“कास्तकाराचं वास्तव जगणं मांडणारा काव्यसंग्रह : “जागल “

39

 अगदी शेती-माती आणि मायबोली मराठी भाषेशी नाते जपणारे सेवानिवृत्त शिक्षक,ज्येष्ठ कवीवर्य,समीक्षक जागलकार अरुण हरिभाऊ विघ्ने (रोहणा ता. आर्वी जि.वर्धा) यांचा “जागल” हा तिसरा काव्यसंग्रह.तत्पूर्वी त्यांचे “पक्षी”(२०००) आणि “वादळातील दीपस्तंभ” असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. तर “मी उजेडाच्या दिशेने निघालो’ हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.अस्सल वऱ्हाडी भाषेचा तडका असलेल्या या काव्यसंग्रहात कवींनी जे भोगले,सोसले,अनुभवले अन दृष्टीत पडले तेच त्यांनी अगदी बिनधास्तपणे आणि तितक्याच ताकदीने/तळमळतेने काव्य स्वरूपात मांडले.ग्रामीण संस्कृतीशी निगडित भाव-भावना आणि कष्टकरी माणसाच्या व्यथा वेदनांना त्यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून खऱ्या अर्थाने वाट मोकळी करून दिली.काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या बोली भाषेतील ग्रामीण भागातील विशिष्ट शब्दरचना,संकल्पना आणि संस्कृतीला जगाच्या दृष्टिपटलावर आणण्यास आपले कसब पणाला लावले.सखोल चिंतन,मनन यातून वऱ्हाडी साहित्य क्षेत्रात कवी अरुण विघ्ने यांनी नावीन्यपूर्ण संकल्पनाची, संवेदनांची अगदी पोटतिडकीने पेरणी केली.एक वऱ्हाडी कवी म्हणून त्यांनी जागलच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात स्वतःचा आगळावेगळा ठसा उमटविला.म्हणूनच त्यांच्या या काव्यरचनेला एका विशिष्ट साच्यात बंद करता येत नाही तर त्यांची ही काव्यरचना नक्कीच सर्वव्यापक अशी आहे.त्याचे प्रतिबिंब “जागल” मध्ये उमटलेले दिसते.

         मायबोली वऱ्हाडीची थोरवी जपणाऱ्या अन् संपूर्ण आयुष्यभर राब-राब राबणाऱ्या कास्तकाराच्या जगण्या-मरण्याचं वास्तव त्यांनी जागलमध्ये पोटतिडकीने मांडले आहे.या काव्यसंग्रहात एकूण ८५ काव्यरचना असून संवेदना प्रकाशन, खापरखेडा जिल्हा नागपूर द्वारे हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.काव्यसंग्रहातील काव्यरचनेच्या भावार्थाना साजेसे असे मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी तर आवश्यक त्या ठिकाणी समर्पक असे रेखाटने संजय ओरके यांनी अप्रतिमरित्या रेखाटले.वऱ्हाडी क्षेत्रातील नामवंत पुष्पराज गावंडे यांची अस्सल वऱ्हाडी भाषेतील प्रस्तावना कवीच्या लेखणीची ताकद/उंची आणि बोलीभाषेची थोरवी गाणारी आहे.हा काव्य संग्रह कवीनी आई-वडील,विभिन्न चळवळीतील निष्ठावान सच्चे कार्यकर्ते आणि जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकार मायबाप ह्यांच्या ध्यासाला कृतज्ञतापूर्वक समर्पित करून आपल्या सर्वव्यापक दृष्टीची अनुभूती दिली.

       शिक्षकी व्यवसायातील कवी अरुण विघ्ने यांनी रचलेल्या कविता या सर्वांना समजेल- उमजेल अशा साध्या,सोप्या सरळ भाषेत पण तितकीच प्रभावी आणि जनमनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. वायटूय,पोतीरं,खासर,आस्कुळ,
वखरवायी,उलंगवाळी,कणसं, धांडे,पिरानी,किळकले,जेवारीचं खयं,मिरुग,पयाटी,न्याहारी,गळीमाणूस,चटणी भाकर,दवळी,उभाया,केंडतीन, जंदतीन,हरकिजून,बारकयुन लिंचोंडा,बुहारी,दलींद्री,भदाळ, साटीसराप,झकोला,हागोन,कोड्डी, वाकय,बोतरी,सातरी, देशमुखी, असे शब्दप्रयोग खोट्या सुशिक्षितपनाच्या नादात विसर पडलेल्या भल्याभल्यांना आपल्या गावाकडची आणि ग्रामीण संस्कृतीची जाणीव करून देण्याची किमया कवीच्या शब्दरचनेने केली.जागलचे अवलोकन करताना गावखेड्यातील पण मोठमोठ्या पदावर विराजमान अन् शहरी संस्कृतीत हरविलेल्याना गावाकडच्या आठवणीत घेऊनच जात नाही .तर गावातल्या मातीची/ संस्कराची जाणीव करून देण्यास कवींना खऱ्या अर्थाने यश आले आहे ,असेच म्हणावे लागेल. हाच धागा वाचकांना कवी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास भाग पाडते. यावरून या काव्यसंग्रहाची महती आणि कवितेच्या प्रगल्भ शब्द रचनेची उंची अधोरेखित हीते.

      कवी अरूण विघ्ने यांनी शेती-माती संस्कृतीसह शेतकऱ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे/प्रसंग अलगदपणे टिपलेत. तसेच शैक्षणिक,राजकीय,सामाजिक पर्यावरण,प्रेम- विरह,थोरा-मोठ्यांच्या मार्गदर्शक विचाराची पेरणी करण्याचा कवीचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. अचूक,योग्य आणि मोजक्या शब्दात मांडणी हे त्याच्या यशाचे गमक म्हणावे लागेल.कवीला भाषेविषयी विशेषतः वऱ्हाडी  भाषेविषयी नितांत आदर आहे,ओढ आहे,प्रचंड आस्था आहे म्हणून वऱ्हाडी भाषा अटकेपार गेली पाहिजे असा त्यांचा ध्यास आहे,प्रयत्न आहे. त्यांची ही तळमळ लपून राहिली नाही.म्हणूनच सर्वांनी जात,धर्म, पंथ व्यक्तिगत मतभेद बाजूला सारून वऱ्हाडी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी सर्वांनी एकत्रितपणे/ एकदिलाने प्रयत्न करण्याचे आवाहन “लिहू वऱ्हाडी जगू वऱ्हाडी” या कवितेत केले.

“समदे यिऊन एका जागी
आता वऱ्हाडी गाणं गाऊ
माय वऱ्हाडीले मोठी करू
तिचा झेंडा अटकेपार लावू !”

        वऱ्हाडी भाषेला समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच एकदिलाने हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त करताना कवी म्हणतो,

“जात धर्म पंथ ईसरून
सबन एकच ईचार पेरू
लिहू वऱ्हाडी जगू वऱ्हाडी
शपत साऱ्यांयन घेऊ !”

           कवी वऱ्हाडतच लहानाचे मोठे झाले.मग वऱ्हाडाचे महत्व व्यक्त करण्यास ते कसे विसरणार! कवी विशद करतात की,

“ल्याली शृंगार माती
तिले हिरवाकंच शालू
नखशिखांत सजनी
मह्या वऱ्हाडाची कालू !”

      कवी गावखेड्यातील असल्याने त्यांना शेती-मातीची चांगली जाण आहे.समज आहे.शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणार स्वप्न पाहिलं,अनुभवलं आणि तेच त्यांनी काव्यात मांडलं.काव्यात/साहीत्यात नुसता कल्पनाविलास नसावा,भुकेच्या राजकारणाला थारा नसावा तर त्यात गावखेड्याचं वास्तव चित्रण असावं असे त्यांचे प्रामाणिक मत आहे.शेतकरी शेतमजुरांच्या समस्या/वेदनांना न्याय देण्यासाठी आपली लेखणी झीजली पाहिजे असे कवींना मनोमन वाटते.कवी “कवितेचं झाळ” यात व्यक्त होतात की,

“गाव खेळयाचं वास्तव आईस्य
मांडलं पायजे आपल्या शब्दात
कास्तकाराच्या मजुराच्या वेदना
उतरल्या पायजे वाचकाच्या मनात !”

       कवीला साहित्याची आस आहे म्हणून कवी म्हणतात की,

“माये वऱ्हाडी कवितायचं झाळ
घिऊन आला गावातला रानमेवा
जे म्या जगलो,पायलो थे मांडून
करावी म्हणतो साहित्याची सेवा !”

      कवीचं शेती मातीशी नातं लपून राहिलं नाही.त्यांच्या लेखनात शेतकरी-शेतमजूर हा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. काव्यसंग्रहाचे अवलोकन करताना याची प्रचिती येते. शेतकर्‍यांच्या व्यथा वेदना त्यांनी अगदी बिनधास्त आणि दमदारपणे मांडण्यास कसलीही कसर सोडली नाही.पेरणीपूर्व मशागती पासून तर माल विक्री करेपर्यंत शेतकरी राजा राबराब राबतो परंतु पुरेसा पैका मिळत नाही,पोटभर अन्न मिळत नाही, शेतमालाला रास्त आणि पुरेसा भाव मिळत नाही.दलालाकडून त्यांची नेहमीच पिळवणूक/फसगत होते.दलाल गोचिळासारखे शेतकऱ्यांचे रक्त पितात.म्हणून शेतकरी मायबापाच्या हाती अखेरपर्यंत काहीच लागत नाही.वाढत्या कर्जाचा विळखा सुटता सुटेना. शेतकऱ्याच्या या विदारक स्थितीचे वर्णन करताना कवी म्हणतात की,

“घाम गायून मातीत
बळी पिकवते मोती
जाई सारेच कर्जात
लागे ना काहीच हाती !”

     शेती कसण,पिकविण नक्कीच सोपं काम नाही. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात, मातीत जीव ओतावा लागतो,इतकं करूनही मानवनिर्मित तसेच वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्तीच्या झळा सहन करीत दारिद्र्य पोसावे लागते.म्हणून कवी “रक्ताची शेती”या कवितेत म्हणतात की,

“दुस्काय कसा राहते
जरासं वावरात जावून पाहावं
गरिबी कायले मनते थे
झोपाळ्यात ऱ्हावून पाहावं !”

       शेतात पीक जोमानं यावं, दारिद्र्य हरवून जावं या ओढीनं शेतकरी अंगमेहनत करतो,कष्ट उपसतो,कामाच्या नादात भूक-तहानही हरवितो.चांगल्या उत्पादनासाठी जेवणाचीही पर्वा करीत नाही.जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचं जगणं पाहून कवीचं मन भरून येतं.म्हणून कवी “वखरवायी” या कवितेत विशद करता की,

“किती करसीन बापा
अनवाणी वखरण
पोट लागलं पाठीले
कर थोडसं जेवण!”

       बदलता काळ अन नवतंत्रज्ञानाने संपूर्ण जग जवळ असलं तरी गरिबी श्रीमंतीची दरी मात्र तितक्याच वेगाने वाढत आहे.माणुसकीच्या पारड्यापेक्षा श्रीमंतीचे पारडे वरचढच आहे.जाती आधारित वर्णव्यवस्थेबरोबरच आर्थिक वर्णव्यवस्थाही तितक्याच ताकदीने उभी होत आहे.बळकट होत आहे.परिणामतः गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत असे दुष्टचक्र तयार होत आहे.शेतकऱ्यांना गरिबीच्या पारड्यातच टाकावे लागेल.लहरी निसर्ग आणि आर्थिक आघाडीवर अपयशाचा धनी ठरत असलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा,वेदना आणि संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडतानाच अडचणीच्या वेळी आपलेच आपल्याकडे कसे पाठ फिरवतात ,हे समाजव्यवस्थेचे बदलते स्वरूप कवींनी “आईस्याचं पोतीरं ” या कवितेत परखडपणे मांडले.

“पळतीच्या टायमाले
सारेच सोळतेत साथ
गेला जरी पावूनपणाले
हाकलेत मारून लाथ!”

      कवीनं समाज व्यवसंस्थेचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि वास्तव स्थितीचं भान निश्चितच वाखाणण्याजोग आहे.त्यांच्या शोधक दृष्टीत जे पडलं तेच त्यांनी अतिशय कौशल्याने काव्यात मांडलं.शेतकऱ्याच्या वास्तव स्थितीचा उलगडा त्यांनी वखरवायी,आला मिरुग,बोंड अई,तिफण्या,पेरणं,निर्दयी पाऊस,साज ल्याली माती,कुठ गेला रे पावसा,पोटासाठी काय बी,रगताची शेती,कास्तकाराच कर्तव्य,संसारगाणं,कास्तकार बाप, माय,आईस्यतलं गारपीट, जेवारीचं खयं,दुस्कायाचे बळी, येनं गा पावसा,संवाद भावा-बैनीचा,पारणं फिटलं,घाम गायते कास्तकार, सगर,वावरातली न्याहारी,खासर, कास्तकारी,पावसाचं गाणं, तणकट इत्यादी काव्य रचनेतून केला आहे.
       कष्टाला मोल नाही, शेतमालाला भाव नाही,कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.विस्कटलेल्या आर्थिक घडीत कुटुंबाचे हाल काही पाहावले जात नाही. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय जवळचा वाटत नाही.आत्महत्येने सर्वच प्रश्न सुटतात असे नाही.मात्र त्याची झळ मात्र संपूर्ण कुटुंबालाच सोसावी लागते.कुटुंब उघड्यावर येते.पतीच्या पश्चात विधवा पत्नीला सामाजिक अन्याय अत्याचाराला आणि अनिष्ट चालीरीतीला वेळोवेळी बळी पडावे लागते.विकृत लोकांच्या वाईट नजरांना चुकविता चुकविता नाकीनऊ येते.एकाकी पत्नीची होणारी ही घुसमट आणि सततचा संघर्ष कवीने अचूकपणे टिपला आणि समर्पकपणे काव्यात गुंफ़ला.”आठोन” या कवितेत कवी म्हणतात,

“लचके तोडत कुत्रे
संग व्हते चिले पिले
सारी जीनगानी गेली
हाकलता लांडग्याले !”

        पतीच्या पश्चात परिस्थितीशी एकाकी संघर्ष आणि कडवी झुंज देत संसार उभा करणाऱ्या पत्नीला पतीच्या प्रेमाविना होत असलेली घुसमट आणि वेदनेची सल कायम असते. पतीविना  एकाकी संसाराचा गाडा पुढे कसा रेटायचा ?हा पत्नीला पडलेला प्रश्न कवीनी पुढीलप्रमाणे मांडला आहे–

“तुम्ही सोळून गेलासा
साऱ्या लेकरा बाराले
कसा चालोला ह्यो गाळा
काय माहित तुम्हाले !”

      पतीच्या पश्चात पत्नीची एकाकी झुंज आणि पती-पत्नीच्या नात्यातील स्नेह उलगडन्या बरोबरच स्त्रीचा लढाऊ बाणा त्यांनी खंबीरपणे उभा केला.
        भारत देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,रक्त सांडविले, छातीवर गोळ्या झेलल्यात. त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्याची पहाट उगवली.आताही देशाच्या सुरक्षतेसाठी भारतीय वीर जवान आपल्या घरात दाराची पर्वा न करता सीमेवर शत्रूशी प्राणपणाने लढातात.हसत हसत हौतात्म्य पत्करतात.अशा वीर जवानांचे बलिदान वाया जाणार नाही याची आपण सर्व भारतीयांनी काळजी घेतली पाहिजे.त्याच्या कुटुंबाची हेळसांड होणार नाही.त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे कवीची ही तळमळ त्यांनी “शहिदांच बलिदान” या काव्यात समर्पकपणे गुंफली.

“शहिदांच बलिदान
वाया गेलं नाई पायजे
त्यायच्या लेकरायले
न्याय भेटला पायजे!”

     भारतीय संस्कृतीत गुरुचे आदराचे स्थान अद्यापही कायम आहे कायम राहील.म्हणून कवीला गुरुजी असल्याचा सार्थ अभिमान आहे.अनेकांचे भविष्य घडविण्याची संधी यानिमित्ताने प्राप्त होते.”बरं झालं म्या गुर्जी झालो” या कवितेत कवींनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

“बरं झालं बाप्पा म्या गुर्जी झालो
लेकरं घळवायचं मले काम भेटलं!”

      कवी अरुण विघ्ने यांची प्रत्येक काव्यरचना ही काळजाला भिडणारी अन् मनाचा ठाव घेणारी आहे.काव्यसंग्रहातील अनेक शब्दप्रयोग आणि साधने आपल्याला ग्रामीण अस्तित्वाची/अस्मितेची जाणीव करून देतात. वाकय त्यापैकीच एक.वाकयलाच  बोथरी,देशमुखी असेही संबोधले जाते.दोन तीन दशकांपूर्वी ग्रामीण भागात वाकयविना घर नव्हतं. बापाचं धोतर आणि मायचं लुगडं यांच्या स्नेहातून वाकय शिवल्या जात असे.वाकय म्हणजे माय अन बापाचं प्रेम असतं,मायेची ऊब असते.वाकयच पाहुण्यांची सरबराई आणि गरीबाची लाज राखत असे.सध्या त्याच वाकयची जागा आता ब्लांकेट्सह अन्य आधुनिक साधनांनी घेतली.वाकयमध्ये जो स्नेह प्रेम आणि जिव्हाळा आहे तो आधुनिक साधनात नक्कीच नाही.वाकयने गरिबीची लाज राखली आणि त्याच वाकयला खोट्या मोठ्यापणाच्या आणि स्टँडर्डपणाच्या नावाखाली बाहेरचा रस्ता दाखविला.म्हणून कवी म्हणतात की,काळाच्या ओघात तुम्ही कितीही मोठं व्हा पण आपले अस्तित्व विसरू नका असा अनमोल संदेश ” मायेची वाकय” या कवितेतून दिला.

“नोका लेकायहो तिची
असी अवदसा करू
माय बापाचे आशीर्वाद
असे दूर नोका करू!”

भूलू नोका दिस जुने
ते ओयख तुमची हाय
किती बी उळा वरत
मातीत ऱ्हावू द्या पाय !”

      मनुष्य आयुष्यात कितीही यशस्वी झाला आणि गगनभरारी घेतली असली तरी आपली स्वतःची लायकी कधी कुणी विसरू नये .असा अप्रतिम संदेश देतानाच मायबापा प्रति अखेरपर्यंत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला देण्यास विसरत नाही.मायबापाचं प्रेम शब्दात  व्यक्त करता येत नाही.आपल्या पिल्लांनी उंच भरारी घ्यावी यासाठी ते अहोरात्र कष्ट उपसतात,स्वतः अर्धपोटी/ उपाशी राहून पिल्लांना घास भरवितात,स्वतः फाटके कपडे परिधान करून मुलांना सूटबूटात ठेवतात,पोटाला चिमटा घेऊन पाल्यांना शिकवितात.स्वतःच्या उज्वल भविष्याची स्वप्न मुलात बघतात.हीच बाब हेरून कवी उल्लेख करतात की,

“बाप पैका पैका जोडून
सिक्सन सिकवी आमाले
स्वतः अर्धपोटी  रावून
घाली पोटभर जेवाले!”

      कवीने प्रेमासारख्या जिव्हाळ्याच्या विषयालाही स्पर्श केला आहे.प्रेमाचे विविध पैलू त्यांनी पिरतीच्या सागरात,कुस्नामाई रावून गेली,खासर,यासारख्या काव्यातून उलगडले आहे.” पिरतीच्या सागरात”या कवितेत कवी म्हणतात की,

“पानी भरून दिसते
जवानीच्या घागरीत
जागा देजो सखे मले
पिरतीच्या सागरात!”

       खासर या कवितेत कवी विशद करतात की,

“प्रेमाच्या वंगना विना
चाकं मोकये चालंना
समजदारीन वागा
संसार कव्हा मोळेना!”

       भारतीय संस्कृतीत स्त्रियांना दैवताचे स्थान बहाल केले असले तरी वास्तवात पुरुषाच्या तुलनेत तिला दुय्ययच स्थान आहे. स्त्रियांना विशेषता तरण्याताठया मुली घराबाहेर पडल्यानंतर तिला पुरुषाच्या वक्रदृष्टीला बळी पडावे लागते.टारगट पोराची वाईट नजर  तिच्यावरून हटत नाही.ती घराबाहेर पडल्यानंतर सुरक्षित असेलच असे नाही.प्रसार माध्यमातून प्रसारित होणाऱ्या घटना सर्वश्रुत आहे.दररोज कुठेना कुठे स्त्रियांवर अन्याय अत्याचार अन् बलात्कार झाला नाही ,असा दिवस शोधून सापडत नाही.म्हणूनच कवी मुलींना मवाळपणा सोडा जहालवादी बना,परावलंबित्वचा त्याग करून स्वतःची सुरक्षा स्वतःच करा, ओढवलेल्या कठीण प्रसंगाला स्वतःच सामोरे जा आणि विकृतांना ठेचून काढा. असे आवाहन करतात.” पोरी आईक जरा ” या कवितेत  उल्लेख करतात की,

“आलंच कोणी आडवं तं
खाली मान घालू नोको
डोयात त्यायच्या तिखट
फेकल्याशिवा रावू नोको!”
 
        समाजात स्त्रियांवर होणारा अन्याय,अत्याचार कवी कडून पाहवल्या जात नाही.अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो याची जाणीव ते करून देतात. यातून कवीनी महिलांच्या सुरक्षतेवर भर दिला आहे.कवींना महिला सक्षमीकरण अपेक्षित आहे.म्हणून कवी म्हणतात की,

“आता तुलेच झाशीची रानी
अन फूलनदेवी बना लागन
सोताच सुरक्षा कवच आता
तुला सोतालेच बनावं लागण!”

         पर्यावरणाचा समतोल राखणे हे मानवजातीसमोर एक मोठे आव्हान आहे. आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या/विकासाच्या नावावर वृक्षाची मोठ्याप्रमाणात राजरोसपणे कत्तल केली जात आहे.पर्यावरणाची होणारी ही हानी मानव जातीवर दूरगामी परिणाम करणारी आहे.हे कवींनी हेरले.मानवाच्या स्वार्थी वृत्तीने पर्यावरणाची पूर्णतःवाट लागली. पशु पक्षांची घरे उद्ध्वस्त झाली. हिरवं रान उजाड/भकास झालं. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कवी “भकास रान” या कवितेत वृक्षलागवड करण्याचे तळमळतेने सूचित करतात.

“पुरथयी झाली निर्वस्त्र
नेसवा तिले हिरवा शालू
जगाचं असीन निरोगी त
झाळ पोसन करा चालू !”

      कवी अरूण विघ्ने यांच्या काव्यरचनेला सामाजिक जाणीवेची झालर आहे.समाजमनाचा वेध घेत त्यांची प्रत्येक काव्यरचना ही अनुभवातून आणि अंतरर्मनातून कागदावर उमटते.समाजातील प्रत्येक पैलूचे अवलोकन करून त्यांचे रूपांतर काव्यात करण्यास कवीचा हातखंडा आहे.म्हणूनच त्यांची प्रत्येक काव्यरचना ही आपलंसं करून घेते.भुकंची आग,आईस्यचा सातबारा,वायटुय,आईस्यची व्यथा,बस्तरवारचं भातक,पिशवी अन पर्स,प्रिरमाची माणसं,मनाचा कोनोळा,लिचोंडा,धुपटाच मीस झालं,जिनगानीचं गठूळं,म्या घळलो असा,लग्नसराई, चिमनीचा खोपा,जिनगानीची रांगोळी,पोयाचा सन,परपंच,काय घिवून जासिन,काई तरी सिक, सुताची व्यथा, इत्यादी काव्यरचना सामाजिक जाणीव आणि ग्रामीण भागाचं जिवंत चित्र उभे करते.जो शेतीमातीत जगला,वावरला,तोच असे चित्र उभे करू शकतो. हे कवींनी त्यांच्या अनुभवातून दाखवून दिले आहे.
     मृत्यू एक अटळ सत्य आहे. म्हणून आपला देह समाजाच्या कामी आला पाहिजे.अहंकाराला गाळून गाडगेबाबाच्या दशसूत्री प्रमाणे कार्य केले पाहिजे.अशाच व्यक्तीची समाज ही दखल घेत असते हे सत्य कवीने आपल्या काव्यातून उजागर केले.”आईस्यचा सातबारा”या कवितेत कवी विषद करतात की,

“मरनाचा सातबारा परत्येकाचा
पयलेच तयार झाला हाये
गर्व कायले करता मानवा
जाचा दिवस ठरला हाय !”

  धर्मनिरपेक्ष देशाची ओळख असलेल्या भारतात विविध जाती, धर्म आणि पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात परंतु संधीसाधू आणि स्वार्थांध प्रवृत्तीचे लोक यास छेद देण्यास कसलीच कसर सोडत नाही.परिणामतः एकोप्याने राहणारे लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, नात्याला विसरतात हे चित्र पाहून कवीचे मन खिन्न होते.म्हणून कवी “गानं एकोप्याचं”या अभंगरचनेत समग्र समाजाला एकतेची हाक देतात.

“गुन्यागोविंदानं
जीवन फुलवू
सोबतीनं रावू
आनंदात! “

       द्वेषभावनेच्या नादात हरविलेल्या माणुसकीचे वर्णन “उभाया”या कवितेत कवींनी उत्तमरीत्या रेखाटले आहे.

“ज्यानं उखरलं हे वावर द्वेषानं
त्यांनाच पेटवलं हे रान ममतेचं
अमानुसकीत हारवली माणुसकी
बुळाले लागलं जहाज समतेचं!”

     बालपणातील भातक कवि अद्यापही विसरले नाहीत.कसे विसरणार ! त्यात कुटुंबाचा एकोपा आणि जिव्हाळा जपल्या जायचा ! नामशेष होणाऱ्या आठवडी बाजाराच्या आठवणींना योग्य शब्दात त्यांनी उजाळा दिला.दोन-तीन दशकापूर्वी आठवडी बाजार म्हणजे ग्रामीण लोकांचा सणच म्हणावे लागेल. शेव,पापडी,मुरमुरे फुटाण्याच्या मिश्रणातून बनलेला कच्चा चिवडा ग्रामीनासाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.बदलत्या काळात आता या आठवणी इतिहास जमा झाल्यात.त्यावेळी आठवडी बाजारा विषयी छोट्या-मोठ्यांना असलेली उत्सुकता वर्णन करताना कवी म्हणतात की,

“घरी येता, लहान भावंड
झोरा हातचा घेयेत
काय आनलं दादांनं?
आवळीन त्यात पाहेत !”

       पिढ्यानपिढ्या घट्ट पकड असलेल्या विषमतावादी समाज रचनेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी छेद दिला.गावकुसाबाहेरील शोषित,पीडित,वंचित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणलं.न्याय हक्क मिळवून दिलेत.सर्वांगीण विकासाच्या वाटा खुल्या केल्यात.सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग मोकळा केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरानीच बुद्धाचे तत्वज्ञान, पंचशील,प्रज्ञा,शील,करुणा,अत्त दीप भव शिकवलं.बहिष्कृत समाजाची प्रगती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने साधली. पिढ्यानपिढ्या अन्याय-अत्याचार सहन करणाऱ्या बहुजन समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले. भारतीय समाजावर डॉ. आंबेडकरांचे कधीही न फिटणाऱ्या  ऋणाची कवी  जाणीव करून देतात.”दयन दयल जनाईन” या कवितेत विशद करतात की,

“लाखोच्या लेकरायचं
ज्यानं आईस्य घळोलं
त्यायच्या उपकाराचे
रिन नाई रे फेळलं !”

      तथागत गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,संत गाडगेबाबा यांच्या कर्तृत्वाचा आणि विचारांचा प्रचंड प्रभाव कवीच्या लेखनात आहे.भगवान गौतम बुद्धाचे तत्वज्ञान आणि डॉ.आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीने तत्कालीन बहिष्कृत समाजाने “न भूतो न भविष्यती” अशी प्रगती साधली.म्हणून कवी म्हणतात

“उजेळाचं झाळ आलं राजेहो
लुंबिनी वनातून
कई पिळ्याचा अंधार गेला
माया झोपडीतून!”

        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला.कवी म्हणतात,

“आलं उजेळाचं झाळ
भीम बुद्धाच्या रूपानं
घर उजेळलं माये
धम्मदीक्षेच्या मिसानं!”

       भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.घटनाकारांनी संसद, कार्यपालिका,न्यायपालिका आणि माध्यमे या चार स्तंभावर लोकशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली.या चारही स्तंभाची कार्यपद्धती आणि स्वतंत्र अस्तित्व सुद्धा ठरवून दिले.या चारही स्तंभाच्या कार्यपद्धती वर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्वातंत्र्याच्या सत्तरीतील लोकशाहीची अशी अवस्था बघून कवी लिहीतात की,

“अज सकायी सकायीस राज्या
लोकशाई बुढि माया घरी आली
काय सांगू म्हने अरुनभाऊ तुले
माली लयचं बेकार गत झाली!”

     कवींनी आपल्या लेखणीतून संधिसाधू राजकीय पुढाऱ्यांचाही खरपूस समाचार घेतला. निवडणूक पूर्व कालखंडात संधिसाधू राजकारणी आश्वासनाची खैरात वाटत फिरतात.निवडणूक पश्चात त्यांनाच त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण होत नाही. म्हणून कवी म्हणतात राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता न केल्यास किंवा लोकांच्या कामी न आल्यास तेच लोक तुमची जागा दाखवून देतील असे सूचक मत कवीने आपल्या ‘चक्रव्यूह ‘ या काव्यरचनेत व्यक्त केले.लोकांनी मतदान करून जसे निवडून आणले तसे तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्यास मागेपुढे पाहणार नाही.

“लोकायनं देलं तुमाले मतदान
त्यायचा असा हासा करू नोका
त्यायची कायजी घेनं तुमचं काम
नाईतं हातून निसटते आला मोका!”

       पुढे कवी अतिशय मार्मिकपणे लिहितात की,

“तुया इकासाची म्हैस
कव्हा गाभन राईन
कव्हा व्हईन बायातीन
आनं कव्हा दूध देईन!”

        जागल म्हणजे काय हे समजून सांगताना कवीचं देशप्रेम अन् जगाच्या पोशिंद्याबद्दल असलेली तळमळ प्रकर्षाने निदर्शनात येते.कास्तकार भूक-तहान हरवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र जोमात आलेल्या शेतमालाची जागल करतो.आपणही आपल्या देशाची जागल करण्याची आवश्यकता कविने कवितेत मांडले आहे.

“जागल मंजे”
सीमेवर राखन करनं
संविधानाची सोकारी करनं
चेता रावून आरोयी ठोकनं
उपादी जनावरायचा खेदा करनं
तमाम पिकायची कायजी घेनं
अन्यायाइरोधात लळत रायनं !”

       कवी इथेच थांबत नाही ,तर पुढे उल्लेख करतात की,जागल करायची असेल तर सत्याची, नीतिमत्तेची,कास्तकाराच्या हक्काची,आया-बयनीच्या, लेकी-सुनायच्या इभ्रतेची,वऱ्हाडी बोली भास्येची,मायबोलीची, अहिंसेच्या तत्त्वाची, इदन्यानवादी इचाराची,समता,स्वातंत्र्य,बंधुता न्यायाची,अस्मितेची,अस्तित्वाची, स्वाभिमानाची,भ्रष्टाचारमुक्त देशाची,भूक भागविणार्या पिकाची,भाकरीची,मजूराच्या कष्टाची,दिल्लीतून गल्लीत येणाऱ्या योजनांची,तिजोरीतील प्रत्येक पैशाची,ईदेशी संस्कृतीपासून देशी संस्कृतीची, चांगल्या वाईट घटनांची नोंद घेणाऱ्या पेनाची,शोषित,पीडित वंचित,उपेक्षितच्या अधिकाराकरिता आवाज उठवणाऱ्या तमाम हातायची, दुर्जना पासून सज्जनाची,हिंसेपासून अहिंसेची, खोट्या पासून खऱ्याची ,अनितीपासून नीतीची “जागल” करण्याचे कवी आत्मीयतेने/तळमळतेने आवाहन करतात.
       सर्वकंश चिंतनातून कवीने काव्यसंग्रह निर्माण करण्यासाठी जीव ओतला.जीवनातील खडतर प्रवासातही न थांबता नवे अविष्कार काव्याच्या माध्यमातून प्रज्वलित केले.त्यांचा हा नाविन्यपूर्ण प्रयत्न समाजाच्या विशेषत: ग्रामीण जीवनाच्या वास्तव स्थितीचा वेध घेणारा, परिवर्तनाची दिशा देणारा, मायबोलीला महात्म्य प्रदान करणारा आणि नवी उमेद निर्माण करणारा हा काव्यसंग्रह वाचक, अभ्यासकांना निश्चितच आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कवी अरूण विघ्ने यांना पुढील सकस साहित्य निर्मितीसाठी,साहित्यिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो!
————————————————–
✒️लेेेखक:-प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे(अर्थशास्त्र विभाग प्रमुख)श्रीसंत शंकर महाराज कला ववाणिज्य,महाविद्यालय,पिंपळखुटा,ता.धामणगाव रेल्वे,जिल्हा अमरावती)मो:-९९७०९९१४६४
dr-nareshingale.blogspot.com
—————————————————