राज्यात नवीन राजकीय पक्ष स्थापन होणार

29

🔸मोहिते- पाटलांची जोरदार तयारी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.31मार्च):-माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी माळाचे शिर म्हणून ओळखले जाणाऱ्या माळशिरस तालुक्याचे नंदनवन करून संपूर्ण महाराष्ट्राला सहकार व दुध पंढरी म्हणून ओळख निर्माण करून देणाऱ्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या चौथ्या पिढीतील चि. विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडी स्थापन करून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी नवा पक्ष काढणार असल्याने तसा प्रस्तावही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. सहकार महर्षी सुरुवातीस शेतकरी कामगार पक्षामधून निवडणूक लढवून विजयी झालेले होते. कालांतराने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यावर ठेवून काँग्रेस (आय) पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. त्यांच्या कार्यकाळात माळशिरस तालुक्यामध्ये हरित क्रांती निर्माण केलेली होती. सहकार महर्षी यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारांची जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर आलेली होती. त्यांनीही काँग्रेस पक्षामध्ये माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवून प्रतिनिधित्व केलेले होते. 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती शरदचंद्रजी पवार यांनी केल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला होता. अनेक मंत्रीपदे भूषवून उपमुख्यमंत्री पदावर काम केलेले होते. विजयदादांनी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. अनेक विकास कामे केलेली असल्याने विजयदादांकडे विकासरत्न म्हणून पाहिले जात होते.

रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली होती. पक्षाने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली होती. 2019 मध्ये अनेक राजकीय उलथापालथ होत असताना मोदी लाटेत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता. माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार व आमदार निवडून आणण्यामध्ये मोहिते-पाटील परिवाराचा सहभाग होता. म्हणून भारतीय जनता पार्टीने रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांचे स्वतःचा पक्ष म्हणजेच कृष्णा-भीमा विकास आघाडीची स्थापना करण्याचे सुरू असल्याने आजपर्यंत मोहिते-पाटील यांनी सहकार महर्षी पासून पक्ष बदलले. मात्र, चौथ्या पिढीने स्वतःचा पक्ष काढलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना मोहिते-पाटील यांची पक्षाअंतर्गत घुसमट होत होती असा त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा जोर सुरू होता. त्यामुळे पक्ष बदलला असल्याचे राजकीय विश्लेषकांमधून बोलले जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये ‘मोहिते-पाटील बोले आणि तालुका, जिल्हा हाले’ अशी परिस्थिती होती. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ फेडरेशन अशा अनेक संस्थांमधून त्यांचे वर्चस्व होते. कालांतराने पुलाखालून पाणी गेल्याने ती परिस्थिती राहिली नाही. तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते-पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत.

कार्यकर्त्यांमधून नेहमी सोशल मीडियावर बोलले जाते, मोहिते पाटील हाच आमचा पक्ष त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या घराण्यातील विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडी या पक्षाची स्थापना केलेली असल्याने सदर पक्षाला मान्यता मिळाल्यानंतर मोहिते-पाटील यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी पक्षांमध्ये आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक राजकीय पक्षांमधील व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोहिते पाटील यांचा शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षातील मोहिते पाटील समर्थक सामील होऊन विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या कृष्णा-भीमा विकास आघाडीला भविष्यात चांगले दिवस येतील अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे