आयपीएलवर कोरोनाचे सावट

30

जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडी प्रीमियर लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. जगातील सर्व नामांकित खेळाडू आयपीएलमध्ये हजेरी लावत असल्याने आयपीएल भारतातच नाही तर जगात लोकप्रिय आहे. कोरोनामुळे मागील वर्षीची आयपीएल दुबईमध्ये खेळवण्यात आली होती यावर्षीची आयपीएल मात्र भारतात खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असला तरी यावर्षीच्या आयपीएलवर देखील कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आयपीएल आयोजित करण्याचे बीसीसीआयने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.

सामन्यांची संख्या मर्यादित केली नसली तरी ठराविक शहरातच सामने खेळवून खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागणार नाही याची दक्षता बीसीसीआयने घेतली आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावेळी सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नाकारण्यात आला आहे. आयपीएलमध्ये सहभागी सर्व संघांना काही दिवस विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ जैव सुरक्षा वातावरणात ( बायो बबल ) आहेत. आयपीएल यशस्वी करण्यासाठी तसेच आयपीएलला कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी बीसीसीआयने इतके प्रयत्न करूनही आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव केलाच. आयपीएल सुरु होण्याआधीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवणारा दिल्ली कॅपिटलचा डावखुरा मंदगती गोलंदाज अक्षर 

पटेल कोरोना बाधित असल्याचे उघड झाले. अक्षर पटेलची कोरोनाची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यामुळे आयपीएलमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षर पटेल हा कोरोनाने बाधित झालेला पहिलाच खेळाडू नाही याआधी कोलकाता नाईट रायडर संघाचा नितीश राणाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघातील एका तंत्रविशेतज्ज्ञाला देखील बाधा झाली आहे. मागील वर्षी याच संघातील ऋतुराज गायकवाड व दीपक चहर या खेळाडूंना कोरोनाने गाठले होते. केवळ खेळाडूच नाही तर मुंबईच्या दहा ग्राऊंडसमनला देखील कोरोनाने गाठले आहे त्यामुळे मुंबईतील सर्व सामने हैदराबादमध्ये हलवण्याची शक्यता आहे. एकूणच कोरोनाने आयपीएलच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सध्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. दुसऱ्या लाटेने देशात धुमाकूळ घातला आहे असे असताना आयपीएलच्या आयोजनाचा अट्टाहास बीसीसीआय का करत आहे? आयपीएलमधून बीसीसीआयला चार ते पाच हजार कोटींचा महसूल उपलब्ध होतो या मोठ्या रकमेवर पाणी पडू नये म्हणूनच बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करण्याचा अट्टाहास करत आहे. पण पैशापेक्षा खेळाडूंचा जीव महत्वाचा आहे हे बीसीसीआयला समजत नाही का ? खेळाडूंचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार बीसीसीआयला कोणी दिला? आयपीएल सुरू असतानाच जर एखाद्या खेळाडूला कोरोनाची बाधा झाली तर आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करावी लागेल. पाकिस्तान क्रिकेट लीग ( पीसीएल ) देखील खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने अर्ध्यावरच स्थगित करावी लागली होती. छत्तीसगड मध्ये खेळवण्यात आलेली माजी खेळाडूंची एक स्पर्धा नुकतीच संपली. स्पर्धा संपल्यानंतर सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, युसूफ पठाण या खेळाडूंना कोरोनाने गाठले म्हणजे मोठी स्पर्धा खेळणे हे खेळाडूंसाठी धोक्याचे ठरू शकते याचा विचार करून बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनाचा पुनर्विचार करावा असा सूर उमटत आहे पण बीसीसीआय मात्र आयपीएल कोणत्याही परिस्थितीत स्थगित करणार नाही कारण बीसीसीआयसाठी खेळाडूंच्या जिवापेक्षा पैसा महत्वाचा आहे म्हणूनच आयपीएलला इंडियन पैसा लीग असे म्हणतात.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५