बहुरंगी व्यक्तिमत्व शाहीर डॉ. राजु राऊत

29

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.10फेब्रुवारी):-समाजातील काही असामान्य व्यक्तींना वेगळ्या ओळखीची गरज नसते, त्यांनी समाजासाठी केलेले कार्य हीच त्यांची खरी ओळख! त्यातीलच एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व म्हणजे ‘श्री’.डॉ.राजु राऊत. त्यांच्या निस्वार्थी कार्यपद्धतीने स्वतःचा ठसा उमटविला आहे, त्यांच्याइतक्या आदर्श व्यक्ती बोटावर मोजण्याइतक्याच सापडतील. त्यांच्या सेवाभावी वृत्तीने ४ दशकांपेक्षा अधिक काळ निर्विवादपणे एक परिपुर्ण आदर्श व्यक्तीमत्व म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे.

गेली चाळिस वर्षे ऐतिहासिक, तसेच कला व संस्कृतीचा वैभवी वारसा जतन करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि त्याबरोबरच पुरोगामी सामाजिक व पर्यावरणीय चळवळींना बळ देण्यासाठी लेखणी व डफ हाती घेतलेल्या शाहीर राजू राऊत यांच्या विषयी….ख्यातनाम मराठी लोकशाहीर. राजु कृष्णाजी राऊत हे त्यांचे मूळ नाव. कोल्हापुरात शिवाजीपेठेत संस्कारिक कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा वडिलाकडून लाभला होता. रांगड्या कोल्हापुरात रंकाऌयावरल्या रेशमी वारयाच्या झुऌकीने व वडिलांच्या छत्रछायेखाली त्यांच्यात प्रखर शाहीरी जागवली.लहान लहान शाहिरी गाणे गात आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी शाहिरी चळवळीचा यशस्वी प्रचार केला. वडील कृष्णाजी राऊत यांच्या प्रेरणेने राजू राऊत यांनी लहानपणापासून शाहीरीचे धडे घेतले.स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत.

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये ,व्याख्याने इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती.रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते.1997 साली मायावती यांच्या प्रेरणेने लखनौ येथे शाहू मेळ्यामध्ये पदार्पण. त्यानंतर गेल्या 21 वर्षात देशात जवळपास 9 राज्यांमध्ये आणि मॉरिशससारख्या देशामध्ये महाराष्ट्राच्या लोककलेतील रांगड्या पोवाड्यांचे सादरीकरण केले. आजवर जवळपास 1500 हून अधिक शाहिरीचे कार्यक्रम केले आहेत. महाराष्ट्रातील शाहिरीतील बहुतेक सर्व मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. पुणे येथे महाराष्ट्र शाहिरी परिषदेचा ‘युवा शाहीर’ पुरस्कार साता-याचा मानाचा ‘भाऊ फक्कड’ पुरस्कार लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार चित्रतपस्वी भालजी पुरस्कार डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, नेरुळ येथे डी.लिट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राऊत हे बहूरंगी व बहूढंगी कलाकार असले तरी केवळ शिवस्तुती आणि सामाजिक हितासाठीच शाहिरी व डफ वापरायचा या बाण्याने शाहिरी जपण्याच्या अव्यभिचारी निष्ठेचाही यामुळे सन्मानवझालाआहे.शाहिरी,चित्रकला,शिल्पकला,छायाचित्रण,घोडेस्वारी,तसेच इतिहास व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनिय आहे.त्यानी विविध विषयावर लेखन केले असुन आजही ते विविध वर्तमानपत्रात लेख लिहितात.सामाजिक, सांस्कृतिक, सुरक्षा, क्रीडा या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारे डॉ.राजु राऊत यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे कोल्हापुरकरांसाठी नेहमीच आदर्श ठरले आहे.

शिवाय त्यांची “पोवाड्यांचे पोवाडे” हि कविता कर्नाटक सरकारने इयत्ता आठविच्या शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ठ केली आहे. त्यांच्या भेटीचा योग कालच दि ६ फेब्रुवारी २०२१ रोजी आला.

*अश्वारुढ छत्रपतींचे देखणे शिल्प*
त्यांच्या घरी शिवाजीपेठेत सपत्निक मी भेट दिली व दिलखुलास गप्पा मारल्या.त्यावेळी त्यांच्या समर्थ हातानी घडवलेला छ.शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यात आला.तो पुतळा मिणचे ता.हातकणंगले येथे बसविणार असल्याचे शाहीर राऊत यांनीं सांगितले.एका पायांवर उधळलेला घोडा आणि अश्वारुढ शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरील करारी भाव स्तिमीत करणारे आहेत.सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पांतील वैशिष्ट्ये पाहताच जाणवतात.शाहिरांच्याकडे पाहिल्यावर एक परिपूर्ण, निपुण, आदर्श समाजसेवकाचे सर्व गुण त्यांच्यात भरभरुन असल्याचे दिसून येते. एवढे असूनसुध्दा त्यांना कोणत्याही गोष्टीचे गर्व नाही. यामुळेच त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे त्यांच्या सोबत आहेत.लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांने ते आजही कार्यरत आहेत.त्यांना माझ्या शुभेच्छा.
___________________________