✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.27मार्च):- सांगली, जळगाव महापालिकेत करेक्ट कार्यक्रम करुन भाजपकडे असलेली सत्ता आपल्याकडे खेचण्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे आता या दोन महापालिकेनंतर महाविकास आघाडीने धुळे महापालिकेवर 27आपले लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे या च्या महापौरपदासाठी आघाडीकडून राष्ट्रवादीला संधी दिली तर भाजपचा एक मोठा गट राष्ट्रवादीला मदत करु शकतो. आणि यासाठी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हालचालीही सुरू केल्या आहेत. धुळे महापालिकेत महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजांना हेरून महाविकास आघाडी पुन्हा तो प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

जळगावप्रमाणे धुळे महापालिका भाजपच्या हातून खेचून घेण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधल्याचे राजकीय घडामोडींवरून उघड होत आहे. अलीकडेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची एमआयएमचे आमदार फारुक शाह यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेला धुळे दौरा त्याचे संकेत देत आहे. ठरले. दोन महिन्यांनी धुळे महापौर पदाची मुदत संपत आहे. यावेळी भाजपला धक्का देण्यासाठी आघाडीतील नेते कामाला लागल्याचे सांगितले जाते. महापौरपदासाठी ३८ सदस्यांचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत असून या पक्षातील अंतर्गत नाराजी, अस्वस्थतेचा लाभ उठविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

मात्र असे असले तरी, सत्ताधारी पक्षात नाराज नगरसेवकांचा मोठा गट आहे. त्यांना गळाला लावण्याची राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, अनिल गोटे, शिवसेनेचे हिलाल माळी हे करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते कमलेश देवरे यांनी महापौर निवडणुकीत संधी मिळाली तर त्यादृष्टीने नक्कीच प्रयत्न केले जातील, असे सूचक विधान केले आहे. जळगावचे उदाहरण समोर असल्याने सत्ताधारी भाजपला धुळे महापालिकेत अधिक खबरदारी घेण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

धुळे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक एकजूट आहेत. काहींची नाराजी असेलही, पण, धुळे शहरात जळगावप्रमाणे परिस्थिती उद््भवणार नाही. भाजपचे नगरसेवक हे एकदिलाने काम करीत आहेत. धुळे शहरात जोमाने विकासकामे सुरू आहेत. यामुळे महापालिकेत जळगावसारखी परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही, याची १०० टक्के खात्री आहे, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED