🔹शासकीय रूग्णालयावर लोकांचा विश्वास

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.28मार्च):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांकरिता सद्या ऑक्सीजन बेडची संख्या पर्याप्त असली तरी पुढील लाटेत दररोजची रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्यास आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात अधिकचे ऑक्सीजन बेड निर्माण करण्याची गरज असून प्रत्येक तालुकास्तरावरदेखील 20 ते 25 ऑक्सीजन बेड तयार ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आ. सुधीर मुनगुंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, प्र. जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

आरोग्यमंत्री टोपे पुढे म्हणाले की शासनस्तरावरून आरोग्यसेवेतील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, मात्र कोरोना प्रतिबंधासाठी रिक्त पदांचा अडसर येऊ नये म्हणून शासकीय रूग्णालयाने 24 तास सेवा देणाऱ्या टेले-आयसीयु चा पर्याय स्विकारण्याचे तसेच खाजगी डॉक्टरांचे मानधन ठरवून आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याही सेवा घेण्याच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत कोरोना आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल 24 तासाचे आत मिळालाच पाहिजे असे सांगतांना यासाठी आवश्यकता पडल्यास खाजगी प्रयोगशाळेची मदत घेण्याचेही त्यांनी सांगितले
नागरिकांनी अंगावर दुखणे काढू नये, ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे दिसताच दवाखाण्यात तपासणीला आले पाहिजे यासाठी प्रशासनामार्फत आशा वर्कर व आरोग्य सेवकांमार्फत सारी, आयएलआय व व्याधीग्रसत रूग्णांचे सर्व्हे व ट्रेसींग मोठया प्रमाणात सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लोकं मोठया विश्वासाने शासकीय रूग्णलयात येतात त्यामुळे शासकीय रूग्णालय, सर्व कोविड केअर सेंटर व संस्थात्मक विलगीकरण कक्षात साफसफाई, उत्तम जेवणाची सोय व प्रसाधन गृहाची स्वच्छता ठेवणे गरजेचे असून रुग्णांकरिता उत्तम पद्धतीची व्यवस्था झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. खाजगी रूग्णालये देखील त्यांचेकडील रुग्ण शेवटच्या क्षणी शासकीय रूग्णलयाकडे शिफारस करतात, कोरोनाबाधीतांवर वेळीच उपचार व्हावे म्हणून लक्षणे आढळून येणाऱ्या रूग्णाचे स्वॅब नमुने तातडीने तपासणीला पाठविने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरणाचा आढावा घेतांना ना. टोपे यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. ज्या रुग्णालयात पुरेशी जागा, डॉक्टर व लस ठेवण्यासाठी कोल्डचेन उपलब्ध आहे, त्या सर्व शासकीय व खाजगी ठिकाणी लसीकरण केंद्र सूरू करून लसीकरणाचा वेग दुप्पट करावा. लस कमी पडू दिली जाणार नाही, आपल्या मागणीप्रमाणे लससाठा उपलब्ध करून देण्यात यईल, असे त्यांनी सांगतले.
यावेळी आ. सुधीर मुनगुंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार यांनी प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी योग्य समन्वयाने काम करण्याची गरज तसेच वैद्यकिय सेवेतील रिक्त पदभरती, कंत्राटीसेवकांचे प्रश्न, उन्हाळ्यात लसीकरणाच्या वेळेत बदल, ग्रामीण भागात उपचाराची सोय, जिल्ह्यासाठी वाढीव लस साठा इ. बाबींकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

सुरवातीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना प्रतिबंधाकरिता जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, सर्वाधिक ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णसंख्येच्या 10 टक्के अधिक रूग्णसंख्या गृहीत धरून केलेले नियोजन, जिल्हा व तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरमधील बेड व ऑक्सीजन सुविधा, सुपरस्प्रेडच्या गटनिहाय टेस्टींग, 500 ते 600 वरून 3000 ते 4000 वर सुरू करण्यात आलेल्या रोजच्या कोरोना तपासण्या, नव्याने लावण्यात आलेले दोन लिक्वीड ऑक्सीजन टँक, तसेच दैनंदिन तपासण्या वाढविण्यासाठी अतिरिक्त व्हीआरडील लॅब मंजूर करण्यासाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव याबाबत तसेच जिल्ह्यात एक लाख लसीकरणाचे डोज दिल्याबाबत आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेशीदेखील चर्चा करून येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपायांबाबत चर्चा केली व आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.बैठकीला जिल्हा लसीकरण अधिकरी संदिप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी अविष्कार खंडारे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED