वणी शाळेतील स्वयंपाकी मदतनीस महिलेला श्रवण यंत्राची मदत

25

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.14फेब्रुवारी):- दिंडोरी पंचायत समिती चे गट शिक्षण अधिकारी श्री भास्कर कनोज यांनी जिल्हा परिषद शाळा वणी येथे भेट दिली.तेथील स्वयंपाकी मदतनीस महिलेला काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांना समजले की त्या महिलेला ऐकू येत नाही,याची दखल घेत त्यांनी त्या महिलेला लोक सहभागातून २० हजार रुपये किमतीचे मशीन मिळवून दिले,महिलेला ऐकू यायला लागले तिचा आनंद गगनात मावेना,या अमूल्य मदतीमुळे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दिंडोरी तालुक्यातील वणी केंद्रातील वणी मुले शाळेत गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शैक्षणिक गुणवत्ता तपासणी कामी नुकतीच भेट दिली.शैक्षणिक गुणवत्तेचे परीक्षण केले,त्या नंतर शालेय पोषण आहार योजनेकडे मोर्चा वळवला.सदर आहार शिजवणार्या महिलेला पोषण आहार शी निगडित प्रश्न विचारले, सदर महिला हावभाव करून उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती त्यामुळे सुसंवाद होत नव्हता.

सोबत असलेले समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षक समाधान दाते यांनी ही बाब हेरली, त्या महिलेला श्रवण यंत्र उपलब्ध करून दिल्यास तिला ऐकू येईल ही बाब गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या निदर्शनास आणून दिली.क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला.त्या महिलेचा श्रवण ऱ्हास लक्षात घेऊन शिक्षकांच्या मदतीने सेमी डिजिटल २० हजार रुपये किमतीचे श्रवण यंत्र तत्काळ उपलब्ध करून दिले त्याचे नुकतेच वितरण करण्यात आले.

यावेळी गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी,केंद्रप्रमुख किसन पवार,विनायकुमार बिरारी,मुख्याध्यापक खैरनार,विशेष शिक्षक समाधान दाते,वनी मुले शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. विशेष शिक्षक समाधान दाते यांनी विशेष सहाय्य केले.

चौकट श्रीमती कविता गांगुर्डे, स्वयंपाकी मदतनीस,
आज मला श्रवण यंत्र मिळाल्याने मला ऐकू येत आहे,ही माझ्यासाठी आनंदाची,अभिमानाची बाब आहे.शिक्षण विभागाने दखल घेतल्याने, मी शिक्षण विभागाची आभारी आहे.मला जगण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे