वाढीव दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ – ना. सुनिल केदार

87

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.5एप्रिल):- सानेन जातीच्या शेळ्यांचे नेदरलँड, न्युझिलंड, इजराईल इत्यादी देशामध्ये संगोपन केले जात असुन ही शेळी दिवसाला 12 लिटर पर्यंत दुध उत्पादित करते. या शेळीच्या दुधाला विविध दुध उत्पादने तयार करण्याकरिता मोठी मागणी असुन त्यास चांगला भाव मिळत असल्याने सानेन जातीच्या शेळ्या व कृत्रीम रेतनाकरिता त्याच्या विर्यमात्रा तसेच मोठ्या प्रमाणात दूध देणाऱ्या ब्राझीलीयन गीर गाय जातीच्या विर्यकांड्या महाराष्ट्रात आयात करण्याची शासनाची योजना अंमलात आणून दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यावर भर देण्यात येईल असे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्री सुनिल केदार यांनी नियोजन भवन येथे काल आढावा बैठक घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. सुभाष धोटे, आ.किशोर जोरगेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भि.डो. राजपुत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी श्री. गडवे तसेच जिल्ह्यातील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ना. केदार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील मागणीनुसार गावठी गायीच्या कृत्रीम रेतणातून कालवडच जन्माला यावी यासाठी देशी प्रजातीचे सेक्स सॉर्टेट सिमेन लवकरच माफक दरात लवकरच पशुपालकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील दुध संकलन वाढविण्याकरिता जिल्ह्यातील दुध संकलन केंद्र वाढविण्याचे निर्देश मंत्री सुनिल केदार यांनी दिले. तसेच जिल्ह्यात कुक्कुट पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी पथदर्शी कुक्कुटपालन प्रकल्प उभा करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून किमान 10 एकर जागेची मागणी करावी, असे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील नव्याने स्थापित झालेल्या 4 फिरते पशुचिकित्सालय व त्याचे फलनिष्पत्तीबाबत राज्यभरात कंत्राटी पध्दतीने पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेशक ही पदे तसेच जिल्ह्यातील इतर रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने मान्यता प्रदान केले असून आगामी काळात रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही पुर्ण होणार असल्याचे त्यांनी आ. धोटे यांच्या एका प्रश्नाच्या संदर्भात सांगितले.

जिल्ह्यातील कृत्रिम रेतन व लसीकरण कार्य दिलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने फार कमी असून सर्व तांत्रिक कामे वाढविण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश ना. केदार यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी गायी म्हशीचे कृत्रीम रेतन, दुग्ध उत्पादन, लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव, बर्ड फ्ल्यु आजार, कुक्कुटपालन व्यवसाय, शेळीपालन इ. बाबींचा आढावा घेतला.

बैठकीत आ. सुभाष धोटे व आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्ह्यातील दुध उत्पादन व पशुसंवर्धनाबाबत जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कामाकाजाचा तपशील सादर केला.बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.