गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान कायद्यान्वये गुन्हा- खबरीसाठी एक लाख रुपये बक्षिस

🔹स्टिंग ऑपरेशनसाठी 25 हजार रुपये बक्षिस

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.18फेब्रुवारी):-गर्भपात व सोनोग्राफी केंद्रांवर अवैधरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे व स्त्रीभ्रूण हत्या करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ व www.amchimulgi.gov.in यावर द्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी केले आहे. शासनाची नागरिकांना जाहीर विनंती आहे की कोणत्याही जोडप्यास गर्भलिंग चाचणीसाठी प्रवृत्त करु नये किंवा गर्भवती महिलेने गर्भलिंग निदान करुन घेऊ नये. गर्भलिंग निवडीशी निगडीत सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, दवाखाना किंवा प्रयोगशाळा यांच्या विषयी माहिती मिळाली, तर त्या विषयीच्या पुराव्यांसहित जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर, यांचेकडे तक्रार दाखल करावी.

या कायद्यान्वये गरोदरपणापूर्वी लिंग निवड करणे किंवा गरोदरपणात गर्भलिंग जाणून घेणे गुन्हा आहे. ज्या दांपत्यास एक किंवा दोन मुली आहेत व मुलगा नाही, त्या दांपत्याचा गरोदरपणी गर्भलिंग जाणून घेण्याकडे कल असतो व मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जातो, यास कायद्याने बंदी आहे.
गर्भलिंग जाणून घेणाऱ्या व्यक्तीस दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. गर्भलिंग कोणत्याही पध्दतीने सागणाऱ्या संबंधित डॉक्टरवर या गुन्ह्याचा आरोप सिध्द झाल्यास डॉक्टरला कैद व दंड तसेच वैद्यकिय परीषदेमधील नोंदणी 5 वर्षापर्यत रद्द करण्याची तरतुद आहे. गर्भलिंग सांगणे किंवा जाणून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच हा अजामिनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आपसात संमतीने खटला मागे घेता येत नाही.

खबरीसाठी बक्षिस योजना :
पी.सी.पी.एन.डी.टी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्या कोणत्याही नागरीकास त्याने दिलेल्या बातमीची खातरजमा करुन व त्या अनुषंगाने नंतर संबंधित सोनोग्राफी केंद्रावर / व्यक्तीवर खटला दाखल केल्यावर संबंधित व्यक्तीस महाराष्ट्र शासनातर्फे रु. एक लाख याप्रमाणे बक्षिस देण्यात येईल. ती व्यक्ती सामान्य, अधिकारी, कर्मचारी अशी कोणीही असु शकेल. सदर माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर यांना कळवावी.

स्टिंग ऑपरेशनसाठी बक्षिस योजना :
स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर तर्फे न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर सदर गर्भवती महिलेस रु. पंचवीस हजार चे बक्षिस देण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी कळविले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED