✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच एक महत्वपुर्ण वक्तव्य केले आहे. त्या जे बोलल्या आहेत ते महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय उपयुक्त आणि गरजेचे आहे. मंत्री म्हणून यशोमती ठाकूर अतिशय चांगले आणि भान ठेवून काम करत आहेत. त्यांना चांगली सामाजिक जाण आणि भान असल्याचे दिसून येते. काही दिवसापुर्वी त्यांनी समाजात अत्यंत दुर्लक्षित आणि शोषित वर्ग म्हणून ओळखल्या जाणा-या वेश्यांसाठी चांगला निर्णय घेतला होता. त्याबाबत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आताही त्यांनी केलेले वक्तव्य राज्यातल्या पुरोगामी चळवळीने आणि भाजपेतर सर्वच पक्षियांनी गांभिर्याने घेण्याची गरज आहे. विशेषकरून सरकारमध्ये सत्तेत असलेल्या सर्वच पक्षियांनी गांभिर्याने घ्यायला हवे तरच त्यांचे भविष्यातले अस्तित्व आणि राजकारण टिकून राहिल.

अन्यथा हे सगळे पक्ष आणि त्यांचे नेते लयाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. एम पी एस सी परिक्षेतून सुरू असलेला संघ व भाजपधार्जिणा प्रचार रोखण्याची गरज असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे. केवळ एम पी एस सी परिक्षाच नव्हे तर इतर अभ्यासक्रम, सामाजिक उपक्रम, अनेक पंथ, सांप्रदाय, मठ, आश्रम आणि शेकडो संघटना संघविचार तळागाळापर्यंत रूजवण्याचे काम पध्दतशीरपणे करत आहेत. अनेक बुवा-बाबा संघाचे हस्तक म्हणून काम करत आहेत. अध्यात्माचा बुरखा पांघरून ते संघाचा प्रचार-प्रसार करत आहेत. तमाम बहूजन समाजाला संघाच्या दावणीला बांधत आहेत. संघ नावाचा राक्षस हजार तोंडाचा आहे.

त्याला रोखणे सहज शक्य नाही. तो काय आहे, तो कसा आहे ? याचे पुरते भान इतर संघटना व चळवळींना फारसे आले आहे असे म्हणता येणार नाही. देशभक्तीचा अविर्भाव, धार्मिकतेचा भाबडा चेहरा, सेवेचा तथाकथित बुरखा घेवून विविध संघटनांच्या माध्यमातून ही विषवल्ली भारतभर फोफावते आहे. या संकुचित व विषमतावादी विचाराला नाही रोखले तर भारताची पुन्हा एकदा फाळणी अटळ आहे. समाजा-समाजात वैर, वाद, भांडण अटळ आहे. म्हणूनच यशोमती ठाकूरांची मागणी रास्त आहे. खरेतर यशोमती ठाकूरांच्या मागणीवर महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी अधिक विचार करायला हवा.

राज्यातील पुरोगामी चळवळीचा सर्वाधिक राजकीय फायदा उचलणा-या शरद पवारांनीच हा विषय अधिक जबाबदारीने आणि गांभिर्याने घ्यायला हवा. राज्याच्या राजकारणातील संविधान व लोकशाही मानणारे पुरोगामी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. संघविचार हा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, कॉंग्रेस पक्ष किंवा भाजपेतर सर्वच पक्ष संघटनांच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. या पक्षांच्या अस्तित्वापेक्षाही विविधतेने नटलेला सर्व समाज एकात्मतेने राहण्यासाठी संघ धार्जिणा विचार उपयुक्त नाही. लोकशाही, समता व बंधूता या त्रिसुत्रीसाठी संघविचार विषासारखा आहे. गेल्या सत्तर वर्षात महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतीयांनी तो विचार स्विकारला नव्हता. तो विचार स्विकारला नाही म्हणूनच या देशात आजवर लोकशाही व संविधान जीवंत राहिले.

जर तो विचार स्विकारला गेला असता तर आज या देशात संविधान जीवंतच राहिले नसते. पुन्हा एकदा पेशवाई जन्माला आली असती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशात भलेही साक्षरता कमी होती पण त्या लोकांना संघाचा विचार देशाच्या हिताचा नसल्याचे समजले होते. त्या जुण्या लोकांनी संघ विचाराचा गावात शिरकाव होवू दिला नव्हता. गावा-गावातले ब्राम्हणवाडे सोडले तर हा साप कुठेही वळवळताना दिसत नव्हता. गावोगावच्या ब्राम्हणवाड्यातच हा विॆषारी विचार जोपासला आणि पोसला गेला. वैचारिक प्रगल्भता आणि व्यापकता आलेल्या कित्येक ब्राम्हण मंडळींनीही संघविचार विषासारखा मानला. हयातभर त्याच्याविरोधात काम केले. कारण त्यांनाही समजले होते की ही विषवल्ली देशाचे आरोग्य नासवणारी आहे.

महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा तसेच विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी हयातभर या जातीयवादी व धर्मांध प्रवृत्तींशी झुंज दिली. लेखणी आणि वाणीतून या विषारी विचाराला तीव्र विरोध केला. जन-सामान्यांच्यात स्वातंत्र्य, समता व बंधूत्वाचा विचार रूजवला. पण त्यांच्यानंतर ही चळवळ अपंग झाली. आज तर ही चळवळ जाती-पातीत विभागली आहे. पुरोगाम्यांच्या जातवार संघटना आहेत. पुरोगाम्यांचा उठता-बसता फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा जप चालू होता पण त्यांच्याच पोटात संघाचा गर्भ वाढत होता. फुले-शाहू-आंबेडकरांच्या या मातीत संघाचे जातीयवादी रोप तरारून कसे काय आले ? हे रोप इतके धष्टपुष्ट कसे झाले ? त्याचा पसारा इतका कसा वाढला ? याचे प्रामाणिक चिंतन सर्वांनीच करायला हवे.

पुरोगामी चळवळ प्रामाणिक कमी आणि दांभिक जास्त असल्याने संघ बळावत गेला. केवळ सभा-संमेलनात पुरोगामीत्वाचा जाप करणारे दांभिक लोक भाषणं देवून बाजूला झाले की संरजामी विचार आणि प्रवृत्ती जोपासत होते. बाहेर एक आणि आत एक जगत होते. ही मंडळी स्टेजवर असताना जातीअंताची भाषणबाजी करत होते आणि स्वत:च्या पोटात मात्र जातीयवादाचे जंत तसेच जीवंत ठेवत होते. असल्या प्रवृत्तीमुळे राज्यात संघविचार फोफावला. आंबेडकरी चळवळ, संभाजी ब्रिगेड अशा काही संघटनामुळे किमान संघ विचाराच्या घौडदौडीला लगाम तरी लागला पण ती पुर्णत: रोखता आलेली नाही. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी पुरोगामीत्व केवळ राजकीय साठमारीसाठीच जास्त वापरले. ब्राम्हणेतर चळवळीचा राजकीय उपयोग करून घेतला. स्वत:च्या राजकारणासाठी या चळवळींचा परिणामकारक उपयोग केला पण त्यांनी फुले-शाहू आणि आंबेडकरांचा विचार नव्या पिढीच्या मनात रूजवण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी तसे प्रयत्न केले असते तर कदाचित आज हे चित्र महाराष्ट्रात दिसले नसते. १०५ आमदार घेवून देवेंद्र फडणवीस या लोकांच्या छाताडावर नाचले नसते. शरद पवारांनी वेळोवेळी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी संघवाले वापरले. वसंत दादाचे सरकार पाडून मुख्यमंत्री झालेल्या पवारांनी तत्कालीन जन-संघाचा पाठींबा घेतला होता. २०१४ च्या निवडणूकीत न मागता त्यांनी थेट फडणवीसांच्या सरकारला विधानसभेत अधिकृत पाठींबा दिला होता.

राजकारणात मोकळेपणा, व्यापकता जरूर हवी पण मुलभूत विचारांशीही नाळ घट्ट असायला हवी. पवारांनी स्वत:च्या सोईसाठी संघवाले सोईने वापरले. त्यांना वाढू दिले. त्यांच्या वाढीकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले. त्याचवेळी राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, इतर दलित चळवळी आणि संघटना खिळखिळ्या केल्या हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. किमान आतातरी शरद पवारांनी यावर गांभिर्याने विचार करायला हवा. त्यांचा नातू पार्थ ख्रिश्चन पाद्र्याकडे आशिर्वाद घ्यायला जातो, चमत्कार करणा-या त्या पाद्र्याच्या पायावर डोके ठेवतो, भाजपाशी जवळीक वाढवतो. भाजपेयी विचारांचे समर्थन करतो. उद्या तो आणि राज्यातली पुढची पिढी संघाची पुर्ण गुलाम होण्याआधी पवारांनी याचा गांभिर्याने विचार करायला हवा. त्यांनी महात्मा फुले, शाहू आणि आंबेडकरांचे विचार रूजवण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करायला हवेत. राज्यात वाढलेला जातीयवादी विचार मोडून काढण्यासाठी ठरवून प्रयत्न करायला हवेत. पुणेरी पगडी नाकारत पुरोगामीत्वाची पगडी म्हणून फुलेंची पगडी भुजबळांना घालणा-या पवार साहेबांनी पुरोगामीत्वाचे प्रतिकात्मक राजकरण करण्यावर भर देण्यापेक्षा, पुरोगामीत्व केवळ मिरवण्यापेक्षा ते रूजवण्यासाठी काम करायला हवे. हे काम शरद पवार जेवढ्या ताकदीने करू शकतात तेवढ्या ताकदीने दुसरे कुणी करू शकत नाही.

म्हणूनच मंत्री यशोमती ठाकूरांचे शरद पवारांनी जरूर ऐकायला हवे. त्या जे बोलतायत त्यावर गांभिर्याने काम करायला हवे. जे यशोमती ठाकूरांच्या लक्षात आले ते शरद पवारांच्याच लक्षात यायला हवे होते. असो किमान यशोमतींनी सुचवले आहे त्याची अंमलबजावणी तरी शरद पवारांनी आग्रहाने करून घ्यावी. नव्या पिढीत संघ धार्जिणे विचार वाढू देण्यापेक्षा महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रूजवावेत. गमती-जमती करत पवारांच्या आयुष्यातला वेळ गेला पण त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांच्यासारख्या गमती-जमती जमतील असे नाही. शरदरावांनी याकडे गांभिर्याने नाही पाहिले तर पवार घराण्यातलेच कुुणीतर भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर नवल वाटणार नाही.

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED