✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.31 मार्च):- जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती वाढत आहे. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे शासन स्तरावरून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही कोरोना संसर्ग सुरक्षा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कुणालाही सोडू नये, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक आज 31 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात भविष्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने आपली तयारी ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, प्रशासनाने रूग्णसंख्या वाढ लक्षात घेता बेड, ऑक्सीजन पुरवठा, औषधी पुरवठा आदींची सज्जता ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत गाफील राहू नये. ऑक्सीजनची पर्याप्त व्यवस्था करून ठेवावी. येणारे दोन महिने जिल्ह्यासाठी चिंतेचे असून या परिस्थितीवर समन्वयाने मात केल्या जाईल. गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. ते पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. नियमानुसार पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी कालमर्यादा ठेवावी.

तपासण्यांचा वेग कमी होवू देवू नका. याप्रसंगी जिल्ह्यातील टाळेबंदीबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले. मरण दारी आणि तोरण दारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोकांना सांगून देखील लोक ऐकत नाही, नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नाईलाजास्तव जिल्ह्यात किमान 15 दिवस लॉकडाऊन करावा लागेल असे मत सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यानुसार पालकमंत्री यांनीदेखील नागरिक अशाचप्रकारे नियमांचे पालन करीत नसतील, तर लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा यावेळी दिला.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED