बाजारपेठेचा राजा : ग्राहक !

372

(आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन सप्ताह)

जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. ग्राहक हक्क आणि त्यांच्या आवश्यकतांविषयी जागतिक स्तरावर दक्षता वाढविण्याचा हा दिवस आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करणे ही सर्व ग्राहकांच्या अधिकाराचा आदर आणि संरक्षण मिळावा अशी मागणी करण्याची आणि बाजारपेठेत होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणार्‍या आणि या हक्कांना कमी करणार्‍या सामाजिक अन्यायविरोधी निषेध करण्याची संधी आहे. ग्राहक हक्कांचा व्यापक अर्थ असा आहे की प्रत्येक ग्राहकाला वस्तू किंवा सेवांची गुणवत्ता, सामर्थ्य, प्रमाण, शुद्धता, किंमत आणि मानक याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जागतिक ग्राहक हक्क दिनाची एक थीम असते. उदा.- “टिकाऊ (शाश्वत) ग्राहक !” हा दिवस राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यापासून कल्पनेतून पुढे आला होता. त्यांनी १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकन कॉंग्रेसला एक खास संदेश पाठविला होता, ज्यात त्यांनी ग्राहक हक्कांच्या प्रश्नावर औपचारिकपणे भाषण केले.

असे करणारा तो पहिला जागतिक नेता होता. ग्राहक चळवळीने प्रथम ती तारीख सन १९८३मध्ये चिन्हांकित केली होती. आता दर वर्षी हा दिवस ग्राहकांच्या महत्वाच्या विषयांवर आणि मोहिमेवर कारवाई करण्यासाठी उपयोगी ठरतो.
भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. इ.स.१९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत – सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क आणि ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा हक्क. ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते.

केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच वेबसाइटवरही तक्रारी नोंदवल्या जातात. ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनकडून मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असती तर त्याबाबत काय तक्रार करावी? कुठे तक्रार करावी? त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? याची सर्व माहिती हेल्पलाइनद्वारे लोकांना देण्यात येते.ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्त्वाचा घटक झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण या ग्राहकाची फसवणूक केली जाते. एक वस्तू खरेदी करा व दुसरी वस्तू मोफत मिळवा. अमुक खरेदीवर सोने-चांदीचे नाणे मिळवा. चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षिसे मिळवा.

भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल. अशा प्रकारच्या जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. यासाठी रेरा कायदाही अमलात आला आहे.जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा संचय करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. जसे – फसव्या जाहिरातींना बळी पडू नये. वस्तू खरेदी करताना एमआरपी.पेक्षा जास्त किंमत देऊ नये. वस्तू कालबाह्यची तारिख – एक्सपायरी डेट पाहूनच खरेदी करावी.
!! विश्व ग्राहक हक्क दिन सप्ताह निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक व लेखक:-श्री एन. कृष्णकुमार जी. गुरुजी.
मु. पो. ता. जि. गडचिरोली. (७७७५०४१०८६).
इमेल – Krishnadas.nirankari@gmail.com