हळदी कुंकू कार्यक्रमाचे राजकियकरण

महिलांचा सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. विशेषतः मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या निमित्ताने आसपासच्या महिला आपले दुःख विसरून एकत्र येतात. पण हल्ली हळदीकुंकू समारंभ देखील इतर सणाप्रमाणेच इव्हेंट बनला आहे. अलीकडे तर या सार्वजनिक हळदी कुंकू समारंभाचे पेवच फुटले आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास ९० टक्के हळदी कुंकू समारंभ हे राजकिय स्वरूपाचे व त्या हेतूने प्रेरित असल्याचे दिसते. ज्या शहरात किंवा गावात निवडणुका असतात तिथे तर हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. स्थानिक नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात अग्रेसर असतात. या निमित्ताने या कार्यक्रमास उपस्थित महिलांना आकर्षक व किंमती भेटवस्तूंचे वाटपही संबंधित राजकीय पक्षांचे नेते करीत असतात. हळदीकुंकू समारंभ हे एकप्रकारे राजकिय नेत्यांसाठी शक्तिप्रदर्शनाचे आणि प्रचाराचे माध्यम बनत आहे. राजकीय नेत्यांनी आयोजित केलेले हळदी कुंकू समारंभ हे महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठीच आयोजित केले जातात.

एरव्ही या महिलांना कोणी विचारीतही नाही. आज ज्याप्रमाणे राजकीय नेत्यांनी दहीहंडी, नवरात्र व गणेशोत्सव यासारख्या सार्वजनिक उत्सवात अतिक्रमण करून या उत्सवाचा इव्हेंट बनवला आहे त्याचीच पुनरावृत्ती हळदी कुंकू समारंभात होताना दिसत आहे. निखळ,कौटुंबिक आणि सांस्कृतिक स्वरूपातील या कार्यक्रमाचा दहीहंडी, नवरात्र व गणेशोत्सव या सणासारखा बाजारी आणि राजकीय वापर केला जात आहे. राजकीय नेते यातून आपला राजकीय मतलब साधत आहेत. राजकीय नेत्यांनी महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी हळदी कुंकू समारंभाचा वापर करण्याऐवजी महिलांचे प्रश्न सोडवावेत म्हणजे राजकीय नेत्यांना अशा सार्वजनिक कार्यक्रमाचा वापर करण्याची गरज पडणार नाही आणि हळदीकुंकू सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अवमूल्यनही होणार नाही.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED