भद्रावती परिक्षेत्रातील चोरा-तिरवंजा येथे 19 फेब्रुवारीपासून जंगल सफारी

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.18फेब्रुवारी):-चंद्रपूर वनविभागा अंतर्गत भद्रावती, वनपरिक्षेत्रातील चोरा गावालगत चोरा-तिरवंजा जंगल सफारीची सुरवात 19 फेब्रुवारी 2021 पासून करण्यात येत आहे. ग्रामिण भागातील सक्रिय लोकसहभागातून वन-वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित करणे, व वनाचे शाश्वत जतन करून लोकांचे वनावरील अवलंबन कमी करणे व वनाचे माध्यमातून ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोणातून संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे ठरावाव्दारे चोरा येथे जूने रस्ते व कुप रस्ते यांचा वापर करून 37 कि.मी. चा मार्ग पर्यटनासाठी उपलब्ध करण्याचे नियोजीत आहे.

या क्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, चितळ, सांबर, निलगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगूस, मसण्याउद, सायाळ, रानडुक्कर असे प्राणी व विविध प्रकारची झाडे व पक्षी व विविधरंगी फुल पाखरे यांचा समावेश आहे. सदरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जैव-विविधता आहे. सदर वनपर्यटनात सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर खाजगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच भविष्यात नोंदणीकृत वाहन यांना प्रवेश देण्याचे नियोजन आहे. चोरा-तिरवंजा जंगल सफारी प्रवेशद्वार नागपूर पासून 136 कि.मी. व चंद्रपूर पासून 46 कि.मी. आहे.

सदर सफारीचे प्रवेश शुल्क 500 रुपये आणि गाईड शुल्क 350 रुपये असणार आहे. प्रति दिन सकाळी 6.00 ते 10.00 वाजता, 6 वाहन आणि दुपारी 14.00 ते 18.00 वाजता, 6 वाहन यांना प्रवेश देण्यात येणार आहे. स्थानीक गाईड यांना वनविभागा मार्फत प्रशिक्षण देण्याचे तसेच भविष्यात सदर पर्यटन www.mytadoba.org या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकींग करणेकरीता वनविभागा मार्फत कार्यवाही सुरू आहे.
सदरच्या परिसरात मोठया प्रमाणात ई-सर्विलस चे कॅमेरे लावण्यात येणार असून त्याद्वारे पर्यटनवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. भविष्यात स्थानीक लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने पर्यटन आणि वन व वन्यजीव व्यवस्थापनबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप यांनी कळविले आहे.