपरवानगीने ध्वनीक्षेपक वापरण्यास वर्षातील 15 दिवस सुट – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आदेश

47

🔹धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, 31 डिसेंबर चा समावेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.29जानेवारी):- सन 2021 मध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश उत्सवातील 3 दिवस (अनंत चतुर्दशी व 2 दिवस), नवरात्री उत्सवातील अष्टमी व नवमी हे 2 दिवस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व 31 डिसेंबर या 10 दिवसासाठी बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखुन सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाची /ध्वनीवर्धक वापरासाठी परवानगी देता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशानुसार उपरोक्त प्रमाणे सुट दिलेल्या दिवसाकरीता सक्षम प्राधिकारी कडून परवानगी घेवुनच आणि त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक चा वापर करता येईल.ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सुट देणे बाबत इतर 05 दिवसाचे बाबतीत स्वंतत्र आदेश निर्गमीत करण्यात येईल. त्याचप्रमाणे गणेश उत्सवाकरीता असलेले उर्वरीत 2 दिवसाचे बाबतीत सुध्दा स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येईल.

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासुन ते रात्री 12 वाजेपर्यत सुट जाहिर करण्याकरीता, जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांनुसार जिल्हाधिकरी गुल्हाने यांनी 2021 करीता 15 दिवस निश्चित करण्याकरीता, ध्वनी प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, यांचेशी सल्लामसलत करुन 10 दिवस निश्चित केले असुन उर्वरीत 05 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.