मोदीजी, ती आंदोलनजीवी जमातच नष्ट करून टाका

28

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

परवा राज्यसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाची हेटाळणी आणि कुचेष्टा करताना आंदोलनजीवी हा उपाहासात्मक शब्द वापरला. तो शब्दप्रयोग करताना मोदींच्या मनात शेतकरी आंदोलनाबाबत किती तिरस्कार आणि द्वेष भरला आहे याची जाणिव होत होती. त्यांना शक्य असते तर त्यांनी ही सगळी जमात कापून काढली असती इतकी चिड त्यांच्या त्या कुचेष्टेतून जाणवत होती. मोदींच्या म्हणण्याशी सहमत नसणा-या व्यक्तीची ते नेहमीच हेटाळणी, टिंगल व टवाळी करत आलेत. इतरांच्यावर स्वत:चे म्हणणे लादण्याची त्यांची मानसिकता असल्याने समोरच्याचे काय म्हणणे आहे ते ऐकूण घेण्याचा प्रश्नच येत नाही. “मी म्हणतो तेच खरे !” हा स्वभाव असल्याने मोदी नेहमी विरोधकांची टिंगल, टवाळी व कुचेष्टा करत आलेत. परवा राज्यसभेत शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी तेच केले.

ते ज्या संविधानाच्या आधारावर प्रधानमंत्री झाले आहेत त्या संविधानाला त्यांनी चक्क फाट्यावर मारले आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनाची कुचेष्टा केली पण ख-या अर्थाने ती कुचेष्टा लोकशाही व्यवस्थेची आणि संविधानाची होती. मोदींना एकतर्फी सत्ता राबवायची सवय आहे. त्यांना स्वत:पेक्षा श्रेष्ठ आणि वरिष्ठ कुणी आवडत नाही. त्यांच्या व्यक्तीत्वाला आणि प्रवृत्तीला साजेशीच त्यांची जडणघडण झाली आहे. मोदी नावाचा गर्भ ज्या मातृसंस्थेने पोटात वाढवला ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संस्था याच प्रवृत्तीची आहे. तिचे तेच संस्कार आहेत. मोदींना प्रसवणा-या या मातृसंस्थेलाच जर लोकशाही मान्य नाही तर ती मोदींना कशी होईल ? लोकशाही व्यवस्थेची टिंगल करताना मोदी हे विसरले की आपण त्याच लोकशाही व्यवस्थेमुळे चहावाला ते प्रधानमंत्री असा प्रवास करू शकलो. परवा मोदी बोलत होते आणि त्यांच्यातला आंदोलनाविषयी असणारा तिरस्कार दिसून येत होता. त्यांची मजबुरी, त्यांची अस्वस्थता अजिबात लपून रहात नव्हती. या निमित्ताने मोदी नावाच्या हुकूमशहाचे खायचे दात हळूहळू समोर येवू लागले आहेत.

या देशाला आंदोलनाची फार मोठी परंपरा आहे. या आंदोलनांनीच हा देश घडवला आहे. मोदींच्या पक्ष संघटणेने इथपर्यंत पोहोचण्यासाठी वरवर का असेना आंदोलनाचे मार्ग चोखाळलेले आहेत. त्यांनी आतून दंगली भडकवल्या, धार्मिक तेढ निर्माण केली पण वरवर तरी आंदोलनाचे मार्ग स्विकारलेले आहेत. या पुर्वीचे भाजपचे नेते किमान ती व्यवस्था मान्य करत होते, त्या व्यवस्थेचा आदर करत होते. गुजरातमध्ये दंगल भडकताना डोळे मिटून बसलेल्या मोदींना म्हणूनच अटलजींनी राजधर्माची आठवण करून दिली होती. मोदींनी मात्र या व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीने लोकशाहीने दिलेल्या अधिकाराची टिंगल करावी, टर उडवावी हे घातक आहे. याला खाल्ल्या ताटात घाण करणे म्हणतात. मोदींची टिका संघालाही इच्छा असून थेट मान्य करता आली नाही. त्यांनी लगेच नितिन गडकरींना त्यावर बोलते केले. मोदींची भूमिका चुकीची व दुर्दैवी असल्याचे गडकरींनी सांगितले आहे. हे सांगताना तिथे रवीशंकर प्रसादही उपस्थित होते.

याचा अर्थ हा की संघालाही अजून थेट या व्यवस्थेला आव्हान द्यायची हिम्मत होत नाही. त्यांनी लगेच गडकरींच्याकडून डँमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. घटनात्मक पदावरची व्यक्ती घटणेविरूध्द भूमिका घेत असेल तर ही घटणेची पायमल्ली आहे. खरेतर सध्या देश पायमल्ली वगैरेच्या पलिकडे पोहोचला आहे. मागे दिल्लीत मनूवाद्यांनी घटना जाळली होती. त्यांची मोदींच्या सरकारने काय उपटली ? हे अख्खा देश जाणतो आहे. घटना जाळणारे यांच्याच वर्तुळातील होते. मोदींच्या भूमिका आणि त्यांच्या भूमिका यात फारसा फरक नाही. त्यावेळी या देशातल्या बौध्द संघटणांनी फक्त त्या गोष्टीचा निषेध केला बाकी सगळे चिडीचुप होते. गेल्या पाच सात वर्षात रोज घटनेचे लचके तोडले जातायत. ती रोज उध्वस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहे. सत्तेतल्या धर्मांध उंदरांनी ती जोरात कुरतडण्याचे काम चालवले आहे. देश गरीब, लाचार झाला पाहिजे, सामान्य माणूस भाकरीला महाग झाला पाहिजे, तो मुठभर धन-दांडग्यांचा गुलाम झाला पाहिजे, त्यांच्यावरच त्याची उपजिविका अवलंबून रहायला पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करायची.

मग त्या लोकांना गुलाम करत त्यांच्यावर राज्य करायचे असे षढयंत्र रचले गेले आहे. मोदींनी नोटबंदीच्या माध्यमातून देश आर्थिक खिळखिळा कसा होईल ? सामान्य माणूस अधिक दुबळा कसा होईल ? छोटे-मोठे उद्योग कसे संपतील, उध्वस्त होतील ? याचीच व्यवस्था केली आहे. त्याचवेळी अदानी-अंबानीसारखे भांडवलदार बाप मोठे झाले पाहिजेत याची काळजी घेतली आहे. आताही शेतकरी आणि शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणारा वर्ग उध्वस्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच त्यांनी राज्यसभेत मगरीचे अश्रू ढाळलेले आहेत. त्या साठीच त्यांनी शेतकरी आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणून हिणवले आहे. सत्तर वर्षाच्या इतिहासात घटनात्मक पदावर बसून घटनेचा इतका घोर अवमान कुणीच केला नव्हता तो या माणसाने केलेला आहे. मोदी म्हणजे शेखचिल्लीची नवी आवृत्ती आहे. ज्या फांदीवर बसला त्याच फांदीवर कु-हाड चालवणारा नादानपणा ते करत आहेत. शेखचिल्ली येडा होता मात्र हे येडे नाहीत. त्यांना लोकशाही व्यवस्थाच संपवायची आहे. त्यासाठी जाणिवपुर्वक या बाबी करत आहेत.

येणा-या काळात मोदी अधिक उग्र होत जातील. ते लोकांचा आवाज तीव्रतेने दडपताना दिसतील. त्यांच्यातील सत्ताकांक्षी अहंकार आभाळाला भिडू लागल्याचे दिसते आहे. जो माणूस स्वत:चा गुरू असलेल्या लालकृष्ण अडवाणींना फाट्यावर मारू शकतो तो माणूस इतरांचा, संविधानाचा आदर काय करणार आहे ? देशापेक्षा मोदींचा अहंकार मोठा झाला आहे. मोदींनी आता कुणाचे ऐकू नये. त्यांनी सरळ सरळ या आंदोलनजीवींना संपवून टाकावे. ते रोज उठसुठ आंदोलन करत राहतील. मोदींच्या हुकूमशाही धोरणांना विरोध करत राहतील. त्यामुळे मोदींनी या जमातीचा अजिबात लाड करू नये. तिचे समुळ उच्चाटन करावे. त्यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचे खेळ खेळत बसण्यापेक्षा, तिरंग्याचा अवमान केल्याचे नाटक रचण्यापेक्षा ही माणसं थेट रणगाड्याखाली घालून मारावीत. मोदींचे कोण काय वाकडे करणार आहे ? या लोकांना रणगाड्याखाली घालून मारले की त्यांची रखेल असलेला मिडीया देशद्रोह्यांना मोदींनी चिरडल्याच्या रसभरीत बातम्या देईलच. आंदोलक देशद्रोही कसे होते, खलिस्तानी कसे होते याचे नाटक रंगवून रंगवून हा बदमाष मिडीया देशाला दाखवेलच. त्यामुळे मोदींनी खुषाल ही जमात संपवून टाकावी. अन्यथा ही आंदोलनजीवी जमात देशातल्या दंगलजींवी प्रवृत्तींना समुळ नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.