सामाजिक संघटनांमध्ये सत्ता बदलाची ताकद यायला हवी- मुक्ता दाभोलकर

39

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.12फेब्रुवारी):-जिजाऊ-सावित्री-रमाई या थोर स्त्रियांनी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून आपल्या सामाजिक कार्याने इतिहासात नोंद केली. परंपरेने लादलेले शोषण, अन्याय, अत्याचार याविरुद्ध त्यांनी सातत्याने संघर्षपूर्ण लढाई उभी केली. परिणामी रयतेचे राज्य निर्माण झाले. प्रत्येक स्त्रिला शिक्षण मिळू लागले. यातील सेवाभावी वृत्ती, त्याग, समर्पण, आणि लोकनिष्ठा ठेवल्यानेच येथे परिवर्तन घडल्याचे दिसते. मात्र सद्य परिस्थितीमध्ये पुरागामी विचारांनी काम करणार्या संघटना, सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. जिजाऊ-सावित्री-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे सरकार निर्माण होऊ शकत नाही. मात्र विशिष्ट एका समुहाचे हीत केंद्रीत करुन सत्तेच्या खुर्च्या मिळवत गेल्याने गोर-गरीबांचे, शेतकर्यांचे प्रश्न अधिकाधिक तीव्र होताना दिसतात.

त्यामुळे शोषित, वंचितांसाठी काम करणार्या सामाजिक संघटनामध्ये सत्ता बदलाची ताकद आली पाहिजे, असे मत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.
रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने दिला जाणारा जिजाऊ-रमाई समाजभूषण पुरस्कार यंदा मुक्ता दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. रोख रक्कम, शाल, पिंपळ वृक्षाचे रोप, सन्मानपत्र, गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. हा पुरस्कार ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. वैशालीताई चांदणे, रावसाहेब पटवर्धन महाविद्यालयाच्या प्राचार्या वृंदा हजारे प्रमुख उपस्थित होत्या. तर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

यावेळी उल्हासदादा पवार म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या समाज सुधारणेचा वारसा मुक्ता दाभोलकर समर्थपणे चालवत आहेत. जिजाऊ-रमाई पुरस्कारासाठी त्यांची निवड अगदी यथोचितच आहे. देशभरामध्ये विचारवंतांच्या हत्येचे जे सत्र सुरू झाले. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या पाच विचारवंतांचे खुणी अद्यापपर्यंत सापडत नाहीत, ही शोकांतिका आहे. केंद्रीय तपासयंत्रणेचे अपयश आहे. विचारवंतांचे खून या ठराविक विचारसरणीच्या लोकांकडून केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता त्या विचारधारेेच्या लोकांनी हत्या करण्याचे खून करण्योच मार्ग बदलून विचारवंतांना नक्षलवादी, देशद्रोही, दहशतवादी ठरवून त्यांना बदनाम करून कारागृहात डांबण्याचे प्रकार सुरू केले आहेत.

याविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. पुणेमनपा आणि पुणे शहर पोलिसांनी लालमहाल येथे कार्यक्रमापुर्वी अर्धा तास आधी परवानगी दिल्याने अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अॅड. वैशाली चांदणे, गोविंद साठे, रामचंद्र निंबाळकर, प्राचार्या वृंदा हजारे, उमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपक म्हस्के यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय कार्यालय सचिव दिपक पवार, अपर्णा साठे, गिरीष घाग, नम्रता पवार, दिव्या कोंतम, यशस्वीनी नवघणे, उमा नवघणे, गिता साका, मिना शिंदे, सुरेखा कुसाळकर, ज्योति वाघमारे, माऊली जाधव, विकास साठे यांनी परिश्रम घेतले.