पुन्हा एका असाहाय्य महिलेचा बळी!

31

याच महिन्यातील मागील पंधरवड्यात, म्हणजे ८ मार्च रोजी भारतासह अखिल विश्वामध्ये आम्ही महिला दिन साजरा केला. त्यादिवशी उच्चस्तरावरून महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या वल्गना हाकल्या गेल्या. वर्तमानपत्र, सोशल मीडिया तथा इलेक्ट्रॉनिक मीडियावर मथळेच्या मथळे छापून आले. चर्चेच्या फैरी झडल्या. परंतु भारतीय पुरुषी आणि जातीय मानसिकता कधीही बदलायला तयार होत नसल्याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. त्याचीच जाणीव करून देणारी घटना म्हणजे दिपाली चव्हाण (RFO) यांची स्वहत्या प्रकरण होय.महिलांच्या संदर्भात भारतातील पुरुषी व जातीय मानसिकतेने बरबटलेल्या लोकांनी कितीही सक्षमीकरणाच्या बाता मारल्या तरी त्यांच्यामध्ये बदल होणे शक्य नाही. कारण जोपर्यंत त्यांच्या मनातून जातीय क्रमिक असमानता व महिलांबद्दलचा न्यूनगंड निघून जात नाही तोपर्यंत असले अन्याय-अत्याचार कमी होण्याची लक्षणे सुद्धा दिसणार नाहीत.

भारतामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची वेगवेगळी कारणमीमांसा समोर आलेली आहे. कधी ती अबला किंवा आसहाय आहे म्हणून, कधी ती खालच्या जातीची आहे म्हणून, कधी ती आपल्या हाताखाली काम करते म्हणून, कधी ती आपल्यावर अवलंबून आहे म्हणून तर कधी तिच्या पाठीशी कोणीही नाही म्हणून. ही शृंखला सतत सुरूच राहते. काही अधिकारी किंवा राजकारणी लोक मिळालेल्या हक्क अधिकारांचा दुरुपयोग करत महिलांचे अनेकांगाने शोषण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या गरिबीचा किंवा ओढवलेल्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेताना दिसतात. विविध सेवा क्षेत्रांमध्ये काम करताना महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो वरिष्ठांच्या री मध्ये री ओढली नाही तर त्यांना निलंबित किंवा कामावरून कमी करण्याच्या धमक्या देऊन हेतुपुरस्सर कामाचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर लादला जातो.

त्यांच्या चांगल्या कामालाही वाईट सिद्ध करण्याची मानसिकता वरिष्ठांकडून बाळगली जाते. कधी कधी तर महिलांविरुद्ध अशी परिस्थिती निर्माण केली जाते, की त्यांना काम सोडून देण्याशिवाय पर्यायच नसतो. ज्यांना कामाची अत्यंत आवश्यकता असते अशा असहाय्य महिला मग मृत्युला कवटाळतात किंवा सक्षमपणे लढा देतात.
दिपाली चव्हाण(वन परिक्षेत्र अधिकारी) ह्या अतिशय धाडसी, कर्तव्यतत्पर व कणखर अधिकारी असल्याचे दिसून येते. त्यांनी अधिकारी म्हणून बजावलेले कर्तव्य विनोद शिवकुमार सारख्या वरिष्ठांच्या डोळ्यात खुपले. त्याची पाठराखण करत रेड्डीने सुद्धा त्याला सहकार्य केल्याचे दिसून येते. म्हणून त्यांच्या स्वहत्येमागे त्यांचे वरिष्ठ अधिकारीच असल्याचे त्यांच्या सुसाईड नोट वरून समजते. ज्या अधिकार्‍याने त्रास दिला तो विनोद शिवकुमार, ज्या अधिकाऱ्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही तक्रारीची दखल न घेणारा अधिकारी रेड्डी, हे दोघेही जातीश्रेष्ठत्व जोपासणारे असल्याचे दिसून येते. जे लोक जातीश्रेष्ठत्वाची भावना जोपासतात ते लोक मानवी मूल्य जोपासत नाही. ज्यांच्याकडे मानवी मूल्य नसतात त्यांच्याकडून स्त्री-पुरुष समानतेची अपेक्षा ठेवणे हे मूर्खाच्या नंदनवनात जगण्यासारखे असते.

असे असमानतेने ओत-प्रोत भरलेले विषमतावादी मनोवृत्तीचे लोक स्वतःच्या घरातील स्त्रियांना सुद्धा समान वागणूक न देता आपला पुरुषी अहंकार जोपासण्यात धन्यता मानतात.
असेच काही दिवसांपूर्वी एका नगर परिषदेमध्ये काही महिलांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत निनावी पत्र व्यवहार केला. त्या पत्रांमध्ये त्रास देणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्याचा अस्लीलतेसह सर्व लेखाजोखा मांडला. परंतु ते पत्र निनावी असल्यामुळे त्याची दखल घेणे शासन-प्रशासनाला गरजेचे वाटले नाही. त्यामुळे आजही तो प्रभारी अधिकारी आपल्या पदावर सन्मानाने काम करत आहे. दिपाली चव्हाण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे इथेही एखाद्या महिलेचा बळी हवा आहे की काय? अशी चर्चा त्यानिमित्ताने सुरू झालेली आहे. असे जर झाले तर मग अनेकांना महिला सक्षमीकरणाचा पान्हा फुटेल. काही लोक अश्रूंचा बांध मोकळा करून खोटी सहानुभूती व्यक्त करतील. दोषींवर खूप मोठी कार्यवाही होवून फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही करतील. परंतु नंतर काहीही फायदा होणार नाही. कारण तेंव्हा एखादे कुटुंब उध्वस्त झालेले असेल. त्यावेळी कोणावर कितीही मोठी कार्यवाही झाली तरी मृत्यू झालेला व्यक्ती परत येत नाही. त्याच्या रुपाने कुटुंबात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येत नाही. लहान मुले व वृद्ध आई वडिलांच्या दुःखाची भरपाई करता येत नाही. तेव्हा वेळीच काही निर्णय घेऊन उन्मत्त झालेल्या बेफाम अधिकाऱ्यांना बांध घालने गरजेचे असते.

यानिमित्ताने समस्त महिलांना असे आवाहन करावेसे वाटते की, जीवन जगताना कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी सक्षमपणे त्याचा सामना केला पाहिजे. स्वहत्या हा त्यावरील उपाय कधीच होऊ शकत नाही. उलट त्यामध्ये तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मानवी जीवन हे आनंदाने जगण्यासाठी मिळालेली निसर्गाची सर्वात मोठी देणगी आहे. ना की ते मध्येच आत्मघाती संपवण्यासाठी.
समाजामध्ये असे अनैतिक, तत्वहीन अनेक लोक भेटतील. ते अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यासोबत संघर्षासाठी सतत तयार रहावे लागेल. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावे, ते म्हणतात
*You do not fight with weapons*
*you should fight with brain and pen*

✒️लेखक:-भिमराव परघरमोल(व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा)तेल्हारा जि. अकोला मो.९६०४०५६१०४