उत्कृष्ट डॉक्टर होण्यासाठी प्रयत्नशिल रहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

27

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.2फेब्रुवारी):- समाजात पहिल्यापासून वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाला विशेष आदराचे, प्रतिष्ठेचे स्थान राहिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक ज्ञानार्जन करत उत्कृष्ट डॉक्टर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या शैक्षणिक सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, डॉ. जगन्नाथ दिक्षित, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. प्रतिभा कुलकर्णी, डॉ. सईदा अफरोज, डॉ. शेंडे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय औरंगाबाद यास एक वारसा आहे. सहा दशकापासून रूग्णसेवा आणि वैद्यकीय ज्ञान देणाऱ्या या प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकण्याची संधी मिळणेही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शंभर टक्के मेहनतीतून एक उत्कृष्ट डॉक्टर होण्यासठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. जेणेकरून वैद्यकीय क्षेत्रात एक ज्ञानसंपन्न डॉक्टर म्हणून उत्कृष्ट योगदान देत समाजाप्रतीची, आपल्या कुटुंबाप्रतीची बांधिलकी पार पाडणे शक्य होईल.
तसेच कोरोनामुळे जगण्याची शैली बदललेली असून या आरोग्य आपत्तीत पून्हा एकदा डॉक्टरांचे महत्व आणि योगदान याचे मोल अधोरेखीत झाले आहे. जिल्ह्यातही आज कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणत रूग्णसंख्या नियंत्रण करण्यात यंत्रणेला यश मिळाले आहे. यात निश्चितच डॉक्टरांचा, आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. सर्व यंत्रणांच्या उत्तम समन्वयातून आपण हा संसर्ग वेळीच रोखू शकलेलो असून या आपत्तीत गंभीर रूग्णांना बरे करण्यात घाटी यशस्वी ठरली आहे. प्रशासनाने या आरोग्य आपत्तीत घाटीमध्ये उपचार सुविधा बळकटीकरणाला प्राधान्य देत अद्ययावत उपचार सुविधा त्या ठिकाणी सुरू केल्या आहे.

तसेच आता आरोग्यसेवा मजबुतीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपली वाटचाल सुरू करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिक मेहनत, कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. कृतज्ञतेच्या भावनेने देश, समाजप्रती सेवा देण्याची भावना मनात ठेवुन आपली शैक्षणिक कारकिर्द समृद्ध करावी. ज्या प्रमाणे सैनिक अहोरात्र सिमेवर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडतात त्याची जाणीव ठेवत आपण प्रत्येकाने आपापले काम उत्तमरित्या करणे, त्या कामाला योग्य न्याय देणे म्हणजे आपल्या परिने देशसेवेत योगदान देनेच आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करावे, असे श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.
अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी यावेळी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये, वैद्यकीय शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
********