आर्य अष्टांगिक मार्ग : स्वयंसुरक्षा

31

[राष्ट्रीय सुरक्षा दिन व सप्ताह]

प्रत्येक व्यक्ती मानवता धर्माचे पालन करत वागल्यास असुरक्षितता कुणाच्याही केसालासुद्धा शिवणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा ही देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी, ताकदीचे प्रक्षेपण व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते. ही बाब प्रथमतः दुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली. तसेच ती राखण्यास आर्थिक सुरक्षा, उर्जा सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा, सैन्याची ताकद व सायबर साचा : आंतर कारयविछेदन सुरक्षा याही बाबी महत्त्वाच्या समजल्या जातात. सदैव स्वयंसुरक्षा पाळणे गरजेचे असते. म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात – “मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रासी भेदू ऐसे ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।।” – सार्थ श्री तुकोबाची अभंग गाथा : ५८६. प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था करते, त्या व्यवस्थेला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात. भारतात दरवर्षी ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आता नॅशनल सेफ्टी वीक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणूनही साजरा केला जात आहे. या आठवड्यात लोकांना जागरुक केले जाते. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेप्रती जागरुकता यावी तसेच अपघात होऊ नये, असा हेतू आहे.

यात विभिन्न जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक अपघातांपासून बचाव करण्याचे उपाय सांगण्यात येतात. या पूर्ण आठवड्यात केल्या जाणार्‍या क्रियाकलापांचा उद्देश्य लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी जागृत करणे आहे. कारखान्यात काम करताना सुरक्षिततेची साधने वापरावी तसेच ती एमरजेन्सी कशी हाताळावी? सोबतच राष्ट्रीय संपत्तीचे जतन आणि संवर्धन याचे देखील महत्त्व असल्याची जाणीव करुन दिली जाते. हा दिवस साजरा करावा यासाठी नॅशनल सेफ्टी कौन्सिलने पुढाकार घेतला होता. हा दिवस साजरा करण्यास सन १९७२पासून प्रारंभ झाला आहे. ४ मार्च रोजीच भारतात नॅशनल सेफ्टी कौन्सिलची स्थापना झाली होती. कारखान्यांशी निगडित विविध बाबींपैकी ‘कामगारांची सुरक्षितता’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपघात कोणताही असो, तो दु:खदच असतो. या अपघातरूपी दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान बुद्ध यांचा ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ आहे. हा मार्ग औद्योगिक सुरक्षिततेकडे नेणारा आहे. या मार्गाची आठ अंगे ही सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, आणि सम्यक समाधी हे आहेत.

कारखाना अपघातमुक्त असावा, अशी कारखानदारांची भूमिका असणे. कारखान्याची दोषमुक्त यंत्रसामग्री, जागरूक यंत्रणा, सुरक्षा धोरण निश्चित करणे. यंत्र अथवा प्रक्रियेपासून काहीच इजा होणार नाही, हा समज काढून टाकणे. यंत्र, रसायनांचे धोकादायक गुणधर्म दृष्टीसमोर ठेवून काम करणे. त्या वस्तुस्थितीची सतत जाणीव ठेवणे म्हणजे सम्यक् दृष्टी आहे. महात्मा गौतम बुद्ध सांगतात – “यथा बुब्बुलकं पस्से यथा पस्से मरीचिकं । एवं लोकं अवेक्खन्तं मच्चुराजा न पस्सति ।।१३.४।। एथ पस्सथिमं लोकं चित्तं राजरथूपमं । यत्थ बाला विसीदन्ति नत्थि सङ्गो विजानतं ।।१३.५।।” – पवित्र धम्मपद : लोकवग्गो : गाथा – १७०-७१. अर्थात जो जीवनाला बुडबुड्यासमान लेखतो त्याच्याकडे मृत्यू ढुंकूनही पाहात नाही. मूर्ख आसक्ती ठेवतात तर प्रज्ञावंत अनासक्त राहून जगतात. खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, कठोर बोलणे, व्यर्थ बडबड या बाबी कारखान्यातील वातावरण अस्थिर, असुरक्षित करतात. कारखानदाराने धोकादायक स्थितीची सत्य माहिती देणे; व्यवस्थापन, कामगारांत मित्रत्वाचे संभाषण, वैचारिक देवाणघेवाण या गोष्टी कारखान्यात सुरक्षित वातावरण ठेवण्यात सहायक ठरतात.

औद्योगिक क्षेत्रात जनजागृती हवी म्हणून सुरक्षिततेविषयी सुरक्षा स्पर्धा, घोषवाक्य, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. कर्मचाऱ्यांना काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी शूज, गम बूट, जॅकेट, टोपी यासह सद्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाकातोंडाला मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटाईजर वापर, आदी सुरक्षिततेची साधने पुरविली जातात. त्यांचा वापर कसा करावयाचा? हेही प्रात्यक्षिकांसह करून दाखवले जाते. इतरांना आपल्यामुळे त्रास, इजा होईल, अशा वर्तनांपासून स्वत:स अलिप्त ठेवणे. मालमत्ता अथवा यंत्रसामग्रीची हानी होईल, अशा कृतीपासून दूर राहणे. शॉर्टकटची पद्धती न वापरता प्रामाणिकपणे निर्धारित कार्यप्रणालीचा वापर करणे. व्यवस्थापनाने सुरक्षा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सतत प्रयत्नशील राहणे हा सम्यक कर्मांत होय. वेळ, श्रम, पैसा बचतीच्या चुकीच्या पद्धतीने यंत्र हाताळणीपासून कामगारांनी दूर राहणे गरजेचे असते.

कारखानदाराने सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ नफा वृद्धीचे उद्दिष्ट ठेवणे, हे धोकादायक आहे. सचोटीने कारखाना चालविणे आवश्यक आहे. जनजागृती, प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, नियमांची वारंवार उजळणी, सयंत्रांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. कामावर असताना अमली पदार्थांचे सेवन आपली सतर्कता नष्ट करते. यासाठीच संतश्रेष्ठ कबीर महाराजांनी म्हटले – “भैया गाड़ीवाला धीरे गाड़ी हांक रे ।। गाड़ी अटके रास्तेमें और मजल पड़ी हैं दूर रे ।। कहत कबीरा सुन भाई साधो यहि पद हैं निर्वार रे ।।” कामाच्या ठिकाणी अवतीभवतीच्या असुरक्षित परिस्थितीबाबत जागरूक राहिले तर अपघात टाळू शकते व त्यातूनच सुरक्षितता जोपासली जाते.
!! राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने पुरोगामी संदेश परिवारातर्फे निरामय आरोग्य व सुरक्षित जीवनास हार्दिक शुभकामना !!

✒️संकलन व लेखन -श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी(मराठी व हिंदी साहित्यिक)मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,ता. आरमारी, जि. गडचिरोली. भ्रमणध्वनी – ७४१४९८३३३९.