विश्वशांतीचे मूळ : मातृभाषा संरक्षण

30

[विश्व मातृभाषा दिवस]

जगभरात २१ फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात भाषा आणि संस्कृतिप्रती जागरूकता निर्माण करणे हा असतो. यूनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ ला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची घोषणा केली होती. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी २१ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो. आपली मायबोली ही सर्वाधिक मधूर आहे. ती सर्वत्र बोलली जावी, असे प्रत्येक मनुष्याला वाटणे स्वाभाविक आहे. मायबोली किंवा बोलीभाषा आणि मातृभाषा यांत खुपच अंतर आहे. मातृभाषा ही राज्याची प्रमाणभाषा तर मायबोली ही आपले मायबाप घरी साळसूद बोलतात ती भाषा होय. म्हणून संतकवीवर्य ज्ञानेश्वरजींनी म्हटले आहे –

“माझी मऱ्हाटीचि बोलू कौतुके !
परि अमृतातेही पैजा जिंके !!”

दि.२१ फेब्रुवारी १९५२ला ढाका युनिवर्सिटीच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालिन पाकिस्तान सरकारच्या भाषा नीतिला जोरदार विरोध केला होता. पाकिस्तानच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार देखील केला. मात्र वाढत्या विरोधामुळे अखेर तत्कालिन पाकिस्तान सरकारने बांग्ला भाषेला अधिकृत दर्जा दिला. या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांच्या स्मृती निमित्ताने यूनेस्कोने पहिल्यांदा सन १९९९मध्ये हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिनानिमित्ताने यूनेस्को आणि यूएन जगभरात भाषा आणि संस्कृतीसंबंधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. दरवर्षी खास थीम असते. जसे ‘स्थानिक भाषा विकास, शांतता आणि सलोख्यासाठी महत्त्वाचा’ अशाप्रकारे ठेवली जाते. या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनास (१) Tongue Day, (२) Mother language Day, (३) Mother Tongue Day, (४) Language Movement Day किंवा (५) Shohid Dibosh या नावाने देखील ओळखले जाते.

आपल्या महाराष्ट्रात अनेक मायबोली आहेत. जसे – कोरकू, अहिराणी, कोळी, गोंडी, गोवारी, माडिया, हलबी इत्यादी इत्यादी. आपल्या भारतात देखील शेकडो भाषा बोलल्या जातात. सन १९६१च्या जनगणनेनुसार भारतात १६५२ भाषा बोलल्या जातात. तसेच सद्याच्या रिपोर्टनुसार भारतात एकूण १३६५ मातृभाषा आहेत. तर जगभरात बोलल्या जाणाऱ्या ७००० भाषांपैकी सुमारे ३५०० भाषा या शतकाअखेरपर्यंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा लुप्त होऊ पाहाणाऱ्या हजारो प्राचीन भाषांचे संरक्षण करण्यासाठी एका ग्रुपने आठ प्रकारे बोलणाऱ्या डिक्शनरींचे अनावरण नुकतेच केल्याचे समजते.
इ.स.२०००पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात शांतता प्रस्थापित करणे, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करणे या उद्देशाने साजरा करण्यात येत आहे. दि.२१ फेब्रुवारी १९५२मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो.

नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना – यूनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला. संयुक्तराष्ट्र महासभेने दि.१६ मे २००९ रोजी वापरल्या जाणाऱ्या सर्व भाषांचे संरक्षण, संवर्धन व प्रोत्साहन देण्याबाबत त्यांच्या सदस्यांना राजी केले. ठराविक संकल्पनेत बहुभाषिकता आणि बहु संस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारपणे एकता वृद्धीसाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. रझाकुल इस्लाम, कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये बंगाली भाषा या संकल्पनेची सुचना देण्यात आली. त्यांनी दि.९ जानेवारी १९९८ रोजी कोफी अन्नान यांना पत्र लिहिले की त्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित करून जगातील विविध भाषा वाचविण्यास एक पाऊल उचलावे. म्हणून विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराजांनी सांगितले –

“हर मुल्क-भाषा के मानव,
अपने ही तो सारे है ।।”

भाषा हे आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन व विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत. आपल्या हृदयातील भावना व्यक्त करण्यास व भावनांचा उद्वेग कळण्यास मातृभाषा अधिक प्रभावी ठरते. जगभरातल्या अनेक भाषा लुप्त होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यास मातृभाषा दिन यशस्वी ठरेल, असे तत्वज्ञांचे मत आहे. तसेच त्यांचे अस्तित्व टिकवण्याचे काम इंटरनेट करू शकतो, असा दावा भाषातज्ज्ञांनी केला आहे. फेसबुक, ट्विटर यांसरख्या सोशल मीडिया साईट्स व इंटरनेट यागोष्टी भारतातील मृत होऊ लागलेल्या भाषांचे संवर्धन करण्यास मदत करू शकतात.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक व लेखक:-श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा.
[ मराठी साहित्यिक व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल – Krishnadas.nirankari@gmail.com