शिवाजी महाराज – नुतन सृष्टीचा निर्माता !

97

[छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव]

जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्धितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. स्वराज्याचे नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदवीस्वराज्य असे नाव त्यास प्राप्त झाले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर दि.१९ फेब्रुवारी १६३०मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला राष्ट्रमाता जिजाऊंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा, अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. आद्य शिवचरित्रकार महात्मा जोतीरावजी फुले पोवाड्यातून सांगतात –

“कुळवाडी-भुषण पवाडा गातो भोसल्याचा | छत्रपती शिवाजीचा ||लंगोट्यास देई जानवी पोषींदा कुणब्यांचा | काळ तो असे यवनांचा ||शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा | असे तो डौल जाहागिरीचा ||पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले ||शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले | जिजाबाईस रत्न जाहले ||”

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”(अर्थ – ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो. तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.)

सन १६४५-१६८० या शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीत सामर्थशाली मोगलांचा किवा विजापूरकरांचा असा एकही हिंदू किवा मुस्लिम सेनानायक नव्हता की ज्यांचा महाराजांनी पराभव केला नाही. शहाजादे, इराणी व पठाण सरदार तसेच जसवंतसिंह राठोडसारखे राजपूत राजे या सर्वांनी छत्रपती शिवरायापुढे हात टेकले होते. वैयक्तिक शौर्य, संघटक व नायक म्हणून छ.शिवाजीराजे अग्रगण्य ठरले होते. अफजलखानाशी केलेले युद्ध, शाईस्ते खानावर छापा, सुरतेची लूट, एवढेच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश या सर्व गोष्टी वरील विधानांची व गुणांची प्रचिती देतात.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या उपदेशाप्रमाणे –

“पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥”

छ. शिवरायानी समानतेचे तत्व जोपासले, महिलांचा सन्मान राखला. सैन्यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना समाविष्ठ करून घेतले. शेतकरी, सामान्य माणूस, कारकून, आदिवासी या सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य महाराजांनी निर्माण केले. ही मोठी गोष्ट याठिकाणी नमूद कराविशी वाटते. शेकडो सेनाधूरंधरांना शिवरायांनी प्रशिक्षित केल्यामुळे महाराजांच्या निधनानंतरही निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मराठ्यांचे स्वातंत्र्य या लोकांनी जगाच्या पाठीवरील सर्व बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेशी संघर्ष करून सुरक्षित ठेवले होते.छ.शिवाजी महाराजांच्या प्रज्ञेची असामान्य कल्पकता हा महत्त्वाचा पैलू होता. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना शिवरायांनी आयुष्यात कधीही दाद दिली नाही. उलटपक्षी, आपल्याच जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले. संकटाच्या वेळी शिवराय आपली कल्पकता वापरून सहीसलामत संकटातून बाहेर पडत गेले.

शहाजी राजांची सुटका, मोऱ्यांचे उच्चाटन, अफजल खानाचा पराभव, स्वतःची पन्हाळगडाहून सुटका, विशालगडावरचा चकवा, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, मोगल साम्राज्यातून सहीसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून त्यांचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते. विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले. म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे सार्थ ठरते. तर संतश्रेष्ठ रामदासजी म्हणतात –

“निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु !
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी !!”

महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रुपात पाहत होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे ‘महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात नि:स्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर पुरुष होते.’ अशा या जाणत्या लोकराजा शिवरायांचे दि.३ एप्रिल १६८० रोजी किल्ले रायगडावर दुःखद निधन झाले.
!! शिवरायांना त्यांच्या पावन जन्मदिनी पुरोगामी संदेश परिवारातर्फे अनंतकोटी साष्टांग नमन !!

✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार जी. निकोडे गुरुजी.
मु. पिसेवडधा, ता. आरमारी.
जि. गडचिरोली मोबा. ९४२३७१४८८३.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com