चोरांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दाखवल्या वाकुल्या, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या घरासमोरच घरफोडी

25

🔺धुळ्यात चोर मचाये शोर पोलिसांच्या जीवाला घोर

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

धुळे(दि.23फेब्रुवारी):- जिल्ह्यात चोरांनी आपला दबदबा निर्माण केला असून काही दिवसांपासून चोरांनी आपला मार्ग पोलीस दलाकडे वळवला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांच्याच घरात व कार्यालयामध्ये चोर्‍या करून पोलिसांच्या जीवाला घोर लावणारे हे ‘चोरो के राजा’ आहेत. तरी कोण असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यात नेहमीच पोलिसांचा प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय पदाधिकारी, बनावट दारू व वाळू माफिया, दुचाकीवर फिरणारी टोळकी यांच्यासह सट्टा, मटका किंग पोलिसांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसतात. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित शहरात दाखल झाल्यापासून त्यांनी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना नीतिमत्तेचे डॅमेज कंट्रोल केले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर पोलिसांचे प्रकरण असो किंवा बॅनरबाजांची मस्ती सर्वच ठिकाणी त्यांनी जातीने लक्ष दिले आहे. एकटा मनुष्य सर्व करत असतांना पोलीस दलातील सहकार्यांनी सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काम करणे गरजेचे असते. परंतु खालील स्तरातील कर्मचारी त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे.
जिमखान्यातुन 40 हजाराची घरफोडी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या जिमखान्यातुन 40 हजारांची घरफोडी झाली आहे.

तेथील व्यवस्थापक केशव महादु ढाकड हे आजारी असल्याने काही दिवसांपासून पत्नीस आपल्या भावाकडे संभाप्पा कॉलनी गेले होते. आज सकाळी जिमखान्यातील त्यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटे उघडून साहित्य अस्ताव्यस्त केले. कपाटातून 40 हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. धुळे शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय्.पी.राजपूत, हरणे, हवालदार धनंजय मोरे, मनोज ब्राम्हणे, प्रशांत माळी, राजू मिस्त्री यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.