उत्क्रांतीवादाचा जनक : चार्ल्स डार्विन

30

उत्क्रांती वादाचा जनक असे ज्यांना समजले जाते त्या चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा आज जन्मदिन. चार्ल्स डार्विन हे विख्यात जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात जगातील जीवसृष्टीची उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरित्या उलगडून दाखवले. चार्ल्स डार्विन यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात झाला.त्यांचे वडील रॉबर्ट डॉक्टर तर आजोबा इमर्सन शास्त्रज्ञ होते. शालेय जीवनात त्यांना रसायन शास्त्राची खूप आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्यांनी आपल्या घराबाहेर एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती तिथे ते तासनतास प्रयोग करीत बसत. ते असे एकाच जागेवर तासनतास प्रयोग करीत बसत असल्याने मित्र मंडळी त्यांची नेहमी टर उडवत पण ते त्याकडे कायम दुर्लक्ष करीत. त्यांना निसर्गाचीही खूप आवड होती. पुढे त्यांची डॉ ग्रांट यांच्याशी ओळख झाली. डॉ ग्रांट हे स्वतः प्रसिद्ध जीव शास्त्रज्ञ होते. १८२५ मध्ये डार्विन यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या क्राईस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तिथे त्यांना कीटक व निसर्गातील जीव जिवाणूंच्या निरीक्षणाचा नाद लागला. १८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिका संशोधनाची मोहीम आखली त्यात ते सहभागी झाले.

त्या मोहिमेवर ते पाच वर्ष होते. तिथे त्यांनी निरनिराळे पक्षी, प्राणी, कीटक, जीवजंतू एकमेकांशी कसे वागतात. ते एकमेकांशी आणि निसर्गाशी कसे जुळवून घेतात याचे निरीक्षण व अभ्यास केला व तेथे उत्क्रांतीवाद, सहजीवन, बळी तो कान पिळी ही मूलभूत नैसर्गिक तत्वे ते शिकले. याच दरम्यान माणसाचा मूळ पुरुष, चार पायी माकडपासून झाला असला पाहिजे असा विचार त्यांच्या डोक्यात घुमू लागला. त्यांनी याचे खूप संशोधन केले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले यासंदर्भातही त्यांनी खूप संशोधन केले. या संशोधनावर आधारित ओरिजन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथातच त्यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला आहे. या ग्रंथाच्या १२५० प्रति एकाच दिवसात विकल्या गेल्या. या ग्रंथामुळे त्यांचे सर्वत्र त्यांचे नाव झाले. या ग्रंथात त्यांनी मांडलेला उत्क्रांतीवादाचा सिध्दांत बायबलच्या विरुद्ध जात होता म्हणून अनेकांनी या सिद्धांताला विरोध केला. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जातो म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्सफर्डमध्ये विलबर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन यांचा एकीकडे पुरोगामी विचारांचे लोक समर्थन करीत होते दुसरीकडे प्रतिगामी लोक विरोध करीत होते. पण या सर्व घडामोडींचा डार्विन यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता त्यांचे संशोधन चालूच होते. बिशप डार्विनला कडाडून विरोध करीत असताना हक्सले डी हुकर हे शास्त्रज्ञ मात्र डार्विन यांची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडत होते. त्यामुळे उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला कडाडून विरोध करणाऱ्या बिशपला अखेर माघार घेऊन डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)९९२२५४६२९५