शाळा आणि शिक्षक यांचे महत्त्व

74

कोरोना लॉकडाऊन शिथल झाल्यानंतर मागील काही दिवसापासून टप्प्याटप्प्याने आपल्या महाराष्ट्र राज्यात शाळा सुरू होत आहेत. प्रथम इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले . त्यानंतर 27 जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू होत आहेत…. याचा निश्चितच सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना आत्यंतिक आनंद आहे…. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरू होत आहे.

मागच्या अभूतपूर्व अशा कठीण काळात सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते. अगदी ठप्प झाले होते. “न भूतो न भविष्यती…..” अशा प्रकारची आरोग्य आणीबाणी आली होती. या कोरोना विषाणूजन्य साथीच्या आजाराच्या कठीण काळात आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “शाळा आणि शिक्षक यांना तितकासा प्रभावी दुसरा पर्याय उपलब्ध नाही.” खऱ्या अर्थाने या कठीण काळात शाळांचे आणि शिक्षकांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. खरे तर अगदी पुरातन काळापासून शाळेला आणि शिक्षकाला पर्याय असू शकत नाही. असे अनेक तत्वज्ञान च्या लक्षात आले होते. परंतु तरीदेखील काही लोकांना मात्र शाळा आणि शिक्षकांचे तितकेसे महत्त्व वाटत नव्हते.

शाळा आणि शिक्षक कायमच काही जणांच्या टीकेचा विषय ठरलेल्या आहेत. त्यातल्या त्यात सर्वसामान्य ‌ मुलांपर्यंत…… ग्रामीण भागापर्यंत…. खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषद शाळा व तेथे अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देणारे शिक्षक हा तर काही मंडळीच्या कुचेष्टेचा मजेदार विषय बनला होता. परंतु कोरोनाच्या अभूतपूर्व अशा आणीबाणी काळात याच कायम टीकेचे धनी ठरणाऱ्या शिक्षकांचे आणि ते ज्ञानदान करत असणाऱ्या जि प शाळेचे खरे महत्व जनसामान्यांच्या आणि टीका करणाऱ्याच्याही ध्यानात आले.

मागील जवळ-जवळ अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळी सर्व मुले घरी राहून वेगवेगळ्या पद्धतीने अध्ययन अनुभव घेत होते. ऑनलाइन व इतर डिजिटल माध्यमातून शिक्षण प्रक्रिया चालू होती. त्यावेळी सर्वसामान्य सोबतच प्रत्येकाच्या लक्षात आले…. “शाळा आणि शिक्षक यांना तितकासा प्रभावी असा दुसरा कुठलाच पर्याय असू शकत नाही…” सर्वसामान्य पालकच काय परंतु ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांची मुलेसुद्धा शाळेत जितक्या प्रभावीपणे अध्ययन करत होते तितक्या प्रभावीपणे घरात करू शकले नाहीत. शिक्षण शाळेएवढे प्रभावीपणे घरात चालू नव्हते. याची अनेक कारणे होती. परंतु काहीही केले तरी…… शाळा आणि शिक्षकांची उणीव भरून निघणे शक्य नव्हते. याचा अनुभव सर्व सामान्य पालकांपासून उच्चपदस्थ असणाऱ्या सर्व पालकांनी घेतला. कायम शाळा आणि शिक्षकांवर टीका करणाऱ्या मंडळींना सुद्धा याची चांगलीच प्रचिती आली. प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होते. “शाळांना पर्याय असू शकत नाही….” शाळेसारखी मुले घरी शिकू शकत नाहीत. शिक्षकांप्रमाणे मुलांना दुसरे कोणीच शिस्त लावू शकत नाही.

खऱ्या अर्थाने शिक्षण ही समूहात चालणारी प्रक्रिया आहे. सर्वसामान्यपणे मुलेही समूहात चांगल्याप्रकारे शिकू शकतात. वैयक्तिकरित्या शिक्षण घेताना शिक्षण प्रक्रियेचा प्रभावीपणा कमी होतो. शिक्षणात प्रवाहीपणा राहात नाही. अध्ययन प्रक्रियेची गती कमी होते. एकंदरीत वैयक्तिकरित्या चालणारी अध्ययन प्रक्रिया…… शिक्षण प्रक्रिया….. ही निरस आणि कंटाळवाणी वाटणारी ठरते. तुम्ही भलेही वैयक्तिकरित्या शिक्षण घेण्यासाठी तुम्ही आपल्या पाल्याला कितीही सोयी उपलब्ध करून दिल्या तरीही शाळेसारखी शिक्षण प्रक्रिया घरात चालत नाही. हे अनुभवाअंती सिद्ध झाले आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षणाला शाळेशिवाय दुसरा प्रभावी पर्याय नाही हेच खरे….

कोरोना या विषाणूजन्य आजाराने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या… स्वच्छतेचे महत्व शिकवले… रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व शिकवले…. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे महत्त्व शिकवले…. पोलीस यंत्रणेचे महत्त्व शिकवले… स्वच्छता कामगारांचे महत्त्व शिकवले…. संपूर्ण स्वच्छता यंत्रणेचे महत्त्व शिकवले…..संपूर्ण प्रशासनाचे महत्व शिकवले… अत्यावश्यक सेवेचे महत्त्व शिकवले …… त्यासोबतच शाळा आणि शिक्षकांचे महत्त्व शिकवले…. हे महत्त्व आपण असेच कायम टिकवून ठेवूया… भविष्याची उज्ज्वल पिढी घडवणाऱ्या…. भविष्याचा उज्ज्वल भारतीय नागरिक घडवणार्‍या…… शाळा आणि शिक्षकांचा सन्मान करूया….

 

शाळा आणि शिक्षक यांचे महत्त्व….

 

 

शाळा आहेत आमच्या

शिक्षण संस्काराचा मळा

इथेच शिक्षण मिळते

तुमच्या-आमच्या बाळा

 

 

बोलक्या इथल्या भिंती

कायम रंगवलेला फळा

वाचन करतात मुले

गाणी गातात गळा

 

 

बौद्धिक, भावनिक, शारीरिक

घेऊनी प्रगतीची आस

इथे साध्य केला जातो

बालकांचा सर्वांगीण विकास

 

 

शिक्षणासोबत शाळेत

होतात सहशालेय उपक्रम

अंधश्रद्धा नष्ट होतात

संपतात मनाचे भ्रम

 

नित्य मिळतात इथे

अनेक संस्कारांचे धडे

उज्वल भारतीय नागरिक

शाळा-शाळांमधून घडे……

 

✒️लेखक:-मयुर मधुकरराव जोशी(लेखक/कवी,ग्रीन पार्क जिंतूर जि परभणी)मो:-9767733560/7972344128