राज्यात रक्ताची अभुतपुर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. अवघे पाच सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा राज्यातील ब्लड बँकेत शिल्लक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला रक्तदानाचे आवाहन केले आहे. राज्यात अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. याआधीही रक्ताचा तुटवडा जाणवला होता पण यावेळी हा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्याला कारण आहे कोरोना. कोरोना आणि लॉक डाऊन यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करता आले त्यामुळे पुरेसा रक्तसाठा जमा झाला नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सरकारतर्फे रक्तदानाचे आवाहान करण्यात आले होते तेंव्हा काही सामाजिक व राजकीय संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्याद्वारे जमा झालेले रक्तही आता संपत आले आहे त्यामुळे पुन्हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची वेळ आली आहे.

केवळ राजकीय पक्षच नव्हे तर सामाजिक, सेवाभावी संघटना, तरुण मंडळे, ग्रामपंचायती, गृहसंकुले येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे जेणेकरुन मोठ्या प्रमाणात रक्त संचय होऊ शकेल. जनतेनेही रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे. कोरोना आहे म्हणून रक्तदान नको अशी मानसिकता बनत आहे पण ती चुकीची आहे. सुरक्षेचे सर्व नियम पाळून रक्तदान करण्यास काहीच हरकत नाही. रक्तदान केल्याने कोणतीही इजा किंवा दुष्परिणाम होत नाही. मनुष्याच्या शरीरात ५ लिटर रक्त असते आणि रक्तदानात केवळ ३५० मिली इतकेच रक्त घेतले जाते त्यामुळे कोणतीही कमजोरी जाणवत नाही. विशेष म्हणजे २४ ते ४८ तासात जेवढे रक्त आपण दान दिले आहे तेवढे पूर्ववत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन रक्तदान केले पाहिजे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हणून रक्तदानाचा प्रसार आणि प्रचार होत असला तरी आपल्याकडे रक्तदात्यांची संख्या खूपच कमी आहे.

भारतात फक्त ०.६ टक्केच लोक रक्तदान करीत असतात १३० कोटी लोकसंख्येच्या देशात हे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे देशात रक्ताची कमतरता खूप भासते त्यात कोरोनाची भर पडल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघातातील रुग्ण, प्रसव काळ, अतिदक्षता विभाग, तातडीच्या शस्त्रक्रिया अशा वेळी रक्ताची गरज निर्माण होते जर रुग्णांना वेळीच रक्त मिळाले नाही तर त्यांचा मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने सजग राहायला हवे. आपल्या रक्तामुळे कुणाचा तरी प्राण वाचणार आहे रक्तदान म्हणजे जीवदान, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे लक्षात घेऊन प्रत्येकाने रक्तदान करायला हवे.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लेख, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED