मोडनिंब येथे आज (बुधवार 10 फेब्रुवारी)महसूल विभागाच्या वतीने ” प्रलंबीत फेरफार अदालत” विशेष कार्यक्रम

22

🔸जागेवरच दुरुस्त सातबारा व फेरफार उतारे मिळणार-आ.बबनदादा शिंदे

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.9फेब्रुवारी):-माढा तालुक्यातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोंदी जागेवरच रीतसर करून देण्यासंदर्भात विशेष फेरफार अदालत मोहीम अंतर्गत ,बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मोडनिंब येथील शिव पार्वती मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे ,आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण आदी संबंधित महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या विशेष फेरफार अदालत मोहिमेचा प्रारंभ माढा तालुक्यातून होत असून या कार्यक्रमास माढा सहित मोहोळ आणि करमाळा येथील शेतकरी व नागरिकांना 7/12 उताराचे वाटप करण्यात येणार आहे.

माढा तहसिल कार्यालयातील 31 जानेवारी 2021 पर्यंत माढा तहसील कार्यालयात 1150 नोंदी प्रलंबित आहेत. यामध्ये खरेदी विक्री व्यवहार, बक्षीस पत्र, गहाण खत, हक्कसोडपत्र, वारस नोंदी, पोटहुकूमनामे आदी सर्व प्रकारांचा समावेश आहे .यातील काही प्रलंबित नोंदी बुधवारी दहा फेब्रुवारीपासून जागेवरच निर्गत करून त्यांचे सातबारा व फेरफार उतारे वाटप करण्यात येणार आहेत. या विशेष प्रलंबित फेरफार अदालत मोहीम कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहून आपली प्रलंबित कामे रीतसर करून घ्यावीत व जागेवरच 7/12 व फेरफार उतारे घ्यावेत असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.