ज्ञानसंस्कृती संवर्धन व विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

तिवसा(दि.2फेब्रुवारी):- ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्याना अध्ययन साधने व अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण मिळवून देणे यासाठी वाचनालय व अभ्यासिकेची आवश्यकता असते. तिवसा येथे अभ्यासिका सुरू होत आहे. त्याचा विनियोग करत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले.

तिवसा पोलीस ठाण्याच्या परिसरात सर एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृह व वाचन अभ्यासिकेचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. यावेळी तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखेडे, पंचायत समिती सभापती श्रीमती पूजा आमले, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन.,अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव, तिवसा तहसीलदार वैभव फरतारे,तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके, सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती,राजेश पांडे, शैलेश म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणी येतात. येथे वाचनालय व अभ्यासिकेच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यासाठी मोठी सुविधा झाली आहे. अभ्यास ही एक साधना आहे.या साधनेतून व्यक्तिमत्व विकास होतो. त्यातून आपण एका अर्थाने देश सेवेसाठी तयार होत असतो.भावी पिढीने या संधीचे सोने करून यश प्राप्त करावे, असे सांगून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

पोलीस ठाणे परिसरात अभ्यासिका असल्याने विद्यार्थी सुरक्षित वातावरणात अभ्यास करतील. त्यामुळे त्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून यश प्राप्त करावे,असे श्री. बालाजी यांनी सांगितले. श्रीमती उईके यांनी प्रास्ताविक तर गौरव तिवस्कर यांनी सूत्रसंचालन केले.