
आज अचानक आठवण झाली त्या मुलीची.…जिच्यासाठी लिहायचो मी प्रेमकविता..…जिच्यासाठी झालो होतो मी प्रेमकवी..…अशी ती मुलगी “मेघा”..…सुंदर इतकी की,तिला पाहून स्वर्गातली परीही लाजेल आणि आवाज इतका छान की,रानकोकिळा स्वतःहुन सुंदर आवाज प्राप्त करण्यासाठी तिच्याकडे शिकवणी घेईल. कधीही कोणी सुंदर मुलीविषयी किंवा परीविषयी काही म्हटले तर मला कल्पनेत फक्त मेघा दिसायची.माझ्यासाठी परीही तीच आणि रातराणीही तीच.…काय जादू केले तिने कोणास ठाऊक पण माझी नजर तिच्यावरून हटायला तयारच व्हायची नाही. दिसभर तिला पाहत बसावे,कॉलेजचे हे अविस्मरणीय क्षण कधीच न संपावे आणि रात्रीच्या वेळीही आमच्यासाठी कॉलेज खुलेच रहावे.सुट्ट्या तर कधी याव्याच नाहीत.असे मनोमन मी इच्छा व्यक्त करू लागलो.ती माझ्या हृदयातच नाही तर सर्वांगात रक्तासारखी संचारु लागली.तिला माझ्या भावना कळो अथवा न कळो पण माझ्या प्रेमरुपी या भावनेचा मला इतका आनंद वाटायचा की,त्याला मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही.
कानाजवळचे तिचे ते सोनेरी रंगाचे केस वाऱ्यासोबत खेळताना,तिला हसत बघताना आणि तिचे बोलणे ऐकताना असे वाटायचे जणू,निसर्गातील प्रत्येक घटक तिलाच पाहण्यासाठी स्तब्ध झाले आहेत.सगळीकडे शांतता पसरलेली आहे असेच मला वाटायचे. तिच्या मुखावाटे “अजु”..…असा शब्द जरी निघाला तर मला असे वाटायचे की,मी स्वर्गाचा प्रवास करत आहे आणि त्या स्वर्गात मेघा माझी आतुरतेने वाट पाहत आहे.
तिच्या मिलना आधी क्वचितच मी एखाद्या मुलीच्या इतक्या जवळ आलो असेल.…किंवा हेही शक्य आहे की,मी कधी फार वेळेपर्यंत कोण्या मुलीशी बोललो नसेल.कारण मी होतोच तसा..…एकांतवास प्रिय असलेला..…
पण आयुष्यात मेघा आली आणि माझा एकांतवास संपला. माझ्या मनात सुद्धा आईशिवाय कोणत्या परक्या मुलीच्या प्रेमाला स्थान आहे,हे मला तिच्या भेटण्यावरून कळाले.खरंच..…तिच्या बोलण्याने आणि तिच्या स्वभावाने मी इतका प्रभावित झालो की,अचानकपणे बालपणीच माझ्यातला झोपलेला कवी जागा झाला आणि मी तिच्यावर रोज कविता लिहू लागलो.
सुरुवातीला मी माझ्या सगळ्याच कविता तिच्या सौंदर्याचे वर्णन आणि माझ्या तिच्यावर असलेल्या प्रेमाच्या उत्कट भावनेला व्यक्त करण्यासाठी लिहत गेलो.रोज मी कविता लिहत गेलो आणि तिला वाचून दाखवत गेलो.माझ्या कवितेवर ती खूप खुश व्हायची पण ह्या सगळ्या कविता फक्त तिच्यावर असलेल्या माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी आहेत.…हे मात्र तिला कधी कळायचे नाही. कविता लिहता लिहता मी कॉलेजमधल्या प्रत्येक शिक्षकांना परिचित झालो.मला त्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली.हळूहळू मी ह्या सगळ्या कविता मेघासाठी लिहत आहे, हे सगळ्यांच्या लक्षात येऊ लागले.त्यामुळे काही दिवसातच माझ्या मित्रांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ते मला मेघाच्या नावावरून चिडवू लागले.
तिला “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” हे सांगायला मात्र माझ्यात कधी हिम्मत येतच नव्हती.माझ्या मित्रांनी खूप प्रयत्न केले पण सगळे व्यर्थ गेले.तिचाही माझ्यावर प्रेम असेल का? याचा विचार करत तिच्या प्रत्येक हावभावाला आम्ही टिपू लागलो.तिचा माझ्याकडे पाहण्याचा आणि इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे?,ती माझ्याशी जशी बोलते तशी इतरांशी बोलते का?,तिला दुसरा कोणी आवडतो का?.…या सगळ्या चौकश्या आम्ही करू लागलो.तिच्या प्रत्येक हावभावारून असे लक्षात यायचे की, ती खरंच माझ्यावर प्रेम करते.एखाद्या वेळेस संधी आली म्हणजे आपण बोलूनच पाहू असा विचार आम्ही केला आणि ती संधी कधी येईल याची वाट पाहू लागलो.
काही दिवसानंतर तिने आणि माझ्या सगळ्या मित्रांनी चव्हाण सर कडे ईंग्रजी व्याकरण समजावे यासाठी शिकवणी लावल्या.मला हे चार,पाच दिवसानंतर कळाले. माझी पण शिकवणी लावायची इच्छा झाली पण तशी परिस्थिती माझी नसल्या कारणाने मी शिकवणीला जाऊ शकलो नाही.मेघा आधीपासूनच फार हुशार असल्याने चव्हाण सरने प्रश्न विचारल्याबरोबर तिचे उत्तर तयार राहायचे.त्यामुळे इतरांना बोलायला संधी मिळायचीच नाही. मुलांना स्वतःची फजिती झाल्यासारखे वाटायचे.त्यामुळे त्यांनी मला शिकवणीला येण्याची विनंती केली व माझी फीस सगळे मिळून भरतील हे मान्य केले.मलाही जायचेच होते त्यामुळे मी जास्त वेळपर्यंत गप्प राहू शकलो नाही आणि मी शिकवणीला जायला तयार झालो.
माझा शिकवणीच्या वर्गात प्रवेश होताच सरांनी माझाच आवडता टॉपिक हाताळला..…तो म्हणजे काळ.काळाची मला सगळी माहिती होती मला वाटत होते की मेघाच्या आधी आपण उत्तर देण्यासाठी उभे राहावे पण माझा पहिलाच दिवस होता त्यामुळे मी गप्प राहण्याचा अट्टाहास धरला.सरांनी शिकवणी पूर्ण झाल्याबरोबर जेव्हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केले त्यावेळी फक्त मेघा बोलत होती आणि बाकीचे शांत होते.मला वाटले ही चांगली संधी आहे.माझ्या उत्तरामुळे मेघा थोडीशी आणखी आकर्षित होईल या हेतूने मी उठलो आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देत गेलो आणि त्यांचे नियमानुसार स्पष्टीकरणही केले.त्या दिवसापासून आमच्यात घट्ट मैत्री जमली आणि मी मोकळा श्वास घेऊ लागलो.आता वाट होती ती फक्त त्या संधीची ज्यामुळे मी तिला माझ्या भावना व्यक्त करू शकेल..…
१४ फेब्रुवारीचा दिवस उजाडला आणि माझ्या मित्राने मला म्हटले की, “आज कोणीही कोणाला प्रपोज केले तर हो किंवा नाही व्यतिरिक्त कोणी काही म्हणणार नाही.तू तिचा नंबर घे आणि कॉल करून तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर.” असे म्हटल्याबरोबर मी माझ्या हिम्मतीला एकवटू लागलो आणि तिला कॉल करून माझ्या सगळ्या भावना तिच्याकडे व्यक्त केल्या.त्यादिवशी तिच्याशी फोनवर बोलताना माझे हातपाय एखाद्या म्हाताऱ्या माणसावाणी कापत होते.
“अजु..…तू मॅड झालास काय रे.…?, तू असा विचार सुद्धा कसा करू शकतोस?, मी तुझ्यावर कधीच प्रेम केले नाही आणि करणारही नाही.आपण चांगले मित्र आहोत आणि जर तुला मित्रता टिकवायची असेल तर हा विषय बंद कर नाहीतर मी सरांना सांगेल.” असे म्हणून तिने कॉल कट केले.मी मात्र त्या दिवसापासून तर आजपर्यंत तिला आठवून कविता लिहत गेलो.कधी विरहाच्या तर कधी प्रेमाच्या,कधी असमानतेच्या तर कधी समतेच्या,कधी प्रेमाच्या भक्तीत तर कधी विठ्ठलाच्या भक्तीत मी रमत गेलो.आजही तिला मी तेवढाच आठवत आहे जेवढा त्यावेळी आठवायचो.ती मला सोडून कुठेतरी दूर गेली पण तिच्यामुळे मी कवी झालो आणि माझ्यासारख्या असंख्य वेदनेने त्रासलेल्यांचे दुःख माझ्या कवितेतून व्यक्त करत गेलो.काव्यरूपी कलेची भेट देऊन तिने माझ्या एकतर्फी प्रेमाला बळ मिळवून दिले त्यामुळे आजही मी कविता लिहतो आणि तिला कवितेतून आठवतो.एकतर्फी प्रेम करत.…
✒️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,तरनोळी
ता.दारव्हा,जि.यवतमाळमो.८८०५८३६२०७
