मोदीजी, दिवे विझवाल पण उगवतीच्या सुर्याचे काय ?

24

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

दिल्लीत शेतक-यांच्या मागण्या घेवून येणा-या शेतक-यांना घाबरून या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावर खिळे ठोकले, आंदोलनाचा प्रसार-प्रचार होईल म्हणून इटरनेट बंद केले, कुंपन घातले, चीन-पाकीस्तानच्या सीमेवर दिसत नाही अशी तैनाती फौज आपल्याच देशातील नागरिकांच्या विरोधासासाठी तैनात ठेवली होती. तत्पुर्वी भाजपाचे काही आमदार शेकडो लोक घेवून आंदोलकांना भिडण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले होते. आंदोलन शेतक-यांचे आंदोलन व त्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसी फौजफाटाही गेला होता. देशाच्या इतिहासात असला हलकट प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आणीबाणीच्या काळात सत्तेने बेफाम झालेल्या इंदीरा गांधींनीही असला बेवकुफपणा केला नव्हता तो या महाशयांनी केला.

या देशावर दिडशे वर्षे राज्य करणा-या इंग्रजांनीही जे केले नाही ते स्वत:ला चौकीदार व सेवक म्हणवणा-या या फकड्याने केले. चौकीदार साहेबांनी मालक असलेल्या जनतेच्या वाटेत खिळे ठोकले. खरेतर ही घटना, हा दिवस भारताच्या इतिहासातील काळे पान ठरल्याशिवाय राहणार नाही. कदाचित येणा-या काळात इतिहासाची विभागणीसुध्दा रस्त्यावर खिळे ठोकण्यापुर्वीचा भारत आणि खिळे ठोकल्यानंतरचा भारत अशी होवू शकते. ही घटना वरवर सामान्य वाटत असली तरी ती सामान्य नाही. भारताच्या इतिहासातील दुर्लक्षित न करता येणारी ही बाब आहे. संघ परिवाराने जन्माला घातलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या बिंजांकूराचे हे थेट प्रकटण आहे. तथाकथित राष्ट्रवादाच्या पोटात वाढलेल्या या हुकूमशहा बाळाचे पहिले पाऊल या निमित्ताने दिसून आले आहे. भविष्यात त्याचे अधिक उग्र रूप भारताच्या जनतेला पहायला मिळू शकते. जर्मनीत ज्यू लोकांना संपवण्यासाठी गँस चेंबर काढणारे आणि दिल्लीच्या रस्त्यावर खिळे ठोकणारे दोन्ही एकाच लायकीचे आहेत हे लवकरच देशाला कळेल.

खरेतर सध्या या सगळ्या बाबींवर लिहीण्याची मानसिकता नाही. जन्मदाती अंथरूणावर खिळून आहे. तिच्या वेदना मुकपणे सहन कराव्या लागत आहेत. तिची अवस्था पाहता बाकी काही डोक्यात येत नाही. पण या प्रकाराने मन अस्वस्थ झाले आहे. जिने जन्म दिला ती माता आणि जिच्या कुशीत जन्म घेतला ती माती या दोन्हीही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. दोन्हीत फरक फक्त वेलांटीचा आहे. जिच्या कुशीतून जन्म घेतला तिच्या वेदना पाहू शकत नाही तर जिच्या कुशीत जन्म घेतला त्या भारतमातेच्या आणि शेतकरी बापाच्याही वेदना मुकपणे कशा काय पाहू शकतो ? तिची परवड, तिची अवहेलना कशी सहन करू शकतो ? म्हणूनच हा लेखनप्रपंच.

गेल्या सत्तर दिवसाहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करतायत. ते दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत बसले आहेत. थंडीने अनेकांचा जीव गेला आहे. त्यांना न्याय देण्याऐवजी, प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याऐवजी त्यांनाच खलिस्तानी, देशद्रोही ठरवण्याची कारस्थानं रचली आहेत. सोशल माध्यमात आणि प्रमुख माध्यमातल्या कारस्थानी व पाताळयंत्री मानसिकतेनी या आंदोलकांना खलिस्तानी, देशद्रोही ठरवण्याचे उद्योग चालवले आहेत. त्यासाठी २६ जानेवारीच्या निमित्ताने भाजपाच्या दिप सिध्दू सारख्या नाच्यांनी दंगल सदृष्य वातावरण घडवून आणले. शेतकरी चळवळ आणि शेतकरी बदनाम कसा होईल ? याची पुरेपुर तरतुद केली आहे. अखेर या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्याने घाबरगुंडी उडालेल्या व छप्पन इंच छाती आणि दिड इंच मन असलेल्या महापुरूषाने खिळे काढले. लगेच संघी गोतावळ्याने त्यावरही भाष्य करायला सुरूवात केली. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप म्हणत त्यावर कला व क्रिडा क्षेत्रातील छुपे चड्डीवाले बोलते केले. त्यांना एकच स्क्रीप्ट देवून बोलायचा आदेश केला गेला.

हे महाभाग यापुर्वी आंदोलनाबाबत काही बोलले असते तर काहीच प्रश्न नव्हता. दुस-या देशातल्या संवेदनशिल व्यक्तींनी भाष्य केल्यावर या बोलक्या बाहूल्या बोलत्या झाल्या. त्यांचे बोलही अगदी ‘बोलू कौतुके’ सारखे होते. त्यातली अक्षरं, शब्दही बदललेले नव्हते. चड्डीधारी बापाची ऑर्डर झाली आणि खेळाडू, कलाकार नमस्ते, सदावत्सले गाऊ लागले. त्यांनी खुषाल बोलावं. व्यक्त होणे हा त्यांचा मुलभूत हक्क आहे तो आम्हाला मान्यही आहे पण पाऊणे दोन महिन्यात चकार शब्दही न काढणा-या बेट्यांनी एकच भूपाळी सादर करावी याला आमचा आक्षेप आहे. असो शेवटी ते ही चड्डी गँगचेच आहेत दुसरं काय बोलणार ?

छप्पन इंच छातीचे मार्केटींग करणारा हा माणूस किती भित्राव लेचापेचा आहे ते परवाच्या घटणेन दाखवून दिले. हुकूमशहा नेहमी भित्रे व पळपुटेच असतात. ते मेंदू नावाचा अवयव संपलेल्या गर्दीच्या, सैन्याच्या जोरावर मनातली विकृती जनतेवर लादत असतात, लोकांच्यावर राज्य करत असतात. गेल्या पाऊणेदोन महिन्यात एकदाही या आंदोलनाबाबत जाहिरपणे आपले मत व्यक्त न करणा-या, त्यांची भेट न घेणा-या या माणसाने तिरंग्याच्या अपमानावर बोलावे, त्यासाठी तोंड उघडावे यासारखा दुसरा विनोद व योगायोग कोणता ? मोदींनी रस्त्यावर खिळे ठोकल्याने, कुंपन घातल्याने लोकांच्या मनातली खदखद व असंतोष संपणार नाही. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलणा-या लोकांचा वारसा या देशाला आहे. त्या क्रांतीकारकांचे वारस या मातीत राहतात. ते वारस आज इस्ट इंडीया कंपनीच्या नव्या आवृत्तीविरोधात लढायला ठाकले आहेत. ते या खिळ्यांना, कुंपनांना काय घाबरणार आहेत. अंधरातल्या भानगडी करणा-या लोकांना नेहमी प्रकाशाचे वावडे असते. ते प्रकाशाला घाबरत असतात.

चुकून एखादा कवडसा जरी दिसला तरी तो झाकण्याचा प्रयत्न करतात, कारण अंधाराच्या जीवावरच यांचे साम्राज्य चालते. मग तो अंधार भितीचा असो की गुलामीचा. सध्या भारत देशात मोदींनी माध्यमांना हाताशी धरून गुलामांची झुंडच्या झुंड उभी केली आहे. माध्यमांच्या जीवावर आपली अजेय प्रतिमा उभी केली आहे. आपल्याला कोणी हरवू शकत नाही, आपल्याला कोणी रोखू शकत नाही असे आभासी वातावरण तयार केले आहे. या आभासी वातावरणाला छेद देण्याचे काम या शेतकरी आंदोलनाने केले आहे. मोदींच्या एकतर्फी सत्तेला कुणीतर आव्हान देवू शकते, कुणीतर मोदींची घमेंड उतरवू शकते हे इतर लोकांना लक्षात येवू नये म्हणून आंदोलकांचे आवाज दाबण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. लोकांच्यातला भितीचा अंधार अबाधित ठेवण्यासाठी विरोध करणारे प्रकाशाचे दिवे विझवण्याचे काम मोदी करू लागले आहेत. छोटे छोटे दिवे विझवून आपण प्रकाश नष्ट करू या भ्रमात हे महाशय आहेत पण या निमित्ताने अगणित क्रांतीचे सुर्य उगवू लागले आहेत त्याचे काय ?

मोदीजी ! तुम्ही रस्त्यावर खिळे ठोकून दिवे विझवाल पण उगवतीच्या सुर्यांचे काय ? त्यांना कसे आवरणार ? या निमित्ताने तुमच्या छप्पन इंच छातीत कापरे भरल्याचे आता लोकांच्या लक्षात येते आहे. तुमच्या प्रचारासाठी, आभासी प्रतिमा जपण्यासाठी कितीही हुजरे, लाचारांच्या व गुलामांच्या फौजा उभ्या करा ती आता उध्वस्त होवू लागली आहे. दिवे विझवाल पण या सुर्यांना नाही आवरू शकत तुम्ही. हे सुर्य जेव्हा तळपतील तेव्हा तुमचे जाती-धर्माच्या द्वेषावर उभारलेले अंधाराचे साम्राज्य लयाला जाईल. उद्या हे सुर्य उगवतील या भितीने महाशय दिवे विझवत सुटले आहेत. मोदींनी परवा दिल्लीच्या रस्त्यावर ठोकलेल्या खिळ्यातला एक ना एक खिळा भविष्यात या हुकूमशाही सत्तेवर लोक ठोकल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की.