राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

29

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.10मार्च):–स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले होते. विशेष अतिथी म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच नवनियुक्त सिनेट सदस्य डॉ. शुभांगी वडस्कर, गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव विनायकबापु कापसे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी डॉ. शुभांगी वडस्कर यांनी मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थांनी पदवी घेतल्यानंतर अवांतर ज्ञानामध्ये भर घालावी, नवनवीन कौशल्य आत्मसात करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थांनी न्यूनगंड बाळगू नये. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील यांनी प्रास्ताविकेतून सांगितले की, या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी गुणात्मकच नव्हे तर स्पर्धेच्या विविध क्षेत्रात चमकत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा “यावे ज्ञानासाठी, जावे सेवेसाठी” हा वसा घेऊन जातात. विद्यार्थांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आव्हाने स्वीकारावी. आपल्या अध्यक्षीय भाषणात गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले म्हणाले की, केवळ भौतिक वास्तू म्हणजे महाविद्यालय नाही. जर विद्यार्थांनी गुणात्मक झेप घेऊन समाज उपयोगी कामात भर घालावी. विद्यार्थांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजे. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख विषद केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. टी. बन्सोड यांनी केले तर आभार आयक्युएसी समन्वयक प्रा. आशुतोष पोपटे यांनी मानले. यावेळी उन्हाळी २०२० परीक्षेतील विविध शाखेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त सिनेट सदस्य डॉ. शुभांगी वडस्कर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.