हिंदू-मुस्लिम एकतेचे समर्थक चैतन्य !

26

[चैतन्य महाप्रभू जन्म दिन]

चैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग हे बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत व वैष्णव पंथाचे, भक्तिमार्गाचे प्रचारक व भक्तिकाळातील प्रमुख संतकवींपैकी एक होते. त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापन केला. ते भगवान श्रीकृष्णाचे उत्साही भक्त होते. त्यांचा जन्मोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो, त्यानिमित्त हा लेख. श्रीकृष्णावतार चैतन्य महाप्रभूने म्हटले आहे –

“चेतोदर्पणमार्जनं भवमहादावाग्निनिर्वापणं,
श्रेयः कैरवचन्द्रिकावितरणं विद्यावधुजीवनम् ।
आनंदाम्बूधिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतास्वादनं,
सर्वात्मस्नपनं परं विजयते श्रीकृष्णसंकीर्तनम् ।।”
[श्रीचैतन्य महाप्रभूकृत : अष्ट महानिधी : श्लोक – भक्तिमहात्म्य.]

अर्थात या मायावी जगात नामस्मरण म्हणजेच श्रीकृष्ण संकीर्तनच विजय प्राप्त करून देतो. हाच चित्तरूपी आरशाचा संशोधक आहे. तो प्रपंचरुपी महादावानला नष्ट करणारा आहे. कल्याणरूपी कुमुदिनीच्या विकासाला आवश्यक त्या चन्द्रिकेचा तो विस्तार कर्ता आहे. तो विद्यारूपिणी वधुचा जीवनसाथी असून आनंदसागराची भरती आहे. पदोपदी पूर्णामृतचा रसास्वाद आहे. आतबाहेरून तर अन्तःकरणापर्यंत तो न्हाऊ घालतो अर्थात समस्त पाप-तापाचे उच्चाटन करतो. असे ईश्वर नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे.चैतन्य चरितामृताच्या मते चैतन्य महाप्रभुंचा जन्म दि.१८ फेब्रुवारी १४८६ शक संवत १७०७मध्ये फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या वेळी पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नादिया) या गावी झाला. ज्याला आता मायापूर असे म्हणतात.

त्यावेळी पुष्कळ लोक शुद्धीकरणासाठी हरिनामाचा जप करीत गंगा स्नानाला जात होते. तेव्हा ज्योतिष्याने चैतन्यांच्या जन्मकुंडलीच्या ग्रहांचा आणि त्यावेळी उपस्थित शकुनाचा अंदाज लावला की हा मुलगा आयुष्यभर हरिनामाचा उपदेश करेल. बालपणीचे त्यांचे नाव विश्वंभर असे असले तरी सर्व लोक त्यांना निमाई म्हणत असत. कारण ते कडुलिंबाच्या सावलीत जन्मले होते. म्हणून आईही त्यांना ‘निमाई’ म्हणत साद घालत असे. गौरवर्णामुळे लोक चैतन्य महाप्रभुंना गौरांग, गौर हरि, गौर सुंदर आदी नावाने संबोधत. त्यांच्या वडिलांचे नाव श्री जगन्नाथ मिश्रा टोपणनाव पुरंदरमिश्र व आईचे नाव शचीदेवी होते. किशोरवयातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. भगवंताची लिला अगाध आहे. सृष्टी चालविण्याचे त्याचे नियम अनाकलनीय आहेत. महाप्रभू हेच समजावतात –

“नाम्नामकारि बहुधा निजसर्वशक्ति-स्तत्रार्पित नियमित: स्मरणे न कालः ।।एतादृशी तव कृपा भगवन !ममापि दुर्दैवमीदृशमिहाजनि नाअनुरागः ।।”[चैतन्य महाप्रभूकृत : अष्ट महानिधी : श्लोक क्र.१ व २.]

अर्थात ‘हे भगवान! जीवांची भिन्न भिन्न रूची राखण्यासच तर तू आपल्या अनेक नावांना प्रकशित केले व प्रत्येक नावांत आपली संपूर्ण शक्तिही स्थापित केली आहेस. नाम स्मरणाविषयी देश-काल, शुद्ध अशुद्धाचेही नियम-बंधन तोडून टाकतोस. हायरे प्रभु! तुझी तर जीवांवर अशी निःस्वार्थ कृपादृष्टीची वृष्टी होत आहे, तथापि माझेच असे दुर्भाग्य की तुझ्या नामात मला गोडी उत्पन्न होत नाही.’ म्हणून त्यांनी भजन-गायनाची नवीन शैली प्रसृत केली व राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू-मुस्लिम एकता, जातपात, उच्चनीचतेची भावना दूर सारण्याची प्रेरणा दिली. लुप्तप्राय झालेले वृंदावन पुन्हा वसवले. जीवनाचा अंतिम काळ त्यांनी वृंदावनातच घालवला. त्यांनी आरंभलेल्या नामसंकीर्तनाचा व्यापक व सकारात्मक प्रभाव आजही पाश्चात्य जगतात आहे.

असे म्हटले जाते की जर गौरांग नसते तर वृंदावन आजवर एक मिथकच राहिले असते. वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्ण व राधा यांचा संयुक्त अवतार मानतात. चैतन्य महाप्रभूंवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यांत कृष्णदास कविराज गोस्वामी विरचित चैतन्य चरितामृत, वृंदावनदास ठाकूर विरचित चैतन्य भागवत व लोचनदास ठाकुरांचा चैतन्य मंगल या ग्रंथांचा अंतर्भाव होतो. महाप्रभू नीलंचल येथे गेले आणि जगन्नाथांची भक्ती-उपासना करण्यासाठी १८ वर्षेपर्यंत तेथेच राहिले. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी त्यांनी गृहस्थाश्रम सोडला आणि संन्यासदीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू असे नाव त्यांनी धारण केले व याच नावाने ते प्रख्यात झाले. यानंतर ते दक्षिण भारतातील श्रीरंगक्षेत्र व सेतुबंध इत्यादी ठिकाणीही राहिले. त्यांनी हरिनामाचे महत्त्व देशाच्या कानाकोपर्‍यात प्रसारित केले –

“तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना ।
अमानिना मानदेन कीर्तनीय: सदा हरी ।।”
[चैतन्य महाप्रभूकृत : अष्ट महानिधी : श्लोक क्र.३.]

अर्थात जो स्वतःला कचऱ्याहूनही नीच समजून वृक्षाहूनही सहनशील बनतो. अहंकारशून्य होऊन दुसऱ्यांना मान सन्मान देतो, फक्त तोच हरिनाम संकीर्तन गाऊ शकतो. म्हणून त्यांनी वृंदावनमध्ये सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. ते असे आहेत – गोविंददेव मंदिर, गोपीनाथ मंदिर, मदन मोहन मंदिर, राधा रमण मंदिर, राधा दामोदर मंदिर, राधा श्यामसुंदर मंदिर व गोकुलानंद मंदिर, यांनाच सप्तदेवालय असे म्हणतात.

“नयनं गलदश्रु-धारया वदनं गद्गद्रुद्धया गिरा ।
पुलकैनिर्चितं वपुः कदा तव नामग्रहणे भविष्यति? ।।
युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावृषायितम् शून्यायितं जगत् सर्वं
गोविन्द विरहेण मे ।।”[चैतन्य महाप्रभूकृत : अष्ट महानिधी : श्लोक क्र.६ व ७.]

अर्थात हे प्रभू! आपला नामोच्चार करताना माझे नेत्र अश्रुधारांनी, माझे मुख गद्गद् वाणीने व माझे शरीर रोमांनी केव्हा लिप्त होईल? हे सखी! गोविंदाच्या विरहात माझे निमिषमात्र काळसुद्धा युगासमान प्रतीत होत आहे. माझ्या नेत्रांनी वर्षाऋतुचे स्वरूप धारण केले आहे आणि हे समस्त विश्व मला शून्य प्रतीत होत आहे. अशाच काहीशा भावनेने ते विरक्त झाले. जगन्नाथाच्या रथयात्रेत आनंदाने आत्मविस्मृत होऊन रथासमोर नाचत असताना महाप्रभूंच्या डाव्या पायाला विटकरीची कोच बोचली. तिसऱ्या दिवशी पायाच्या वेदना वाढल्या व त्यांना वात झाला. त्यातच भजनदिंडी समुद्र किनाऱ्यावरून चालली असता अथांग समुद्राचे निळे-निळे पाणी पाहून त्यांना भास झाला की घननीळ श्रीकृष्ण समोर उभा आहे. त्यांनी “हे कृष्ण, हे श्यामऽऽऽ..!” म्हणत समुद्राकडे धाव घेतली व पाहता पाहता ते त्यात विलीन झाले. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभुंनी वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी दि.१४ जून १५३४ रोजी ओडिशातील पुरी येथे आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे श्रीकृष्ण अवतार चैतन्य महाप्रभूंच्या पावन चरणी साष्टांग लोटांगण !!

✒️लेखक:-श्री निकोडे गुरुजी ऊर्फ श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा.(मराठी-हिंदी साहित्यिक तथा संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली, जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी – ९४२३७१४८८३.
email – Krishnadas.nirankari@gmail.com