एक न्याय स्तंभ धुसर झाला

या देशात संविधानाची बूज राखणारे, सामाजिक समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय प्रिय असे जे बोटावर मोजण्याइतके बहुजनांचे पाठीराखे आहेत. त्यांच्यापैकी ‘होते’ असे म्हणायचा दुःखद क्षण दि.१५ फेब्रुवारीच्या पहाटे उगवला. लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक आणि माहितीचा अधिकार कायदा अर्थात आरटीआय चे शिल्पकार, सर्व सामान्यांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी जीवन समर्पित करणारे एल्गार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या.पी.बी.सावंत सरांचे पुण्यातील निवासस्थानी निधन झाल्यामुळे त्यांना ‘होते’ असे जड अंतःकरणाने म्हणावे लागते.
सावंत सरांनी मुंबई विद्यापीठातून कायद्यांची पदवी मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून आपला न्यायक्षेत्रातील सराव सुरू केला.ज्या न्यायालयात वकीली सुरू केली होती त्याच मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली.तदनंतर १९८९ ला सर्वोच्च न्यायालयात त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.तिथे सलग सहा वर्षं न्यायाधीश म्हणून त्यांनी न्यायदानाचे काम केले.

पी.बी.सावंत सरांच्या प्रदीर्घ न्यायालयीन कारकीर्दीनंतर भारत सरकारने त्यांची “प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया”चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. न्याय, नियोजन आणि शिस्त या गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेले न्या.सावंत सरांनी वर्तमानपत्रांना शिस्तीत वागायला शिकविले. अनियंत्रित झालेल्या मिडियाला मर्यादांची जाणीव करून दिली .त्यांना त्यांचे चारित्र्य जपायला भाग पाडले. “बेंगाल गॅझेटी” या इंग्रजी वर्तमानपत्राने सुरू झालेल्या भारतीय वर्तमानपत्रांच्या सन्मानार्थ १६ नोव्हेंबर हा दिवस “नॅशनल प्रेस डे” म्हणून साजरा केला जावा असा आदेश मा.न्या.पी.बी.सावंत यांनी काढला. कारण प्रसारमाध्यम हे खऱ्या अर्थाने समाजाचे कान आणि डोळे आहेत अशी त्यांची त्यामागील ठाम भूमिका होती . म्हणूनच त्यांच्या आदेशानुसार १६ नोव्हेंबर हा दिवस “नॅशनल प्रेस डे” अर्थात “राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिवस” म्हणून साजरा व्हायला सुरुवात झाली.
प्रसारण आणि प्रक्षेपणाच्या कक्षा रुंदाविण्यातही सावंत सरांचे योगदान मोलाचे आहे.पूर्वी दूरदर्शन या एकमेव सरकारी वाहिनीला प्रक्षेपण आणि प्रसारणाचे सर्व अधिकार होते.

ज्ञान आणि विज्ञानाचा सर्वदूर, सर्व थरावर प्रसार आणि विस्तार करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे हे ओळखून त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेऊन प्रसारण क्षेत्राचा विस्तार केला.आज आपल्या देशात अनेक वाहिन्या पहायला मिळतात याचे सारे श्रेय त्यांच्या न्यायालयीन निर्णयाला द्यावे लागेल.प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष असताना सर्व प्रथम सावंत सरांनीच “Right to information” अर्थात ‘माहितीच्या अधिकाराची’ संकल्पना अधिकृतरित्या मांडली. आणि आपल्या प्रदीर्घ न्यायालयीन, प्रशासकीय अनुभवाच्या आणि प्रचंड अभ्यासाच्या जोरावर मूर्त स्वरूपात आणून तिला कायद्याचे अधिष्ठानही प्राप्त करून दिले.

त्यांनी सर्वांगानी विचार करून माहितीच्या अधिकार कायद्याचे प्रारूप लिहिण्याचे महान कार्य केले.त्यामुळेच ज्येष्ठ पत्रकार अरुणा रॉय यांनी मोठ्या गौरवाने त्यांचा उल्लेख माहिती अधिकार कायद्याचे शिल्पकार म्हणून केला आहे.न्या.सावंत सर हे त्यांच्या यासम अनेक कार्यासाठी कायमच स्मरणात राहणार आहेत.एक शांत सुस्वभावी परंतू शिस्तबद्ध नीती आणि धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या न्या.सावंत सरांनी आपल्या जीवनात न्यायासोबत कधीच तडजोड केली नाही. सामाजिक न्यायाचा दृष्टीकोन समजावून सांगायला तर सर चोवीस तास मार्गदर्शक म्हणून उपलब्ध असायचे. न्यायिक सुधारणांसाठी आग्रही मत मांडणारे, सत्ताधाऱ्यांनी अतिशय जटिल करून ठेवलेल्या आरक्षण विषयांवरील महत्वाच्या निर्णयांमधील ते एक चालते बोलते न्यायालय होते.१९९५ ला सेवेतून निवृत्त झाल्यापासून अखेरचा श्वास घेईपर्यंत सावंत सर सामाजिक न्याय आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय राहिले.सावंत सरांना भारतातील समस्त बहुजन कदापी विसरणार नाहीत.कायद्याचा अनव्यार्थ बरोबर की चूक याबद्दल सर्वांगानी निर्णायक मुहर उमटविणारा न्यायस्तंभ आता धुसरं झाला आहे.आदरणीय सावंत सरांना भावपूर्ण आदरांजली !💐

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(उपाध्यक्ष
पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन)
…………………………………….

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED