विकल्पच्या वतीने बालवक्ता कुशलकुमार माळीचा सत्कार

33

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.3मार्च):- येथील विकल्प ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून नावलौकिक मिळवत असलेला बालवक्ता कुशलकुमार माळीचा सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वरूपसिंग नाईक बी एड कॉलेज नवापूर येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. नितीनकुमार माळी यांचे चिरंजीव प्रसिद्ध बालवक्ता कुशलकुमार माळी यांनी नुकतीच विकल्प युथ अँड रुरल डेव्हलपमेंट रिसर्च मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन धरणगावच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने माळी पिता – पुत्रांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

बालवक्ता कुशलकुमार माळी कमी वयात त्याच्या वाकचातुर्य व संभाषण कलेचा माध्यमातून सबंध महाराष्ट्रात नावलौकिक मिळवत आहे. नुकतीच राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या बालवक्ता स्पर्धेत कुशलकुमार माळी याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत देशभरातील बालवक्त्यांनी सहभाग नोंदवला होता. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर असलेलं प्रभुत्व, बोलण्यातील ओघ, आवाजातील चढउतार, विषयाची समर्पक मांडणी या सर्व बाबींचा अंतर्भाव असल्याने कुशलकुमार च्या वक्तृत्वाची श्रोत्यांवर उत्तम छाप पडते.

या प्रतिभासंपन्न मुलाला त्याचे वडील प्रा. डॉ. नितीनकुमार माळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.आजच्या या छोटेखानी सत्कार प्रसंगी बालवक्ता कुशलकुमार माळी, त्याचे वडील प्रा. डॉ. नितीनकुमार माळी, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष अमोल महाजन उपस्थित होते.