” लोक – शास्त्र सावित्री “

59

[माणुसकीची मशाल नाटक]

थिएटर ऑफ रेलेवंस रंग सिद्धांत , एक असे नाट्य दर्शन जे आपल्या कला साधनेतून आयुष्याला नवी रचनात्मक दृष्टी देते. ही दृष्टी कलाकारच्या वैचारिक स्वरूपाला व्यापक व भक्कम करते. व्यक्तीला जीवनाचा नवा संकल्प घेऊन ध्येयनिष्ठ आयुष्य जगण्यास उत्प्रेरीत करते. माझा एक व्यक्ती ते कलाकार आणि व्यक्तित्वाचा प्रवास असाच सुंदर , अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे !

2015 पासून सुरू झालेला माझा थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताचा कलात्मक प्रवास माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरला. एक अभिनेत्री म्हणून कठपुतली होण्याऐवजी कलात्मक उन्मुक्ततेची यात्रा जगण्याचा, कलाकार म्हणून आपल्या कला साधनेने कलासत्व साध्य करण्याचा, बदल घडवणारी क्रांतिकारी (changemaker) म्हणून कलेतून वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याचा विश्वास जागवण्याचा आणि व्यक्ती म्हणून कलाकाराचे कलात्मक सत्व ज्यामध्ये वसते, त्या मूर्त आकाराला भक्कम करण्याचा ! रंगकर्मी म्हणून निरनिराळ्या विचारांच्या छटा आपल्या रंगकर्मातून दर्शवत माणुसकीसाठी प्रतिबद्ध होण्याचा अलौकिक प्रवास !!

आता नवं वर्षात एक नवीन ओळख , नवीन भूमिका, नवीन संकल्प घेऊन स्वतःला घडवत आहे ” सांस्कृतिक सृजनकार ( Cultural Creator ) ” म्हणून जगण्याचा !

जागतिकीकरणाच्या विळख्यात हे जग अडकले आहे. “संवेदनाहीन आणि विचारशून्य” असलेल्या गर्दीत एक माणूस म्हणून जिवंत राहणं आता आव्हानात्मक झालं आहे. जिथे विचारांची जमीनच कुंद केली आहे तिथे तत्व , माणुसकी , अस्तित्व , स्वप्नं हे केवळ शब्दच राहतात ! जेव्हा जेव्हा माणूस “सहअस्तित्व” च्या तत्वाला विसरून स्वार्थी झाला आहे, तेव्हा तेव्हा प्रकृतीने माणुसकीला वाचवण्यासाठी तिच्या अस्तित्वाची हुंकार दिली आहे.. सध्याची महामारी ही माणसाने स्वतःच्या स्वार्थी सुखासाठी ओढवून घेतलेला भयानक विध्वंस आहे, ज्यात असंख्य लोकं परिस्थितीच्या बळी पडले आहेत. अश्या वेळी समाजाला सकारात्मक दिशेकडे नेणाऱ्या सांस्कृतिक कर्मींची आवश्यकता आहे . परंतु हे सांस्कृतिक कर्मी सत्तेच्या अधीन होऊन खरेदी विक्रीच्या जाळ्यात अडकले आहेत, प्रदर्शनाच्या जाळ्यात अडकले आहेत. अशा परिस्थितीत समाज दिशाहीन होतो आणि विध्वंसांची सुरुवात होते, मानवीय मूल्यांचे हनन होते.

मागील वर्षापासून संपूर्ण जग एका निराशावादी कालखंडातून गेला आहे. अजूनही आव्हाने संपली नाहीत, परिस्थिती काही बदलली नाही. माणुसकीला जगवण्याचे आव्हान आजही प्रत्येक माणसा समोर उभे आहे. आज जिथे वैज्ञानिक दृष्टीकोनाची , तर्कसंगत बुद्धीची , न्यायाची आणि मानवीय संवेदनांची समाजाला सर्वात जास्त गरज आहे, तिथे आपली सामाजिक आणि राजनीतिक व्यवस्था पुन्हा त्याच रुढीवादी परंपरांना राबवत समाजाला अधोगतीकडे नेत आहे.

वर्षानुवर्षे चालत आलेले रुढीचक्र जे माणसाला माणूस म्हणून जगण्याची उन्मुक्त दृष्टी देत नाही, अश्या चक्राला भेदण्यासाठी, आपल्या कलात्मक साधनेने युग परिवर्तनाची हुंकार देणारी “सांस्कृतिक सृजकाराची” भूमिका घेऊन, आम्ही थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य तत्वाचे प्रतिबद्ध रंगकर्मी, आमच्या नवीन नाट्य प्रस्तुतीतून प्रत्येक जनमानसात माणुसकीची ज्योत पेटवत आहोत. माणूस म्हणून जगण्याचा नवा संकल्प रुजवत आहोत. रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित “लोक – शास्त्र सावित्री ” हे नाटक माणूस म्हणून प्रत्येकाचे अस्तित्व स्थापित करणारी दृष्टी निर्माण करते आणि समाजाच्या स्थगित झालेल्या विचारांना प्रवाहित करणारी कलाकृती दर्शवते !

“लोक – शास्त्र सावित्री” हे नाव का ? महाराष्ट्रातल्या मातीतून जन्मलेली अशी व्यक्ती जिने मनुवादी रूढी परंपरा, सामंतशाही संस्कृती आणि पितृसत्तात्मक व्यवस्थेला बदलण्याचा बंड केला. “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांची प्रेरणा घेत लोकांमध्ये लोक भाषेत माणुसकीचे तत्व सांगणारी ही रचना आहे. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतानुसार सावित्रीबाई फुले , बहिणाबाई चौधरी या सांस्कृतिक सृजनकार आहेत, कारण त्यांनी त्यांची कुठलीही राजनैतिक सत्ता किंवा पार्श्वभूमी नसताना, स्वतःच्या सांस्कृतिक बळावर परिवर्तन घडवून आणले. समाजात रुजलेल्या पितृसत्तात्मक आणि सामंतवादी मानसिकतांना सातत्याने प्रश्न विचारत त्यांचा प्रतिरोध केला. गुलामगिरीच्या बेड्या तोडून स्वतःच्या जीवनात माणूस म्हणून जगण्याची दृष्टी अमलात आणली. त्यांनी या दृष्टीच्या माध्यमातून आयुष्य जगण्याला नवा अर्थ दिला आणि शरीरापलिकडे माणूस म्हणून स्वतःचे अस्तित्व घडवले. ही दोन उदाहरणं अगदी स्पष्ट आहेत, की अस्तित्वाची मशाल विचारांच्या ठिणगीनेच पेटते. या दोन विचारांना स्मरणात घेऊन लोकांसाठी, लोक भाषेत, लोकांच्याच आयुष्यातले प्रसंग घेऊन त्यात सावित्रीबाई आणि बहिणाबाईंचे माणुसकीचे शास्त्र रुजवण्याची कला म्हणजे “लोक – शास्त्र सावित्री” हे नाटक आहे !

हे नाटक शोषणाच्या मुळाशी जाऊन विचार करण्यास उत्प्रेरीत करतं. गुलामगिरीच्या अदृश्य बेड्यांना समोर आणतं, शिक्षित – अशिक्षितच्या पलीकडे जाऊन माणसातल्या विचारांना प्रज्वलित करतं, “का आणि कसं ?” या प्रश्नांशी लढण्याची ताकद निर्माण करतं, प्रत्येक व्यक्तीला स्वतःतल्या सृजनकराची ओळख करून देतं ! एक कलाकार म्हणून हे नाटक खूप प्रेरणात्मक आहे, यातले दृश्य , संहिता , प्रसंग प्रेक्षाकांना थेट भिडणारे आहेत, प्रत्येकाला आपलेसे वाटणारे आहेत. नाटक पाहताना प्रत्येक व्यक्तीला हे जाणवतं की हे नाटक नसून आमच्याच आयुष्यातल्या घटनांना दाखवणारा सत्याचा आरसा आहे. कलाकारांना हे नाटक जगताना, आत्मसंवाद आणि आत्मसंघर्ष करण्यास खूप उत्प्रेरीत करते. या नाटकाचे वैशिष्ट्य आहे कि यात कलाकार ऐवजी कलाकृती सादर करणारी व्यक्ती उठून दिसते. कारण हे नाटक केवळ कलाकारापुरते मर्यादित न राहता व्यक्तीच्या आत्मसंघर्षाचा महत्वाचा भाग होऊन जाते आणि माणूसकीसाठी स्वतःला प्रतिबद्ध करते.

जागतिकीकरणाने लोककला आणि लोकसंस्कृतीचा ऱ्हास केला आहे. तत्व आणि जनजीवनाशी जोडलेल्या लोकसंगीताला बाजारीकरणाचे स्वरूप दिले आहे.”थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांत लोकसंगीताच्या मूळ स्वरूपाला पुन्हा प्रस्थापित करत आहे. सावित्री चे तत्व आणि थिएटर ऑफ रेलेवन्स चे दर्शन मिळून निर्माण होतं “लोक – शास्त्र” ! महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला आणि लोककलेला हे नाटक तात्विक दृष्टी देते.

आमचा सांस्कृतिक सृजनकार म्हणून हाच पुढाकार आहे कि ” लोक – शास्त्र सावित्री” या नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक जनमानसात सावित्रीची म्हणजेच विवेकशील माणूस म्हणून जगण्याची मशाल पेटावी. 21 फेब्रुवारी 2021 रोजी, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे “लोक – शास्त्र सावित्री” नाटक प्रस्तुत झाले. या आव्हानात्मक काळात हि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक प्रेक्षकात जागलेली सावित्री ” माणुसकीच्या जागराला या ” हीच हुंकार देत होती. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे शुभचिंतक आणि अभ्यासक माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी , न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करत आहेत. आता हि हुंकार संपूर्ण जनमानसात नादमय करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत !

✒️लेखिका:-कोमल खामकर(थिएटर ऑफ रेलेवंस रंगकर्मी आणि अभ्यासक)

komalkhamkar08@gmail.com