चीनवर कदापि विश्वास ठेवू नये

28

चीनने लडाख मधील पॉंगँग सरोवराच्या काठावरील सीमेवरुन आपले सैन्य माघे घेण्यास सुरुवात केल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली. मागील वर्षी चीनने भारताच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी करुन भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून चिनी आणि भारतीय सैनिकांत चकमकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन्ही सैन्य समोरासमोर आल्यामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. केंव्हाही युद्धाला तोंड फुटेल अशीच परिस्थिती असतानाही सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेचा मार्ग सोडला नाही. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर अखेर चीनने माघार घेण्यास सुरुवात केली ही समाधानाची बाब आहे. याबाबत भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक करावेच लागेल. यासोबतच आपल्या सैनिकांनाही सलाम करावा लागला.

कठीण आणि प्रतिकुल परिस्थिती असतानाही आपल्या सैनिकांनी चिनी सैनिकांना जशास तसे उत्तर देऊन त्यांची घुसखोरी रोखली. चीनने माघार घेण्यास सुरुवात केली असली तरी चीनवर भारताने अजिबात विश्वास ठेवता कामा नये. चीनची माघार ही खरोखर माघार आहे की त्यामागे त्यांचा कुठला डाव आहे याचा देखील शोध घ्यायला हवा. याचे कारण म्हणजे चीनने आतापर्यंत केलेला विश्वासघात. चीन हा जगातील सर्वाधिक अविश्वासू देश आहे. चीनवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेणे. याचा अनुभव याआधी आपण अनेकदा घेतला आहे. १९५५ साली चीनने भारताशी मैत्रीचे नाटक करून तिबेटमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर १९६२ मध्ये भारताशी पंचशील करार करून हिंदी चिनी भाई भाई म्हणत मैत्रीचा हात पुढे केला. भारताने त्यांच्यावर विश्वास ठेवला. पंचशील कराराची शाई वाळत नाही तोच चीनने भारताचा विश्वासघात करून बेसावध भारतावर आक्रमण केले.

या युद्धात चीनने भारताच्या मोठ्या भूखंडावर कब्जा केला. त्याचीच पुनरावृत्ती १९६७ साली त्यांनी सिक्कीममध्ये केली. १९७७ साली त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनने सीमेवरील ३८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे शिवाय मूळ भारताच्या मात्र सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेले ५ हजार ३८० चौरस किलोमीटर क्षेत्रही पाकिस्तानकडून मिळवले आहे. अरुणाचल प्रदेशातील तब्बल ९० हजार चौरस किलोमीटर भागावर आपला हक्क सांगितला आहे शिवाय सिक्कीम, लडाख या भागावर देखील चीन आपला हक्क सांगतो. म्हणूनच चीन या भागात नेहमी आक्रमण करीत असतो त्याच्याच एक भाग म्हणून जून २०२० मध्ये चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी केली. या भागात चीनने एक शहर वसवल्याचीही बातमी मध्यंतरी आली होती त्यामुळेच चीनची ही माघार म्हणजे त्यांना झालेली उपरती नसून त्यामागे काहीतरी डाव असल्याची शंका येते त्यामुळेच भारताने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

चीनच्या प्रत्येक हालचाली पारखून घ्यायला हव्यात. चीनच्या नरमाईच्या धोरणाला भुलून सिमेवरील पहारा कमी करण्याऐवजी तो अधिक कडक करायला हवा. चीनवर कदापिही विश्वास ठेवू नये नाहीतर त्याची मोठी किंमत आपल्याला भविष्यात मोजावी लागेल.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५