१ मार्च २०२१ पासून स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार शाळा बंदचा निर्णय घ्यावा: शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

21

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.26फेब्रुवारी):- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातील इयत्ता पाचवीपासूनच्या शाळा सुरू होत्या. मात्र आता वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाशिममधील एका आश्रमशाळेत तर २२९ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली. या सर्व पार्श्वभूमीवर हे शाळा बंदचे निर्देश देण्यात आले आहेत.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिलंय की, ‘विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.’

राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण समाजकल्याण मंत्री व आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितले.