काय दचकलात का ? होय खरंच मी कोरोनाचा विषाणू बोलतोय ! अहो विषारी असलो तरी आम्हीही जीवंत जीवच आहोत. आम्हाला एकटं राहणं अजिबात आवडत नाही.ते तुम्ही समाजशील वगैरे काही म्हणताना तसे आम्हीही समाजशील जंतू आहोत.गर्दी म्हणजे आम्हाला अति प्रिय ठिकाण.आम्ही कोरोनाचे खतरनाक विषाणू.आज संपूर्ण जगावर गर्दीच्या ठिकाणी राज करत आहोत. आमच्यातील अति सूक्ष्म घटक जरी कुणाच्या प्रेमात पडला आणि कुणी आम्हाला नुसता स्पर्श करायचा अवकाश, आम्ही त्याला असा जीव लावतो की, पुढे जाऊन तो ज्या कोणाच्या संपर्कात जाईल त्यांच्यावरही अगदी भेद भाव न करता जीव (वाट) लावत सुटतो. कुणाला क्षमा नाही की दया नाही. आमची एवढ्या मोठ्या प्रमाणात भरारी म्हणजे आमच्या देशवासीयांच्या मनात ब-याच वर्षांपासून इतर देशांतून आमच्या चीनमध्ये येणाऱ्यांबद्दल एक सल होती* *कुठल्याही देशाची युवा पिढी म्हणजे त्या त्या राष्ट्रांची संपत्ती आणि शक्ती असते. त्यांचा परिवार आणि देश त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अफाट खर्च करत असतात.

मात्र अलिकडे पंख फुटले की, पक्षी घरटे सोडून उडून जातात तसे आजची तुमची ही युवा पिढी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग देशासाठी न करता आपल्या स्वार्थासाठी परदेशात पळतात. इतर देशात का जाईनात परंतु आधीच आमच्या देशात मुंग्यासारखी दाट लोकसंख्या असताना अशा आपली मायभूमी सोडून आमच्या डोक्यावर येऊन बसलेल्या लोकांचा आम्हाला तिटकारा आला होता. त्या सर्वांना आपापल्या देशात पळवून लावणे हे आमच्या देशापुढील प्रमुख उद्देश होता.भारताचाच विचार करायचा झाला तर १९७५ साली आलेल्या ‘शोले’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटात गब्बरसिंगच्या तोंडून सुटलेला एक संवाद आठवतो का पहा. त्यावेळी तो खूप गाजला होता. आणि तो संवाद असा होता ‘जो डर गया समझो वह मर गया’ या संवादाला एक भयाण आणि आवाहनात्मक भयानक पार्श्र्वभूमी होती. याची आठवण करून देण्याचे कारण अलिकडेच चीनने आम्हाला जन्म दिला आणि सा-या जगाची वाट लावण्यासाठी आम्हाला अशा रितीने टाकून दिले की, तो संवाद उलटा लक्षात ठेवणा-यालाच म्हणजे ‘जो डर गया… म्हणजे,आम्हाला भिवून, आमचा धसका घेऊन स्वत:ची काळजी घेत आहे त्यालाच आम्हाला जिवंत ठेवावे लागत आहे.

त्याच्या वाटेला आम्हाला जाताच येत नाही. आणि हो ! जो निष्काळजीपणाने वागला, वागतोय. आपल्या कड़े अमुक बुवांचे ताईत आहे,गंडा आहे, विशिष्ट राशीच्या खड्याची अंगठी आहे आपल्याला कशाची आणि कुणाची डर नाही अशा तो-यात राहून जे मोकाट फिरतात त्यांना आम्ही झटका दिल्याशिवाय, त्यांचा मुडदा पाडल्याशिवाय सोडतच नाही आणि आतापर्यंत सोडलेलेही नाही.*
*मुळात भारतात शिरकाव कसा करायचा हा आमच्यापुढे यक्ष प्रश्न होता. कारण भारतात ३३ कोटि देव आहेत आणि ते ही नवसाला पावणारे ! संकटकाळी धाऊन येणारे ! सुखकर्ते, दुखहर्ते असे नाकातुन, कानातुन, बेंबीतुन ,मटक्यातुन, खांबातुन, खिरीतुन, पायातुन, माशाच्या/ मगरीच्या पोटातुन, जमीनीतुन,डुकराच्या पोटातून, अगदी आग ओकणा-या सुर्याच्या किरणांमधुन देखील दोन भिन्न लिंगी जीवांच्या संबंधाविना जन्म घेणारे देव आणि बुवा-बाबा,पंडीत- फकीर, फादर-साधु-भगत, आम्मा .टम्मा भट-भविष्यकार‌ अशी त्यांच्या दलालांची फौज ही तैनात असते.अशी वदंता होती.*

*अंधश्रद्धा,चमत्कार,जादूटोणा.नवस.व्रतवैकल्यं, उपास तापास अशी पॉवर फुल्ल यंत्रणा इथे आहे हे देखील ऐकलं होतं*
*तरिही एवढ्या टप्प्यातून आम्ही सही सलामत भारतात शिरकाव करण्यात यशस्वी झालो. वरीलपैकी कुठलीही शक्ती अथवा यंत्रणा आम्हाला रोखायला पुढे आली नाही हे विशेष. त्यामुळे अशी काही शक्ती कार्यरत आहे असे आम्हाला जाणवलेच नाही. ट्रम्प तात्या आपला लवाजम्यासह भारतात शिरला.त्या गर्दी गोंधळाची संधी साधून मी ही माझ्या लवाजम्यासह भारतात घुसखोरी केली*.
*देव देवता तर सोडाच परंतु ज्यांनी खबरदारी घेणे गरजेचे होते त्यांनीही आम्हाला खिजगणतीत धरले नाही. आमच्या भीतीने प्रार्थना स्थळांनाही कुलुप बंद करावे लागले होते हे तुम्हाला माहीतच आहे.तरिही देव काही कोपला नाही की आपला करिष्मा दाखवला नाही.मग आम्हालाही कुणीतरी हळूच सांगितले ‘गाडगेबाबा’ नावाचा संत की महात्मा इथल्या लोकांना आधीपासूनच हे सांगत होते म्हणे.पण त्यांचं कुणीही ऐकलं नाही.बरं झालं ऐकलं नाही.कारण ते गाडगेबाबा किती सत्य सांगत होते हे पटवून देण्याची संधी आम्हाला मिळाली. लोक पुजा अर्चा,होम-हवन यांच्या नादी लागूनही आम्हाला त्यापासून काहीच धोका नाही हे आमच्या पक्के लक्षात आल्यामुळे मग काय आम्ही वायू वेगाने देशभर मोकाट सुटलो.*


*ब-याच ठिकाणी होम हवन महामृत्युंजय‌. महायज्ञ. भंडारा, पारायण.जागरण.सप्ता-हप्ता असे सगळे प्रकार सुरू होते* *टाळ्या आणि थाळ्या वाजविणे,लख्ख उजेड असताना अंधार करून मेणबत्त्या पेटविणे अशा सर्व भंप्पक कथा आणि उपचारांमुळे आम्हाला काहीच इजा होणार नाही याचीही आम्हाला खात्री पटली होती*
*आम्हाला भीती वाटत होती फक्त इथल्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचीच.परंतु इथले लोक मात्र त्यांच्याकडे न जाता बुवा-बाबांच्या नादी लागले होते. त्यांच्याकडे न जाता बैठक आणि सत्संगमध्ये जाण्यालाच प्राधान्य देत असल्याने आमचा संचार ख-या अर्थाने मुक्त संचार होत गेला.*
*अंथश्रध्दा आणि अंधभक्ती हे माणसाची बुध्दी गहाण ठेवुन माणसाचा विकास खुंटवतात. हे जितके सत्य आहे.तितकेच कोणतेही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकट असो. अंधश्रद्धच्या आहारी जाऊन काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवत माणसं आयुष्याचं वाटोळे करून घेतात हे एक ढळढळीत वास्तव आहे हे मला मनोमन पटले आहे.*
*असेच सतत देव आणि धर्म या एकाच संकल्पनेत मती गुंग झाल्यामुळे श्वास-उच्छवास या नैसर्गिक क्रिया देखील देवाची देणगी आहेत.कर्ता करविता तोच आहे.अशी नितांत श्रद्धा असलेल्या, नव्हे, अंधश्रद्धेची मानसिक गुलामी पत्करलेल्या एका उच्चशिक्षिताच्या गळ्यात मी संधी मिळताच मोठ्या प्रेमाने आमच्या कोरोना विषाणूची माळ घातलीच. हो अगदी प्रेमाने !*


*कारण अख्या जगातील शास्त्रज्ञ, डॉक्टर्स,तज्ञ आरोग्य सेवक आदींनी या विळख्यापासून दूर राहण्यासाठी अनेक सूचना, उपाय सांगितले असतानाही, तारणारा ही तोच आहे आणि मारणाराही तोच आहे. आपण मात्र देव आणि त्याच्यावरची श्रद्धा ढळू द्यायची नाही आणि बुवांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या मर्जी विरूध्द आपण वागायचेही नाही असा दृढनिश्चय करून बाष्कळपणाने त्या उच्चशिक्षीताने बुवांनी सांगितलेल्या नित्योपचारापेक्षा अधिक खर्च करून मंत्र-जप, होम-हवन घरीच मांडला होता. तिकडे त्याच्या पुजा-अर्चा जशा वाढत होत्या तितक्याच वेगाने मी त्याचा त्रासही वाढवायला सुरुवात केली. मला इथे येण्यापूर्वीच वर सांगितल्याप्रमाणे माझ्या कानावर आलं होतं की, भारतात तेहतीस कोटि देव आहेत परंतु आज वर्ष उलटून गेले तरी मला एकही देव भेटला नाही की दिसला नाही. प्रत्यक्षात त्याचा प्रत्यय आजपर्यंत कुणालाही आलेला नाही. एवढ्या अवधित मला मात्र हे चांगलेच समजले की इथे महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ चा चांगलाच दबदबा आहे.मी देव आहे अशी बतावणी करणा-या ब-याच जणांना या ‘अंनिस’ ने वठणीवर आणले आहे हे समजले. आणि हीच मला आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे हे कळून चुकले.

नेहमी नकारात्मक चर्चा करत असूनही काही जणांना त्याचा झटकाही जाणवला आहे हे समजले.’अंनिस’ च्या समाजाभिमुख जनजागृति मुळे त्या बैठक बहाद्दर उच्चशिक्षीताचा विरोध झुगारत त्याच्या ओळखीच्या लोकांनी त्याला रग्णालयात दाखल केले. अखेर अथक उपचारा अंती विज्ञानाच्या जोरावर माझ्या,म्हणजेच कोरोना विषाणुच्या विळख्यातून त्याची सुटका झाली.तो ठणठणीत बरा झाला.त्याला रग्णालयातुन घरी सोडण्याची वेळ आली. हार तुरे आणण्यात आले होते.देव आणि दैवशक्तीमळे नव्हे, तर विज्ञानापुढे हार पत्करलेल्या अवस्थेतही अंनिसच्या कार्यावर प्रभावित झालेल्या माझ्या मनात त्या शिक्षीत अडाण्याला चार चांगल्या आणि मोलाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. मी अतिशय हळू आवाजात सांगायचा प्रयत्न करूनही तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच ते ऐकू गेले असावे. कारण हळूच कुजबुज ऐकू आली.*
*माझा सल्ला तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात ढळढळीत अंजन घालणारा आहे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवले*

मी असा सल्ला दिला की,आई शपथ आज जरी विज्ञानाने एवढी क्रांती करून आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध असूनही जर तुमच्यासारखी शिकली सवरलेली, उच्चशिक्षीत माणसं अंगारा-धुपारा, गोमूत्र आणि शेणातच डोकं घालून बसत असतील तर काय उपयोग आहे इथल्या शिक्षणाचा?*
*आज या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ने निरंतर केलेल्या जनजागृतीमुळे देव आणि देवळाच्या तावडीतून सोडवून विज्ञानवादी दृष्टीने त्यांनी अनेक लोकांना या उच्चशिक्षीत अडाण्यासारखी रग्णालयाची वाट दाखवली नसती तर आजचा हा आनंदाचा क्षण आणि आणलेले हे हार-तुरे गळ्यातच काय अंगावर टाकायचा क्षणही कुणाला अनुभवता आला नसता. कारण भिऊ नकोस मी पाठीशी आहे,सब कुछ देखता है असे ज्यांच्या भरवशावर तुम्ही बसला होता तेच स्वत: कलपबंद अवस्थेत असताना तुमचं काय झालं हे आपला विवेक जागृत ठेवून विचार करा.*
*माझे इथल्या अल्पावधीतील परिस्थितीचे अवलोकन करून काढलेले अनुमान ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल.पण ही एक वस्तीस्थिती आहे.मी जिज्ञासू वृत्तीने इथल्या ब-याच गोष्टी माहीत करून घेतल्या आहेत*
*आज विज्ञान नसते तर ?* *थोडं आपल्या वाडवडीलांनी अनुभवलेले देवी आणि प्लेगसारख्या महामारीचे किस्से आठवून पहा. गावोच्यागावं ओसाड पडलेली. प्रेतं उचलायला माणसं मिळत नव्हती म्हणतात.

अशा कठीण परिस्थितीत पुढे येऊन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलें या माऊलीने पुणे सारख्या शहरात पदर खोचून आपल्या पाठीवरून प्रेतं वाहून विल्हेवाट लावली आणि त्यातच संसर्ग होऊन त्या माऊलीची क्रांतीची ज्योत मालवली.*
*तुमची तथाकथित श्रद्धा तर चव्हाट्यावर आलेलीच आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितिने विज्ञाननिष्ठेने जनजागृति केली नसती तर कदाचित प्लेगसारखी पुनरावृत्ति होवून तुम्हीही जिवंत राहिलाच नसता हे ध्यानी असू द्या. विज्ञानाच्या जोरावर आमच्या कोरोनाच्या विषाणूंचा समूळ नायनाट झाला तरी हरकत नाही. स्वत:चे आमचे अस्तित्व संपणार हे ठाऊक असूनही जाता जाता मी शत्रूवरही प्रेम करावे या तुमच्या संतांच्या शिकवणी प्रमाणे हा अनमोल संदेश तुम्हा अंधश्रद्धेत गुरफटलेल्या, शिकलेल्या अडाण्यांना देऊन जातो आहे.*
*अख्या जगाबरोबर भारताचाही विचार करायचा झाला तर,एक गोष्ट सा-या भारताने आपल्या डोळ्यांनी पाहिली आणि ती म्हणजे, सर्वच धर्मातील कुठल्याही देव देवता आणि कुठल्या जागृत शक्तींनी.कोरोनाच्या महामारीपासून एखाद्या निष्पाप बालकाचे ही रक्षण केले नाही की कुणाचा जीव वाचविला नाही. माणसंच माणसाच्या मदतीला धावली.हे एकशे एक टक्का सत्य आहे. आता जबाबदारी सर्व सामान्य जनतेची आहे त्यांनी आत्ताच ठरवावं. नव्हे, पक्का निश्चय आणि प्रतिज्ञाच करावी की, ” स्वत:चे ही रक्षण करण्यास असमर्थ असलेले, त्यांच्यावर वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या श्रद्धा ठेऊन जगणा-या आम्हा भोळ्या भाबड्यांनाही संकटकाळी मदत न करता, उलट आमचे आयुष्य उध्वस्त करणा-या देव देवता आणि त्यांच्या दलालांचे(भट/पुजारी) अजिबात ऐकणार नाही. मुळात त्यांचे अस्तित्वच मान्य करणार नाही आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निर्देशानुसार विज्ञानाच्या जोरावरच नवा भारत घडवणार”*

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(समाज माध्यम विभाग,अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
joshaba1001@gmail.com
…………………………………….

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED