कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवराय जयंती विशेष

90

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. भोसले घराणे शिवभक्त शिवाचे उपासक होते या वरून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता – राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब होते.

माँसाहेब जिजाऊ व बाल शिवबा पुण्यामध्ये राहू लागले तर शहाजीराजे भोसले आणि पुत्र संभाजीराजे हे बंगलोरला राहत होते. वयाच्या दहाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी झाला. महाराणी सईबाई यांच्या पोटी स्वराज्यरक्षक – स्वराज्याचे धाकलं धनी – दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला.

शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवरायांचे सर्व प्रकारचे शिक्षण – प्रशिक्षण पूर्ण झाले. सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली. १६४७ साली तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले.

कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले गुरू राष्ट्रमाता – राजमाता माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजे भोसले होते. माँसाहेबांनी शिवरायांना तलवारबाजी, घोडेस्वारी, गनिमी कावा – गनिमी कावा – ‘गनिम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे कपट’… छत्रपती शिवरायांचे मुरब्बी धोरण व प्रसंगावधान दृष्टिकोन लक्षात घेता हा शब्दप्रयोग कुठेतरी खटकतो. खरं म्हणजे शिवरायांचे कार्यकर्तृत्व लपवता येत नाही म्हणून मनुवाद्यांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीला ‘गनिमी कावा’ हे नाव दिले आहे. आपण सर्व शिवप्रेमींनी त्याला गनिमी कावा न म्हणता ‘शिवनीती’ असा शब्दप्रयोग करावा ही आग्रहाची विनंती…असे शिक्षण देऊन तरबेज केले.

मुरार जगदेवानं पुणे शहर उध्वस्त केलं होतं. ते नव्याने बसवण्याचा काम राजमाता जिजाऊंनी केलं. पुण्यामध्ये लाल महाल बांधला. शिवाजी महाराज हे न्यायी राजे होते. न्याय – निवाडा करतांना त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने एका तरुणीवर अत्याचार केल्याचे कळताच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय तोडून त्यास जबर शिक्षा दिली अन्याय – अत्याचार करणाऱ्यांवर वचक निर्माण केला. माँसाहेब जिजाऊ शहाजी राजे यांच्या प्रमाणे देहू गावाचे संतश्रेष्ठ – विद्रोही संत – संत तुकाराम महाराज यांचेही मार्गदर्शन छत्रपती शिवरायांना लाभलं म्हणून राष्ट्रसंत तुकाराम महाराज हे देखील छत्रपती शिवरायांचे गुरु होते. संत तुकाराम महाराजांनी शिवरायांना छत्रपती ही पदवी बहाल केली.

काही इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचे गुरू दादा कोंडदेव व रामदास होते असं सांगितलं जातं. खरे तर दादा कोंडदेव ( कुलकर्णी ) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत हे महाराष्ट्र सरकारने संशोधनाअंती सिद्ध केले आहे. एवढेच नव्हे राज्य सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे क्रीडा पुरस्कार दिले जातात. सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकास दादाजी कोंडदेव या नावाने पुरस्कार दिला जात असे आता या पुरस्काराचे नाव बदलून “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक “असे करण्यात आले आहे. रामदास हा आदीलशहाकडे चाकरी करत होता. छत्रपती शिवरायांचा रामदासाचा कधीही संबंध आला नाही. जर छत्रपतींचे रामदास गुरु होते तर राज्याभिषेकाच्या वेळेस ते कुठे होते ? महाराजांनी अनेक किल्ले जिंकले त्या वेळी रामदास कुठे होते ? हा प्रश्न वाचकांना पडल्याशिवाय राहत नाही.

विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र आणण्यासाठी राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांचे आठ विवाह लावून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ अपत्ये झाली. छत्रपती शिवरायांनी बाराबलुतेदार सर्व जाती – धर्मातील लोकांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले.

काही लोक म्हणतात छत्रपती शिवराय हे मुस्लिमविरोधी होते. मला सांगावेसे वाटते छत्रपती शिवाजी महाराजांकडे ७०० पठाणांची फौज होती. छत्रपती शिवरायांचे ३५ ते ४० टक्के सैन्य मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन सेनापती दर्यासारंग व दौलतखान हे मुसलमान होते. छत्रपतींचे दोन अंगरक्षक मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम हे मुसलमान होते. छत्रपती शिवरायांचे प्रथम चित्र मीर महंमद या मुस्लीम चित्रकाराने काढले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राजा हा किताब हा औरंगजेबाने दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खाना बद्दलची माहिती रुस्तुम ए जमान या मुस्लीम समाजाच्या व्यक्तीने दिली होती एवढेच नव्हे तर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनखे बनवून दिले होते. एवढेच नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे आयुष्यात एकही मस्जिद पाडली नाही उलट मशिदी बांधून दिल्या अगदी अफझलखानाचे थडगे देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधले. छत्रपती शिवाजी महाराज कुराणाचा आत्यंतिक आदर करायचे, मस्तकी लावायचे व मुसलमान शिपायांकडे सुपूर्द करायचे. वरील सर्व घटनांवरून हे सिद्ध होते की छत्रपती शिवराय हे मुसलमान विरुद्ध नव्हते हे फक्त ब्राह्मणांचे षड्यंत्र आहे यांचा हा कुटील डाव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

स्वराज्यावर चालून आलेली असंख्य संकटे छत्रपती शिवरायांनी पडतावून लावली. १० नोव्हेंबर, १६५९ रोजी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. सिद्धी जोहरने पन्हाळगडास टाकलेल्या वेढ्यातून सहीसलामत निसटले. यावेळी नाभिक समाजातील शिवाजी काशीद यांनी आपले बलिदान दिले. शाहिस्तेखानाची बोटे छाटली. येसाजी कंक, संभाजी कावजी, सिद्धी इब्राहीम, कृष्णाजी गायकवाड, जिवाजी महाले, विसाजी गुरूंबक, कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, कृष्णाजी बांदल, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, शिवाजी काशिद, मुरारबाजी, फिरंगोजी नरसाळे, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, रुपाजी भोसले, खंडोजी जगताप, गोदाजी जगताप, हरजीराजे महाडिक, संताजी जगताप, मानाजी मोरे, मोरोपंत, विसाजी बल्लाळ, कोंडाजी फर्जंद, हिरोजी फर्जद, मदारी मेहतर, काझी हैदर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, हिरोजी इंदुलकर, नागोजी जेधे, आरमार दलातील दौलतखान, दर्यासारंग, गुप्तहेर खात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक यासारख्या असंख्य मावळ्यांच्या सहकार्यातून आणि बलिदानातून स्वराज्य निर्माण केलं.

स्वराज्याचा रिता झालेला खजिना भरून काढण्यासाठी व जनतेची पिळवणूक करत मस्तवाल झालेल्या धनदांडग्यांना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी ५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेवर स्वारी केली. या घटनेमुळे मोगल डच आणि इंग्रज अधिकारी प्रचंड भयभित झाले.

दिलेरखानाने पुरंदर ला दिलेला वेढा हे स्वराज्यावरील फार मोठे संकट होते. मुरारबाजीने पराक्रमाची शर्थ केली. मराठे निकराची झुंज देत होते परंतु किल्ला मोघलांनी जिंकला आणि इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह आणि महाराजांना तेवीस किल्ले औरंगजेब बादशहा देण्याचे मान्य करावे लागले. संभाजीराजांना ओलीस ठेवून स्वतः औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा येथे जाण्याचे मान्य करावे लागले. आग्रा येथे महाराजांना कैद झाली. कैदेतून शंभूराजांना अत्यंत कुशलतेने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका केली. स्वराज्यात आल्यानंतर महाराजांनी शत्रूकडे गेलेले किल्ले व प्रदेश परत मिळवला.

६ जुन १६७४ छत्रपती शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्या काळी कोणीही ब्राह्मण भट राज्याभिषेकाला तयार होत नव्हते. महाराजांना शूद्र म्हणून लेखत होते. म्हणून छत्रपती शिवरायांनी आग्र्याहून गागाभट्टांना बोलविले व राज्याभिषेक केला. महाराज छत्रपती झाले. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब डोक्यावर छत्र धारण केलेल्या आपल्या लाडक्या लेकराला डोळे भरून पाहत होत्या.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे १७ जुन १६७४ रोजी निधन झालं. महाराज पोरके झाले. मातृछत्र हरवलं. अल्पावधीतच शिवाजी महाराजांनी २४ सप्टेंबर , १६७४ ला स्वतःचा अवैदिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते. अंधश्रद्धा मुळीच नव्हते. दैवावर – नशिबावर विसंबून न राहता कर्तुत्वावर विश्वास ठेवून राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांनी संकल्प केलेले स्वराज्य प्रत्यक्षात आणलं. छत्रपती शिवरायांनी सर्व लढाया या अमावस्या च्या रात्री शिवनिती ने लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. महाराज आपल्या सैनिकांना सन्मानाने वागणूक देऊन हाक मारीत असत. म्हणून प्रत्येक मावळा महाराजांसाठी आपले बलिदान द्यायला तयार होत होता.

छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्यात एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. उलट रयतेच्या राज्यात चेतावणी महाराजांनी दिली होती की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला त्याची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांना मोफत कर्ज उपलब्ध करून दिले. कुठल्याही प्रकारचे व्याज त्यांच्याकडून घेतलं नाही. असे आदर्श राजा छत्रपती शिवराय होते.

छत्रपती शिवरायांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. तो वार एवढ्या जोराचा होता की छत्रपती शिवरायांचा जिरे टोप फोडून तो वार आत गेला त्यांच्या डाव्या कपाळावर जखम झाली. उभ्या आयुष्यात छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण शरीरावर तेवढीच जखम होती. अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा, दिल्लीचा औरंगजेब बादशहा एवढेच नव्हे तर अफजलखान सुद्धा ही जखम शिवरायांना देऊ शकला नाही ती जखम कृष्णा भास्कर कुलकर्णी या ब्राह्मणाने दिली. पुढे चालून कृष्णा भास्कर कुलकर्णी याने छत्रपतींना जीवे मारण्याचा प्रयत्न केला पण छत्रपतीनींच कृष्णा भास्कर कुलकर्णी चे तुकडे – तुकडे केले.

छत्रपती शिवरायांना अवघे ५० वर्षाचे आयुष्य लाभलं अखेर ३ एप्रिल १६८० ला शिवरायांनी आपला देह ठेवला.

कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर प्रथम समाधी शोधून जीर्णोद्धार करणारे, छत्रपतींवर पहिला पोवाडा लिहिणारे, त्यांची पुण्यामध्ये पहिली १० दिवसाची शिवजयंती साजरी करणारे, त्यांच्यावर पहिले पुस्तक लिहिणारे आणि त्यांना कुळवाडीभूषण ही उपाधी देणारे माळी समाजाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे होते. तात्यासाहेबांनी छत्रपती शिवरायांना गुरू मानुन त्यांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचं महान कार्य केलेले आहे. एवढेच नव्हे तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सातासमुद्रापार रशियात छत्रपती शिवरायांचा इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून पोहोचविला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला भारतीय संविधान लिहितांना कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही कारण छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, शिवनिती माझ्या समोर होती.

कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक – क्षत्रिय कुलवतसं – राजाधिराज – रयतेचे प्रजा वत्सल राजे छत्रपती शिवरायांना माझा त्रिवार मानाचा मुजरा !……

✒️मा.पी.डी.पाटील सर(उपशिक्षक – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव.जि.जळगांव)मो:-९४०३७४६७५२