गुरूवार ते रविवार होणाऱ्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

26

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

नंदुरबार(दि.4एप्रिल):- नंदुरबार जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले असून जनता कर्फ्युला स्वत:हून प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

या कालावधीत सर्व बाजारापेठा, आठवडे बाजार व इतर दुकाने बंद राहतील. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना,गॅस वितरण सुविधा पूर्णवेळ सुरू राहतील.

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वाहनासाठी पेट्रोलपंप सुरू राहतील, अन्य वापरासाठी प्रतिबंध असेल. वैद्यकीय कारणास्तव नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा असेल, मात्र त्यांच्यासोबत सबळ पुरावे असणे आवश्यक आहे.

आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आस्थापना (किरणा दूध, फळे, भाजीपाला विक्री) पूर्वी दिलेल्या आदेशानुसार सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल. वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना पूर्णवेळ सुरू राहतील. आरोग्य, महावितरण तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणारी कार्यालये वगळता इतर सर्व शासकीय कार्यालये आणि बँक 50 टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.