विलास वाघ: परिवर्तन विचारांचा सुगावा

27

माणूस गेल्या नंतर त्याचे महत्व कळते.त्याने लावलेलं रोपटे जेव्हा वटवृक्ष बनतो त्यावेळी त्यांच्या त्याग कष्ट आणि जिद्दीचे कौतुक केले जात नाही.आज त्यांनी लावलेला वटवृक्ष विशाल डेरा घेऊन उभा दिसतो.शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना विशेष कवी,गायक, लेखक,पत्रकार,साहित्यिक यांना प्राध्यापक विलास वाघ उषा वाघ यांचे सुगावा प्रकाशन व सुगावा मासिक माहिती नाही असा एक ही व्यक्ती भेटणार नाही, पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक पुस्तक,ग्रंथ प्रकाशित करणारे एकमेव प्रकाशक व प्रकाशन म्हणजेच विलास वाघ सुगावा.वैचारिक क्रांती घडवून आणण्याची असेल तर स्वतःचे वैचारिक प्रबोधन परिवर्तन घडविणारे मुखपत्र मासिक, पाक्षिक,साप्ताहिक पाहिजे.

त्यासाठी स्वतःचा प्रिंटिंग प्रेस व प्रकाशन संस्था पाहिजे. हे मी विजय सातपुते यांच्या संगतीने कॉम्रेड शरद पाटील यांच्याकडून शिकलो. तेव्हाच मला विलास वाघ,उषा वाघ यांच्या सुगावाची ओळख झाली. चळवळीतील लेखक,साहित्यिक यांची पुस्तके प्रकाशित करून ते किर्याशील कार्यकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचे ऐतिहासिक काम विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशन यांनी केले आहे. त्याला तोड नाही.पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनाच्या चळवळीतील स्वयंप्रकाशित, उच्चशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. विलास वाघ सर. उत्तम संपादक, उत्कृष्ट प्रकाशक म्हणून महाराष्ट्रात त्यांची वेगळी ओळख राहिली आहे. मासिक सुगावा आणि त्यांच्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन करून परिवरर्तन करणाऱ्या चळवळीला गती देणा-या शेकडो साहित्यिकांची पुस्तके समाजापुढे आणण्याचे महान कार्य विलास वाघ सरांनी अत्यंत निष्ठेने केले.

उपेक्षित समाजघटकाच्या मुलामुलीना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत यासाठी त्यांनी आश्रमशाळा, महाविद्यालये या स्तरावर रचनात्मक कार्य करून महापुरुषांच्या विचार चळवळीतील सच्चा अनुयायी कसा असावा याचा आदर्शजीवन पट उभा केला. महाराष्ट्राच्या या निष्कलंक, चारित्र्य संपंन्न व्यक्तिमत्वाची वाटचाल नव्या पीढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादायी आहे.विलास वाघ सर म्हणजे निष्ठेने जिद्धीने त्याग करून कोणताही गाजावाजा न करता काम करत रहाणारे ध्येयवादी व्यक्तीमत्व होते., साधी राहणी उच्च विचारसरणी आणि सामाजिक प्रश्नची जाणीव ठेऊन चळवळ करणारे, ही वाघ सरांची ओळख होती.बाकी अनेक लोक असतात चळवळ कमी आणि वळवळ जास्त करीत असतात.

विलास अनंत राव वाघ जन्म १ मार्च १९३९ रोजी,मु-पो. मोराने तालुका जिल्हा धुळे,पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे,पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड विद्यालय,जून १९५८ एसएससी परीक्षा पास.१९५८ ते १९६२ पुण्यातील एसपी महाविद्यालयातून बी एस सी उत्तीर्ण.जून 1962 कोकणातील नरडवणे गावात शिक्षकाची नोकरी.१९६४ ते १९८० पुण्यातील अशोक विद्यालयात शिक्षकाची नोकरी .१९७२ : सुगावा प्रकाशनाची सुरुवात ते आजतागायत सुरू. १९८१ बीएड उत्तीर्ण.१९८३ उषा ताई वाघ याच्याशी आंतरजातीय विवाह: सरांच्या अनेक कामामध्ये ताईंचा पुढाकार १९८१ ते १९८६ पुणे विद्यापीठातील प्रौढ निरंतर शिक्षण विभागात रीडर म्हणून काम केले. १९८६ पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा.१९६४ ते १९८० या काळात वडारवाडीत बालवाडी सुरू केली.सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरू केले.राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वर्ष अध्यक्ष.१९७२ समता शिक्षण संस्थेची स्थापना या संस्थेमार्फत महिलाश्रम वसतिगृह तळेगाव येथे सुरू केले.कस्तुरबा मुलींचे वस्तीग्रह तळेगाव ढमढेरे येथे सुरू केले.समता मुलांचे वस्तीगृह तळेगाव येथे सुरू केले.

१९७८ भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींसाठी तळेगाव येथे आश्रम शाळा सुरू केली.१९८९ मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केली. १९९४ मोराणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले.१९९६सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार, दोन वेळा चेअरमन. १९७४ पासून सुगावा मासिक सुरू केले.समाज प्रबोधन संस्था मासिकेचे पदाधिकारी.पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त.परिवर्तन मिश्र विवाह संस्थेची स्थापना.विलास वाघ साधा माणूस पुस्तक विकण्याचे काम करतो असे वाटणाऱ्याना या रचनात्मक कामाची फारशी ओळख नसेल.शिक्षणात सवलत घेऊन उच्चशिक्षित झाल्यावर नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ घेणारे आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती करीत राहतात.सुंदर बायको सुंदर गाडी,बंगला प्लॉट नंतर मुलांचे शिक्षण यातच त्यांचा पूर्ण वेळ जातो त्यांना समाजात गावात,तालुख्यात,जिल्ह्यात विलास वाघ सरांच्या सारखे रचनात्मक कार्य करावे असे कधीच वाटत नाही.आपले लोक व्यसनाधीन आहेत ते सुधारणार नाहीत असेच त्यांच्या तोंडपाठ असते.

मी मुंबई असतांना १९८२ ला कॉम्रेड शरद पाटील यांची ओळख झाली.ते आम्हाला नेहमी म्हणत होते. तुम्हा इंडियात राहणाऱ्यांना भारत कसा समजेल.तो समजून घेण्याचा असेल तर भारतातील ग्रामीण भागातील खेड्यात येऊन दोनचार दिवस राहून पहा. तेव्हा मी ,विजय सातपुते,अंकुश भोले,सर्जेराव द्राक्षे,श्रीधर चीलप १९८४ ला असंतोषवाडी देवपूर,धुळे,विसरवाडी,पिंपळनेर शहादा, नंदुरबार साक्री या आदिवासी भागात डोंगर बागुल,नजुबाई गाबीत यांच्या सोबत फिरलो तेव्हा खरा इंडिया व भारत यातील फरक कळला.त्यावेळी कॉम्रेड शरद पाटील नेहमी विलास वाघ यांचे काम आणि कार्य याची माहिती देत होते.तो पुण्यात राहून धुळे जिल्ह्यात काय काय करतो त्याचा आदर्श घ्या असे सांगत होते.हे लिहण्याचा कधी योग आला नाही.पण विलास वाघ सरांचे दुखद निधनानंतर हे सर्व आठवायला लागले.माणूस गेल्या नंतर त्याचे महत्व कळते.त्याने लावलेलं रोपटे जेव्हा वटवृक्ष बनतो त्यावेळी त्यांच्या त्याग कष्ट आणि जिद्दीचे कौतुक केले जात नाही.मात्र तो गेल्या नंतर त्यांनी लावलेला वटवृक्ष विशाल डेरा डोळ्यासमोर उभा दिसतो.विलास वाघ आणि मासिक सुगावा कायम आठवणीत राहण्यासाठी सुगावाचे वार्षिक वर्गणीदार,आजीवन सभासद व्हा.अशा प्राध्यापक विलास वाघ सरांना सत्यशोधक कामगार संघटना परिवारांच्या वतीने भावपूर्ण श्रदांजली.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य