प्राचार्य डाॕ. किसन पाटील यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची फार मोठी हानी- ग्रामगीताचार्य बोढेकर

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.3मार्च):-ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डाॕ. किसन पाटील यांचे काल वयाच्या ६५ व्या वर्षी जळगाव येथे दुःखद निधन झाले.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी पाचोरा जि जळगाव येथे संपन्न झालेल्या सातव्या राज्यव्यापी मराठी बोली साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच गुरूकुंज मोझरी येथे २००९ साली भरलेल्या राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज साहित्य प्रणित अ.भा. मराठी जनसाहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.एक उत्कृष्ट वक्ते, विविधांगी लेखक आणि व्यासंगी संशोधक म्हणून त्यांचा मराठी साहित्य विश्वात लौकिक होता. त्यांच्या मार्गदर्शनात आजवर १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी आणि ९ विद्यार्थ्यांनी एम .फिल . पूर्ण केले होते.त्यांनी आजवर ३ कविता संग्रह ,२ बालकविता संग्रह , लोकसाहित्य संशोधन , लेखमाला, समीक्षा ग्रंथ ,अनेक ग्रंथाचे संपादन ,वैचारिक लेख संग्रह असे २७ ग्रंथ लिहिलेले आहे.

त्यांच्या निधनाने साहित्य चळवळीचे , सामाजिक चळवळीचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे , अशी आदरांजली राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी अर्पण केली आहे.गेल्या वर्षीच्या ग्रामजयंती (एप्रिल २०१९) महिन्यात आॕनलाईन कार्यक्रम घेण्यात आला होता . त्यावेळी त्यांनी श्रीगुरूदेव परिवाराच्या सदस्यांशी संवाद साधत यथोचित मार्गदर्शन केले होते. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेशी ते विचारांनी जुळलेले होते .त्यांच्या निधनाबद्दल परिषदेच्या वतीने सरचिटणिस ॲड. राजेंद्र जेनेकर , इंजि.विलास उगे, संजय वैद्य , प्राचार्य पत्रे , प्रा. श्रावण बानासुरे ,देवराव कोंडेकर , श्रीकांत धोटे आदींनी दुःख व्यक्त करून आदरांजली अर्पण केली आहे.