✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3एप्रिल):-नियम डावलून प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन खाजगी वाहनांवर काल ऊपप्रादेशीक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनांमधील विद्यार्थी, महिला, बालके यांच्यावर या कारवाईमुळे बसस्थानकातच रात्र काढण्याची वेळ आली होती. तथापी जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर यांनी आपल्यातील माणूसकीचे दर्शन घडवत प्रवाशांचे हाल टाळले. याकामी कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यशस्वी मध्यस्थी केली.

जिल्ह्यातून १५ एप्रिल पर्यंत खाजगी प्रवासी वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही दि. १ एप्रिल रोजी रात्री ९ चे सुमारास नांदेड जिल्ह्यातून तीन खाजगी वाहने प्रवासी घेवून गंगाखेड मार्गे पुण्याकडे जात होती. ही माहीती मिळताच परभणी ऊपप्रादेशीक परिवहन अधिकाऱ्यांनी ही वाहने गंगाखेड येथे ताब्यात घेतली. आतील प्रवाशांना बसस्थानकावर ऊतरवण्यात आले. या वाहनांना जबर दंड लावत वाहने जप्त करून प्रादेशिक परिवहन अधिकारी परभणीकडे निघून गेले. या वाहनांमधील प्रवासी मात्र बसस्थानकावच बसून होते. यात परीक्षार्थीं विद्यार्थी, महिला आणि लहान बालकांचाही समावेश होता.

ही माहीती मिळताच कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी बसस्थानकावर धाव घेतली. ऊपस्थित पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. गंगाखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी बसस्थानक लवकर रीकामे करा, अन्यथा आपल्यावरही गुन्हे दाखल केले जातील अशी तंबी दिल्याने या प्रवाशांत भिती निर्माण झाली होती. वाहतूक, हॉटेल बंद असल्याने जायचे कुठे ? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. हा सर्व प्रकार गोविंद यादव यांनी एका परीक्षार्थीं विद्यार्थीनी मार्फत जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर यांना कळवला.

परिस्थिती समजून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करा, दंड लावा व कायदेशीर कारवाई पुर्ण करून या प्रवाशांना त्याच वाहनांमधून पुणे येथे घेवून जाण्यास अनुमती दिली. परभणीकडे निघालेल्या परिवहन अधिकाऱ्यांना परत गंगाखेडला पाठवले. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून रात्री आकरा वाजता ही वाहने पुण्याकडे रवाना झाली. आज पुण्यात परीक्षा असल्याने चिंतेत असलेल्या पराक्षार्थी विद्यार्थ्यांनी व महिला प्रवाशांनी जिल्हाधिकारी डॉ. मुगळीकर व गोविंद यादव यांचे आभार मानले. या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. मुगळीकर यांच्यातील माणूसकीचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया राहुल आडे या परीक्षार्थी विद्यार्थ्यांने व्यक्त केली.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED