यशाचा मार्ग

26

परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीमध्ये काही न काही विशेष गुण दिलेले असतात.एखादी कला असते जी त्याला सर्वांपासून वेगळे बनवते.अनेक वेळा ती स्वतःलाही कळत नाही. मात्र ती शोधावी लागते. स्वतःला अथवा आपले मित्र मैत्रिणी सांगतात, अरे ! तू खूप छान गातो,नाचतो अथवा खूप छान चित्र रेखाटतो .अनेक वेळा ती अदृश्य स्वरूपात दडलेली असते. दहावी अथवा बारावी नंतर काय करावे ? हा सर्वात मोठा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडतो. आतापूर्वी सारखे जग सीमित नाही .आज अनेक पर्याय आहेत .अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये करिअर करता येऊ शकते. ह्यासाठी देखील उत्कृष्ट लेखकांची अनेक पुस्तके देखील आहेत जी मार्गदर्शन करतात. ही आजच्या पिढीला लाभलेली पर्वणीच आहे. पालक ही काही सुचवत असतात. आपले गुरू मार्गदर्शन करतात. सल्ला ही देतात.

मोबाईलमुळे तर जग अजून जवळ आले आहे. एका बटनावर बोट ठेवता अनेक क्षेत्राची माहिती अगदी सहज मिळते. पण येथेच सर्व गोंधळ होतो .तसे वय लहान असते. त्यामुळे नक्की काय करावे हे सुचत नाही .कधी कधी दुमत ही होते.मित्र मैत्रिणी काही वेगळं सुचवतात. त्यांच्यासोबत जावे, असे ही वाटते. ती जे क्षेत्र निवडतील तेच आपणही करावे असेही वाटते. त्यांच्याशी एवढे जोडलो असतो की आता त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. ते जे काही करतात तेच आपणही करावे असे वाटते .मनात खूप गोंधळ चालू असतो.मग काही प्रश्न पडतात, ते आपल्याला जमेल का ? त्यात आपण यशस्वी होऊ का ? नक्की काय करू ? पुढे काय ? काहीही सुचत नाही. अशा वेळी प्रथम शांत बसावे .कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला वेळ द्यावा .

स्वतःशीच संभाषण करावे.माझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी मी इतरांपेक्षा चांगली करू शकतो ?अथवा ती करताना मला खूप आनंद होतो ,न थकता न दमता अगदी सहज तासंतास करू शकतो ? मला ते केल्यावर खूप समाधान वाटते ? ती गोष्ट केल्याशिवाय मी स्वस्थ बसूच शकत नाही. ते माझे जगणे आहे. तीच तर माझी कला आहे आणि तीच तर पॅशन आहे, म्हणजे आपली आवड आहे. आणि हो ! जेव्हा आपली आवड हेच आपले काम होते तेव्हा तो मनुष्य यशस्वी तर होतोच पण सुखी आयुष्य जगू शकतो.हा निर्णय पक्का झाला पाहिजे. त्याबद्दल भविष्यात त्याची खंत वाटता काम नये.मग त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी कोणते क्षेत्र निवडावे ?कोणते शिक्षण घ्यावे? त्यात कसे पारंगत व्हावे ?ते ठरवावे लागते. एकदा हे सर्व ठरल्यावर मग मात्र जिद्दीने,चिकाटीने,प्रामाणिकपणे वाटचाल केली पाहिजे.कितीही त्रास झाला तरी आता पुढेच जायचे हे मनात पक्के करा.परिस्थिती आपली परीक्षा घेते. मात्र ध्येय निश्चित असले की ते साध्य करायचेच हा आत्मविश्वास आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.

जो पर्यंत मी जिंकणार नाही तो पर्यंत मी प्रयत्न करणार हे सकारात्मक विचार मनुष्याला यशाचे शिखर गाठायला मदत करतात.निंदेला घाबरून ध्येय सोडू नका.कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांचे मत बदलते, हा गुरू मंत्र कायम लक्षात ठेवा.कधी निर्णय चुकतात .मात्र न घाबरता पुन्हा हिंमतीने उभे राहण्याचे धाडस करा.शून्यातून जग निर्माण करणारीं अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मी कधीही हरणार नाही असे विचार ठेवा आणि कदाचित असे झालेच तर पुन्हा प्रयत्न करा, लढण्यावर अधिक भर द्या. मग कितीही वाईट परिस्थितीचा सामना मनुष्य करू शकतो. मनुष्य जेव्हा स्वतःच्या सामर्थ्याला जाणेल तेव्हा तो परिस्थितीचा गुलाम बनणार नाही. नव्याने उभे रहा.दिवस रात्र एक करून मेहनत करा .कारण कष्टाला पर्याय नाही.मी आजपेक्षा उद्या जास्त चांगल्या पद्धतीने काम करणार ही गोष्ट स्वतःला सांगा. रोज माझ्यात सुधारणा झाली पाहिजे.रोज नवनवीन गोष्टी शिकत रहा. अनुभव घ्या, पुस्तकापलीकडचे ज्ञान आत्मसात करा. आयुष्य आपल्याला अनेक धडे शिकवते.

त्यामुळे मनुष्य आयुष्य भर शिकत असतो .कधी जेष्ठांच्या अनुभवातून तर कधी स्वतःच्या अनुभवातून.मला बघितल्यावर लोकांनी माझ्या चेहऱ्याबद्दल विचार न करता माझ्या गुणांचा विचार केला पाहिजे.आपले विचारच आपल्याला सर्वांपासून वेगळे बनवतात. त्यासाठी अनेक त्याग करावे लागतात. स्वयंशिस्त असावी लागते.जर सचिन तेंडुलकरने गायक होण्याचे ठरवले असते अथवा सोनू निगमने क्रिकेट खेळायचा निर्णय घेतला असता तर बहुदा आज त्याची वेगळी ओळख निर्माण झाली नसती.त्यांना कोणीही ओळखलेही नसते.नाही का ? म्हणजे त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला म्हणून ते यशस्वी होऊ शकले. सर्वांना यशाचे अनेक दरवाजे आहेत. तो दरवाजा ज्याने त्याने शोधला पाहिजे. त्यासाठी प्रचंड मेहनत ही करावी लागते .लगेच अथवा सहजासहजी सर्व मिळेल असे अजिबात नसते. अनेक वर्षाचे कष्ट असतात. तेव्हाच यशाचे गोड फळ चाखायला मिळते. त्यामुळे स्वतःच्या अंतर मनात डोकावून पहा .स्वतःच्या आतील आवाज ऐकून पहा. तुमच्या भावी आयुष्या बद्दलचा निर्णय योग्य असणार ह्यात शंका नाही.आपले जीवन हा एक रस्ता आहे त्यामुळे सतत चालावे लागते .न थांबता प्रयत्न करावे लागतात. रस्ता चुकला तरी त्यातून मार्ग काढून पुढे जायचे असते.दृढ निश्चय व प्रबळ इच्छाशक्तीमध्ये अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ्य असते.

✒️लेखन : रश्मी हेडे

▪️संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.