दंडार कलाकारा : मानाचा घे मुजरा !

28

आपल्या बालपणी दंडारीच्या प्रयोगाची प्रसिद्धी एक महिना पूर्वीच केली जात होती. ग्रामीण पेंटरच्या कुंचल्यातून दंडारीचे नाव ठळक अक्षरात तर कलावंताची नावांची यादी बारीक अक्षरात गावातील दर्शनी भागात कोरली जात असे. आठवडी बाजार-हाट यात हाताने तावावर लिहिलेले प्रसिद्धी पत्रके आवर्जून चिकटवली जात. त्यामुळे दंडार रसिक व प्रेक्षकांना उत्कट प्रतिक्षा राहात होती. दंडारीच्या प्रयोगात संवाद व गाण्याचा मतितार्थ समान राहात असल्याने सर्वांना तीचे कथानक मुखपाठ होऊन जाई. शाळकरी मुले, गुराखी, कष्टकरी मजूर, शेतमजूर, शेतकरी, या सर्वांवर तीचा पगडा पुढील महिने दोन महिने तरी दिसून येत असे. त्यातील गाणे लोक खड्या आवाजात गातांना आढळत. या वेडापायीच समाज जागृती ही फार मोठ्या वेगाने साधली जात होती. दंडार ही एक फार जुनी जनजागृती साधत मनोरंजन करणारी लोककला आहे.

महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यांनी व्याप्त झाडीपट्टी बोलीभागात ती लोकप्रीय आहे. मुळात हे लोकनृत्य होते कालांतराने त्यात नाट्यीकरणाचा अंतर्भाव झाला. यावरूनच पुढे नाटक तयार झाले. त्याही पुढे जाऊन नाटकाचे रूपांतर चित्रपटात झाले, असे म्हणणे वावगे ठरू नये! झाडीपट्टीत शेताला दंड तर झाडाच्या फांदीला डार म्हटले जाते. सुगीच्या दिवसात आनंदोत्सव साजरा करण्याची एक तऱ्हा ठरत असे. शेतातील पिकलेला शेतमाल घरी आल्यानंतर शेतकरी आनंद व्यक्त करण्यासाठी समूहनृत्य करीत असावेत. यातून दंडार अवतरली, असे सांगितले जाते.
समाज प्रबोधनाच्या नानाविध लोककला प्रभावी ठरत होत्या. त्यात दुय्यम तमाशा, खडा तमाशा, गोंधळ, जोगवा, लावणी, कीर्तन, पोवाडा, दंडार, रेला, कोडाकुर, जलसा, कव्वाली, नाटक आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. ग्रामीण भागात या सगळ्या लोककलांमध्ये अतिशय लोकप्रिय, समाजजागृती व समाज प्रबोधनाची प्रभावी लोककला कोणती? असा जर कोणी प्रश्न केला तर बहुतांश लोक “ती दंडारच आहे!”

असा एकसुरी उत्तर देतील. रात्रीची अंकस्वरूपातील दंडार ही अधिकच लोकप्रिय समजावी लागेल. त्याचे काही गाजलेले व प्रेक्षकांनी उचलून धरलेले प्रयोग – गोपीचंद, राजा हरिश्चंद्र, भक्त सुदामा, भक्त प्रल्हाद, चिलया बाळ, धृव बाळ, रक्षाबंधन, भाऊबीज, टंट्या भिल्ल, वीर उमाजी नाईक, शिवाचा छावा आदी होत. व्यसन मुक्ती, बाल विवाह, स्त्री अत्याचार, हुंडाबळी, नरबळी, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रीपुरुष समानता, प्राथमिक शिक्षण अशा विषयांच्या मूळात हात घालणाऱ्या प्रयोगांचे सादरीकरण केले जात असत. दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत ही दंडार लोककला सादर होत असते. रात्री सादर होणारी दंडार आणि दुपारी सादर होणारी दंडार यांमध्ये तफावत असते. या वरून दंडार लोकनाट्याचे प्रकारही पडतात. बैठी दंडार, खडी दंडार आणि परसंगी दंडार असे ते प्रकार होत. पूर्व विदर्भाची भडकी दंडार व आदिवासी जमातीची भटकी दंडार हे प्रकार देखील प्रचलित आहेत. दुपारी सादर होणारी दंडार ही अर्थातच खडी दंडार असते. या दंडारीत लोकनृत्यासह विनोद खडे सोंग दाखविले जाते. आमच्या बालपणी रात्रीची दंडार ही नाट्यप्रयोगाप्रमाणे प्रवेश व अंक स्वरूपात सादरीकरणाकडे कल अधिक होता.

दंडारीच्या सादरीकरणात महिलांचा समावेश झालेला नाही. आजवर दंडारीत महिलांची कामे पुरुषच करत होते. गडचिरोली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पूर्वी गाजलेले दंडार कलावंत उदा. गोविंदा निकोडे, देवाजी सहारे, हरिजी सयाम, दिलीप लेनगुरे, तुलाराम गेडाम, तुळशीराम लाडे, आत्माराम सहारे, बापूजी कोवे, हरिजी कोवे, बळीराम कोवे, देविदास ब्राम्हणवाडे, गोपीनाथ निकोडे, पंढरी चौधरी, जगन्नाथ खेवले, श्रीहरी पेटकुले, मुखरु निकोडे, केशवराव हुलके, भगवान बोरुले, सुखदेव गुरनूले, विनोद बावणे, आदींच्या नावांचा उल्लेख करतांना मला सार्थ अभिमान वाटतो.

कालपरत्वे हा रंजनप्रकार लयास जाण्याची दुश्चिन्हे दिसू लागली आहेत, परंतु डॉ.हरिश्चंद्र बोरकर व डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांच्या अथक परिश्रमाने झाडीबोली चळवळीच्या माध्यमातून या लोककलेच्या पुनरुज्जीवनाचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. मृतप्राय झालेल्या लोककलांना आज खेड्यातूनच संजीवनी मिळू शकेल. पूर्वी घरोघरी एकतरी कलाकार तयार होत असे. लोक कलावंत खेड्यातूनच जन्म घेत असत. मात्र सद्या त्यांचा जन्म खुंटला आहे, ते पुनश्च पल्लवीत व्हावे व दंडारीही जनप्रबोधनास नवचैतन्याने उभ्या रहाव्यात, हीच एक या लेख प्रपंचामागील रास्त अपेक्षा !

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(लोकसाहित्य व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)मु. एकताचौक, रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com