५ लाख बोगस चेक देण्या प्रकरणी हिंगणघाट येथील प्रमोदीनी राजेश आस्कर सह तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

33

🔹या प्रकरणी पोलिसांनी २१ लोकांना पोलिस ठाण्यात नेत विचारपूस केली आहे

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.६मार्च):-विज़न ऑफ लाइफ फॉउंडेशन या तथाकथित स्वयंसेवी संस्थेकडून आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेकड़ो लाभार्थीना ५ लाखापर्यंत कर्जवाटप करण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीची ब्रांच डायरेक्टर असलेल्या प्रमोदिनी आसकर या स्थानिक महिलेसह इतर तिघांवरती गुन्हा नोंद केला.या कंपनीचा मुंबई येथील प्रमुख सूत्रधार आशिष विजय डे याला मुंबई येथून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाल्याची माहितीसुद्धा सुत्रांद्वारे मिळाली आहे.उपरोक्त संस्थेद्वारा मोठा गाजावाजा करीत प्रधानमंत्री मुद्रालोण योजनेंतर्गत १ लाख ते ५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष देण्यात आले.विदर्भातच नव्हे तर राज्यात इतर भागातसुद्धा त्यांनी बेरोजगार असलेल्या तरुण-तरुणीना आपल्या जाळ्यात ओढत अल्पवेतनावर प्रतिनिधी नेमले.

संस्थेद्वारे कडून १० हजार २५० विमारक्कम घेऊन ५ लाख रुपयांचा कर्जाचा धनादेश देण्याचे कबूल केले.या कर्जवाटपासाठी शहराबाहेर नंदोरी रस्त्यावर महाकालीनगरी येथे काल कर्जमेळाव्याचे आयोजन केले होते.कर्ज प्राप्त करण्यासाठी याठिकाणी बुलडाणा येथील सिंदखेडराजा तसेच अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर ,नागपूर ,वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी कर्ज मिळविण्यासाठी हजेरी लावली होती.
प्रत्येक लाभार्थीकडून १० हजार २५० रुपये घेऊन नोंदणी करीत इंडोनेशिया (जकार्ता) येथील जे ट्रस्ट या बँकेचे बोगस बॅंकेचे ५ लाख रुपयांचे नकली चेक एटीएम कार्ड देण्यात आले.ही बाब काही सुज्ञ लाभार्थीच्या लक्षात येताच त्यांनी यासंबंधी माहिती स्थानिक पोलिसांना दिली.माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण यांनी कार्यक्रम स्थळी जाऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

यावेळी येथे असलेले ४लाख २४ हजार ८५० रुपये रोख, तिन लॉपटाप, २२नकली चेकबुक्स कर्जअर्ज पोलिसांनी ताब्यात घेऊन २१लोकांना विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.या लाखोच्या फसवणूक प्रकरणी ब्रांच डायरेक्टर प्रमोदीनी राजेश आस्कर ह.मु. हिंगणघाट ,ब्राच व्यव्यस्थापक विशाल धाबेकर,मु.मानेवाड़ा नागपुर,मयुर वैद्य मु.मेंढुला ता.समुद्रपुर तसेच अंधेरी(मुंबई)येथील प्रमुख सूत्रधार विशाल डे यांच्या विरोधात हिंगणघाट पोलिस ठाण्यात फसवणूकीचा कलम 420, 465, 466 ,468,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस मुख्य सुत्रधाराच्या शोधात आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी मुख्य सूत्रधार आशिष डे तसेच मयुर वैद्य या फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथक मुंबई,नागपुर येथे रवाना झाले आहे.
पुढिल तपास उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हान यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गिरधर पेंदोर पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे, रामटेके,अभिषेक बागडे करीत असुन आता १० हजार रुपये भरून फसवणूक झालेल्या लाभार्थी कर्जदारांमधे निराशेची भावना पसरली आहे तर बोगस कंपनीत काम अजाणतेपणी काम करणाऱ्या युवा-युवतिंना आता पोलिस कारवाइस सामोरे जावे लागणार आहे.