दक्षिणेतील देव अशी ओळख असलेले सुपरस्टार रजनीकांत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रजनीकांत यांना यापूर्वी पद्मभूषण (२०००) व विद्मविभूषण (२०१६) या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. जिवंतपणीच आख्यायिका बनलेले रजनीकांत हे एक अवलिया व्यक्तिमत्त्व. रजनीकांत यांच्या नावावर अनेक विनोद, टोमणे, उपदेश, म्हणी, मिम्स प्रचलित आहेत. रजनीकांत यांचे देश विदेशात हजारो फॅनक्लब्ज आहेत. रजनीकांत यांना उद्देशून एखादा अपशब्द जरी काढला तरी तामिळनाडूत दंगली उसळतात. त्यांच्या इतकी लोकप्रियता कोणत्याच अभिनेत्याला मिळालेली नाही. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सुपरहिट झालेला असतो. त्यांच्या चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठी प्रेक्षक पहाटेपासूनच रांगा लावतात. त्यांच्या फोटोवर दुग्धाभिषेख करतात. तामिळनाडूत तर त्यांची मंदिरे आहेत. देवप्रमाणे लोक त्यांची पूजा करतात. १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरू येथे एका महाराष्ट्रीयन कुटुंबात रजनीकांत यांचा जन्म झाला.

त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून त्यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव गायकवाड असे असून आईचे नाव जिजाबाई असे आहे. पुरंदर तालुक्यातील मावडी- कडेपठार हे त्यांचे मूळ गाव. ८० – ९० वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब बंगळुरात स्थलांतरित झाले व तिथेच स्थायिक झाले. त्यांचे वडील कर्नाटक पोलिसात शिपाई होते. रजनीकांत यांना लहानपणापासून अभिनयाचे वेड होते. अभिनयाचे वेड जपत त्यांनी अनेक लहानसहान कामे केली. बारावी पास झाल्यावर काही काळ त्यांनी बस कंडक्टर म्हणूनही काम केले. नशिब आजमावण्यासाठी त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि सिनेजगताला एक सुपरस्टार मिळाला. अपूर्ण रागंगल या तामिळ चित्रपटातुन त्यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरवात केली. आजवर त्यांनी १५० हुन अधिक चित्रपटात भूमिका केल्या. अंधा कानून या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. केवळ तामिळ आणि हिंदीच नव्हे तर कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली, इंग्रजी चित्रपटातून भूमिका केल्या. चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे रजनीकांत हे आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंटसाठीही ओळखले जातात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण त्यांचे चाहते आहेत. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवाद फेकीबद्दल प्रसिद्ध आणि विशिष्ट स्टाईलबद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत ओळखले जातात.

दक्षिण भारतात त्यांच्या नावे सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचा चाहतावर्ग देशातच नाही तर विदेशातही आहे. जपानमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. तिथे त्यांचे अधिक चित्रपट लोकप्रिय आहेत. तिथे त्यांचे फॅनक्लब्जही आहेत. सर्वाधिक चाहतावर्ग असलेला अभिनेता म्हणून त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. रजनीकांत जितके अभिनेते म्हणून श्रेष्ठ आहेत तितकेच ते माणूस म्हणूनही श्रेष्ठ आहेत. ते त्यांना मिळणाऱ्या माधनाच्या एकूण ४० टक्के एव्हढी रक्कम समाजसेवेसाठी वावरतात. रजनीकांत हे असे एकमेव अभिनेते आहेत की जे एकाही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत उद्देश एकच की लोकांमध्ये कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये. जिवंतपणीच आख्यायिका बनलेल्या या सुपरस्टारचा या पुरस्कारावर हक्कच आहे. योग्य व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल निवड मंडळाचे आणि सरकारचे आभारच मानले पाहीजेत. या निवडीचा आणि तामिळनाडू मधील निवडणुकीचा संबंध कोणीही जोडू नये ते या पुरस्कारासाठी सर्वार्थाने पात्र आहेत. रजनीकांत यांचे मनापासून अभिनंदन!

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED