धुऱ्यावरची भानगड, लावी स्वयं विकासाला गळ

30

काल शाळेकडून घरी परतत असताना, मी रस्त्याच्या बाजूला थोडया अंतरावरती असणाऱ्या एका शेताच्या बांधावर 7- 8 लोकांचा आरडाओरडा ऐकला. सहज त्या गोंधळाच्या आवजाकडे व दृश्याकडे लक्ष्य गेल्याने मी थोडासा थबकलो. माणसांचा खुप मोठा आवाज व बायांचे चिरकने व लहान मुलांचे रडणे कानी येत असल्याने आता माझीपण बेचैनी वाढत जात होती. रस्त्यावर जाणाऱ्या रोजमजुरांना संबंधित प्रकरणाविषयी विचारले, तर नेहमीच होत असलेल्या शेताच्या धुऱ्यावरच्या भानगडीविषयी माहिती मिळाली.

आमच्याकडे सुद्धा शेती आहे. या शेतातल्या भानगडी मी पण लहानपणापासून पाहतच आलो आहे. या आशा ओंगळवाण्या प्रकरणात स्वतःच्या हितासाठी इतरांना त्रास देणे हे कितपत योग्य आहे? याचा विचार करायला कोणीही तयार नाही. ज्याला त्याला आपल्याच फायद्याचे पडले आहे. हो! प्रत्येकाने आपल्या फायद्याचा विचार करायलाच हवा; पण त्यासाठी इतरांची मुंडकी कापून तुमच्या प्रगतीचे स्वप्न पाहत असाल तर ते अयोग्यच!

मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सहज विचारलं की, “दोन शेतांच्या मध्ये बांध का असतो?” समोरून उत्तर आले , ‘भांडण होऊ नाही म्हणून.” मी मनात म्हणालो, ” या धुऱ्यामुळे तर भानगडी व्हायल्यात!” तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याने उत्तर दिले, ” कोणाचे शेत कोणते आहे? हे कळावे म्हणून धुरा असतो.” मला हे उत्तर पटले. पण भानगडी करणाऱ्यांना हे खरे उत्तर कधी कळेल? देव जाणे?

आमच्या बालपणी शेतावरचे बांध जुन्या पाटलाच्या मिशा जशा झुपकेदार असायच्या तसेच होते, आता लोकांच्या मिशा जशा छोट्या झाल्यात तसे शेतावरचे बांध पण होऊन बसलेत. घरचे जनावरे त्या धुऱ्यावरच चरायचे, वेगळं शेत चाऱ्यासाठी पडीक ठेवायची गरज नव्हती. आता धुरेच गायब झाल्यामुळे मुद्दाम चाऱ्यासाठी वेगळं शेत राखून ठेवावे लागत आहे. आणि आपली 4 – 2 ओळींची जमीन चोरी जात आहे, हा भाग तर वेगळाच!

गावात आशा प्रकारच्या भानगडी दर दिवसाआड होताना नजरेसमोर येतातच. अर्थात चूक ही एकाच वेळेला दोघांची नसणारच! कोणीतरी एकच शेतकरी चुकत असणार! आणि तो दुसऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असणार. मग, त्या बिचाऱ्या ( अन्यायग्रस्त ) शेतकऱ्याने आपल्या कामात लक्ष्य घालावे? की आशा फालतू, वेळ घालणाऱ्या वादात डोके कायम बुडवून ठेवावे ? जो माजून गेला आहे, त्याला न कोणाची भीती आहे ना धाक. तो फक्त त्या शेजाऱ्याचा बॉस होऊन बसला आहे, जो स्वतःचीही पगार इतरांच्या खिशातून भागवत असतो.

इतरांच्या ताटात लक्ष्य घालण्याची मानसिकता केवळ बुरसटलेली नाही, तर तितक्याच हलकट व इतरखाऊ नग्नतेचे घाणेरडे प्रदर्शन करते. नसून मागणे नाही, तर असून अधिकची ही हौस करणे होय. यामध्ये ज्याची मानवी शक्ती ( मनुष्यबळ ), किंवा ज्याच्याकडे माजुर्डेपणा व कोणालाच न घाबरण्याची वृत्ती आहे, ज्याला कायद्याचा वचक आणि धाक माहीत नाही; त्या व्यक्तीचीच चालती असती. इतर तर आपली सम्पदा लुटू द्यायला व कर्माची कडू फळे चाखायला बसली आहेत.( आणि त्यांनी काय वाईट कर्म केले? हे त्या अन्यायग्रस्तालाही माहीत नाही, ही खरी शोकांतिका आहे.)

गावातल्या तंटामुक्ती समित्या व वेगवेगळे पदाधिकारी ( जे सजवून ठेवलेल्या, वास नसलेल्या जास्वंदीच्या फुलासारखे खुर्चीला चिटकून बसलेत.) तंटा निवारण्यासाठी काय काम करतात? हे तर कृती संशोधनाचा विषयच होईल. तंटा सोडवतानाही जेव्हा मतांचीच गोळाबेरीज पाहिली जाते, तेव्हा लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीच बरी वाटायला लागते. कारण त्यात एका विशिष्ठाला वाईट बोललो म्हणून आपले 2 – 4 मते कमी होतील याचीतरी भीती नसते. तेव्हा अन्यायग्रस्ताने न्याय मागावा तर कुठे?

शासकीय पद्धतीने मोजणी आणणे, कागदी घोडे नाचवणे यात तो भाबडा शेतकरी पारंगतही नसतो आणि तितका वेळही त्याच्याकडे नसतो. अशावेळेस शासन फक्त नियमांची फाइलच तयार करून ठेवत असेल, तर फाइलमधला धुरडा आणि खिशातला खुर्दा फक्त खळखळ वाजणार व धुराने नाकपुड्याच्या शिंका सुरू होणार, यापलीकडे उल्लेख करावा असे काहीच घडणार नाही.

इतरांची माया माझी म्हणून हावरटपणा करणे, हेच किळसवाणे व घाणेरडे आहे. स्वतःच्या हातातल्या व पायातल्या सळसळणाऱ्या रक्तवाहिन्या व धमण्यातले खळखळ वाहणारे रक्त जेव्हा थंड पडून गोठते तेव्हाच असे मर्दुमकी मिरवणारे षंढ अहंकारी होऊन माजल्यासारखे वागतात.

शासनाकडून वा गावातल्या प्रतिष्ठित व ज्येष्ठ – श्रेष्ठ म्हणवल्या गेलेल्या हुशार व समजुतदार लोकांकडून इतकीच अपेक्षा आहे; की जसे आपल्या कामाचे काही पैलू व पायऱ्या ठरलेल्या असतात, त्यातलीच एक छोटीशी पायरी म्हणून आणि स्वतः ला समाधान लाभेल या उद्देशाने फक्त अन्याय होणाऱ्या माणसांसाठीसुद्धा एकतरी काम करावे. म्हणजे पुनः कोणाच्या घरचे भांडणार व रडत बसणार नाहीत. जे आपलेच आहे,ते मागण्यासाठी भीक मागावी लागत असेल, तर सुंस्कृत म्हणवल्या गेलेल्या समाजात आपण कुठून आदिमानव येऊन बसलोत; ही विचार करण्याची वेळ येऊ नये.

आपण आपल्या कामाशी काम ठेवावे! या वृत्तीने स्वस्थ व सुस्त होऊन बसलो आहोत. पण, आजच्या कलयुगी समाजात शांत राहणाऱ्या माणसाला समाधान लाभायचे सोडून द्या, हे समाजकंटक त्रास द्यायलाच बसले आहेत. आपली शांती सोडून आपल्याला कोणालाही अशांत करायचे नाही; पण आमची झोप ही सम्पली आहे आणि आता ‘मी जागा झालो आहे!’ हा चेतक बदल त्या ‘ वाईट’ वृत्तीला तरी निदान सांगणे क्रमप्राप्त आहे. कलयुग असल्यामुळे तुमच्या मदतीला रामही येणार नाही आणि कृष्णही! आता तुमचे राम आणि कृष्ण तुम्हीच आहात. आपला बचाव आपणच करूया! इतरांना त्रास द्यायचा नाही, आणि कोणाचा सहनही करायचा नाही. असे आजपासून प्रत्येकच जण वागणार असेल तर कदाचित कुठल्याही भानगडी भविष्यात होणार नाहीत, इतकीच अपेक्षा!

धन्यवाद!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो- 8806721206